scorecardresearch
Monday, 8 September, 2025
घरपुस्तक परिचय‘स्मॉल इज ब्युटीफुल’: माणूस महत्त्वाचा!

‘स्मॉल इज ब्युटीफुल’: माणूस महत्त्वाचा!

1973 मध्ये लिहिलेलं एक पुस्तक, ज्याच्यावर खूप टीका झाली. तेच पुस्तक, आज पन्नास वर्षांचा कालावधी उलटल्यावर सामाजिक, आर्थिक, राजकीय, जागतिक परिस्थितीत प्रचंड बदल घडून आल्यावर परत एकदा उपयोगी पडू शकते यात लेखकाची दूरदृष्टी म्हणायची? प्रगत जगाचे अपयश म्हणायचे? का तेव्हा पुस्तकातून शिकायची वेळ आली नव्हती असे समजायचे?

1973 मध्ये लिहिलेलं एक पुस्तक, ज्याच्यावर खूप टीका झाली. तेच पुस्तक, आज पन्नास वर्षांचा कालावधी उलटल्यावर सामाजिक, आर्थिक, राजकीय, जागतिक परिस्थितीत प्रचंड बदल घडून आल्यावर परत एकदा उपयोगी पडू शकते यात लेखकाची दूरदृष्टी म्हणायची? प्रगत जगाचे अपयश म्हणायचे? का तेव्हा पुस्तकातून शिकायची वेळ आली नव्हती असे समजायचे? ते पुस्तक म्हणजे, ‘Small is Beautiful : Economics as if people mattered’.

ई. एफ. शुमाकर यांनी लिहिलेले ‘स्मॉल इज ब्युटीफुल’ हे पुस्तक अर्थव्यवस्थेचा विचार वेगळ्या दृष्टिकोनातून करते. अर्थशास्त्रात मोठ्या उत्पादनाला, औद्योगिकीकरणाला आणि जागतिकीकरणाला जास्त महत्त्व दिले जाते. मात्र, शुमाकर यांचे मत आहे की, अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू माणूस असायला हवा. विकासाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर होत असलेले औद्योगिकीकरण, नैसर्गिक संसाधनांची होणारी नासाडी आणि मानवी जीवनशैलीवर होणारे दुष्परिणाम यावर ते प्रकाश टाकतात. हे पुस्तक समजायला सोपे असले तरी त्यातील मुद्दे अंतर्मुख करणारे आणि विचारप्रवर्तक आहेत. त्यामुळे, समाजात सकारात्मक बदल घडवण्याची इच्छा असलेल्या प्रत्येकाने हे पुस्तक वाचायला हवे!

समाजाच्या गरजांवर आधारित अर्थकारण असावे का औद्योगिक घराण्यांच्या हावरटपणावर? समाजात जोपर्यंत लोकांचा ‘हाव म्हणजे गरज’ असा समज आहे, तितका उद्योगांचा व्यापार चालेल. ‘यूज अँड थ्रो’ चा मंत्र, इतरांसारखे माझ्याकडेपण असावे, अंथरूण बघून पाय पसरण्याऐवजी अंथरूणच मोठं करणे, भौतिकदृष्ट्या विकसित देशांच्या जीवनशैलीशी आपली तुलना करणे इत्यादी नवीन काळातल्या समाजाची मूल्ये झालेली दिसतात. ही मूल्ये प्रत्यक्षात आणणं सर्वांनाच शक्य नाही पण त्या झगझगीत, भडक जगाचे अनुकरण करण्यासाठी आत्ताच्या जगात भ्रष्टाचार, गुंडगिरी, साम-दाम-दंड-भेदाचा सर्रास वापर करणे यात चुकीचे काहीही वाटत नाही, असे दिसून येत आहे. राजकारणी, उद्योजक, शिक्षणसम्राट, इ. असे वागून फाईव्ह स्टार लाईफस्टाईलने जगतात मग आम्ही का मागे राहायचं? हा प्रश्न हातावर पोट असणारे विचारतात आणि ऐषोआरामात जगणारे या पंचतारांकित जीवनशैलीचा पुरेपूर उपभोग घेतात. पाश्चिमात्य देशांसाठी आपण फक्त एक बाजारपेठ आहोत, ग्राहक बनून राहण्यात आपल्याला कुठेही कमीपणा वाटत नाही.

या सगळ्यात निसर्गाचा ऱ्हास, त्यामुळे येणाऱ्या वेगवेगळ्या आपत्ती; याचा आपल्या वागण्यावर किंवा आपल्या जीवनशैलीवर किंवा आपल्या सवयींवर काहीही परिणाम होताना दिसत नाही. आत्ताची परिस्थिती बघून शुमाकर यांना वाटेल “आपलं पुस्तक छापायचं राहून गेलं की काय? आपण 1973 मध्ये मांडलेल्या समस्या, वर्तविलेले भाकित सर्व प्रत्यक्षात आले! ज्याची आपण कल्पनापण करू शकलो नाही ते हे कृत्रिम बुद्धिमत्तेचे जग पुढे चालणार तरी कसे आहे?”

त्यांनी जे भौतिकवादाचे तत्त्वज्ञान हे ‘justice, harmony, beauty and health’ च्या पुढे गेले नाही पाहिजे, असे म्हटले होते,  त्यात आपल्याला दिसून येते की या चारही मूल्यांमध्ये (आणि अजूनही इतर महत्त्वाच्या मूल्यांमध्ये) भौतिकवादी तत्त्वज्ञान वापरूनच निर्णय होत आहेत. म्हणजे भरपूर गुन्हे दाखल असलेली व्यक्ती महासत्तेची प्रेसिडेंट होताना दिसते, तसेच वेगवेगळ्या सौंदर्य स्पर्धांमध्ये मोठे अर्थकारण आणि राजकारण, जागतिक आरोग्य संघटनेतून माघार,  आणि harmony च्या बाबतीत तर ‘म्हणजे काय?’ असे झाले आहे. यातील निबंध जसे की ‘Peace and Permanence’, ‘The Greatest Resource – Education, A Machine to Foretell the Future, Planning’, इ. सर्व आत्ताच्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जगात सुद्धा (अजूनच जास्त) उपयोगी आहेत. म्हणजे युद्ध हे आता ओपन एआय आणि ‘डीपसीक एआय’मध्ये असणार आहे. शुमाकर यांनी शिक्षणाला सगळ्यात मोठे संसाधन मानले आहे. आपल्याला आता त्याच शिक्षणात, जे अजूनही सगळ्यात मोठे संसाधन आहे, त्यात शालाबाह्य मुलं आणि मशीन लर्निंग, डीप लर्निंगमधली    दरी बुजवायचे सगळ्यात मोठे आव्हानपण पेलायचे आहे.

‘स्मॉल इज ब्युटीफुल’ वाचून पृथ्वी रिसेट करण्यापेक्षा इलॉन मस्क दुसऱ्या ग्रहांवर वस्तीसाठी प्रयत्न करतोय!

एक अख्खा भाग शुमाकर यांनी ‘The Third World’ साठी लिहिला आहे. त्याची दखल तेव्हाच घेतली गेली असती, तर आजच्या ‘थर्ड वर्ल्ड’चे जे यादवी, युद्धभूमीमध्ये रूपांतर झाले आहे ते जरा थोपवले गेले असते.  स्थलांतरीतांची तर जगभर समस्याच झाली आहे. जोपर्यंत शस्त्रास्त्रांचे कारखाने, बंदुकांचे खुले परवाने थांबविले जाणार नाहीत, तोपर्यंत युद्ध, दहशतवाद कसा थांबेल? अमेरिकेत दरवर्षी कितीतरी शालेय विद्यार्थी बंदुकीच्या हिंसेत मृत्यूमुखी पडतात. ज्या देशाला त्याचे काहीच वाटत नाही तो देश इतर अविकसित, विकसनशील राष्ट्रांमध्ये युद्ध लावून द्यायला का चाचपडेल? जर ‘Drill Baby Drill’ हे महासत्तेचे नवीन धोरण असेल तर Enough is Enough किंवा ‘कधी थांबायचं’ हे कळण्यासाठी तरी बेसिक रीडिंग म्हणून ‘स्मॉल इज ब्युटीफुल’कडे बघितले पाहिजे.

जागतिकीकरणामुळे स्थलांतर फक्त माणूस किंवा तंत्रज्ञानाचेच नाही तर रोगराईचेसुद्धा झालेले आपण कोविड-19 महासाथीमध्ये अनुभवले. त्याच जागतिकीकरणाच्या काळात ‘मेक अमेरिका फर्स्ट अगेन, जगभरातल्या राजकारणात कट्टरवाद्यांचा उदय आणि त्यांना वाढत जाणारा पाठिंबा, या सगळ्या परिस्थितीत ‘Peace and Permanence’ चे महत्व ‘स्मॉल इज ब्युटीफुल’ ने 1973 मध्येच अधोरेखित केले होते, हे महत्त्वाचे ठरते.

 

संबंधित लेख

चुकवू नका

Recent Comments