नवी दिल्ली: संरक्षण मंत्रालयाने सोमवारी अंदाजे 79 हजार कोटी रुपयांच्या नियोजित खरेदी प्रस्तावांना मंजुरी दिली, ज्यात 200 किलोमीटरपेक्षा जास्त पल्ल्याच्या ‘अस्त्र एमके2’ या हवेतून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांचा आणि पिनाका मल्टी-बॅरल रॉकेट लाँचरसाठी 120 किलोमीटर पल्ल्याच्या मार्गदर्शित रॉकेटचा समावेश आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखालील संरक्षण संपादन परिषदेने (डीएसी) आपल्या वर्षाअखेरच्या बैठकीत तिन्ही सेवांच्या विविध प्रस्तावांना ‘आवश्यकतेची स्वीकृती’ (अॅक्सेप्टन्स ऑफ नेसेसिटी) दिली आहे. हे खरेदीच्या दिशेने पहिले औपचारिक पाऊल आहे.
भारतीय लष्करासाठी, तोफखाना रेजिमेंटसाठी लॉइटर म्युनिशन्स प्रणाली, कमी उंचीवरील हलके रडार, पिनाका मल्टीपल लॉन्च रॉकेट सिस्टमसाठी (एमआरएलएस) लांब पल्ल्याचा मार्गदर्शित रॉकेट दारूगोळा आणि एकात्मिक ड्रोन शोध व प्रतिबंध प्रणाली एमके-II च्या खरेदीसाठी हे मंजूर करण्यात आले. यापैकी, लांब पल्ल्याचा मार्गदर्शित रॉकेट दारूगोळा हा सर्वात महत्त्वाचा प्रस्ताव आहे, ज्याचे मूल्य सुमारे 2 हजार 500 कोटी रुपये आहे. सध्या पिनाकाच्या मार्गदर्शित रॉकेटचा पल्ला सुमारे 80 किलोमीटर आहे, तर खरेदी केल्या जाणाऱ्या नवीन रॉकेटचा पल्ला 120 किलोमीटरपर्यंत वाढवण्यात आला आहे. ही प्रणाली संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) विकसित करत आहे आणि पहिली चाचणी 2026 मध्ये नियोजित आहे.
संरक्षण मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, लॉइटर म्युनिशन्सचा वापर सामरिक लक्ष्यांवर अचूक मारा करण्यासाठी केला जाईल, तर कमी उंचीवरील हलके रडार लहान आकाराच्या, कमी उंचीवर उडणाऱ्या मानवरहित हवाई प्रणालींना शोधून त्यांचा मागोवा घेतील. “लांब पल्ल्याचे मार्गदर्शित रॉकेट पिनाका ‘एमआरएलएस’चा पल्ला आणि अचूकता वाढवतील, ज्यामुळे उच्च मूल्याच्या लक्ष्यांवर प्रभावीपणे हल्ला करता येईल. वाढीव पल्ल्याची एकात्मिक ड्रोन शोध व प्रतिबंध प्रणाली एमके 2 सामरिक युद्धक्षेत्रात आणि अंतर्गत भागात भारतीय लष्कराच्या महत्त्वाच्या मालमत्तांचे संरक्षण करेल,” असे त्यात म्हटले आहे. भारतीय हवाई दलासाठी, स्वयंचलित टेक-ऑफ लँडिंग रेकॉर्डिंग प्रणाली, अस्त्र एमके 2 क्षेपणास्त्रे, फुल मिशन सिम्युलेटर आणि SPICE-1000 लांब पल्ल्याच्या मार्गदर्शन किट्स इत्यादींच्या खरेदीसाठी हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. स्वयंचलित टेक-ऑफ लँडिंग रेकॉर्डिंग प्रणालीच्या समावेशामुळे हवाई सुरक्षा वातावरणातील त्रुटी भरून काढल्या जातील, कारण यामुळे लँडिंग आणि टेक-ऑफचे उच्च-गुणवत्तेचे, सर्व-हवामान स्वयंचलित रेकॉर्डिंग उपलब्ध होईल. लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट (एलसीए) तेजससाठीचे फुल मिशन सिम्युलेटर वैमानिकांच्या प्रशिक्षणात किफायतशीर आणि सुरक्षित पद्धतीने वाढ करेल, तर SPICE-1000 भारतीय हवाई दलाची लांब पल्ल्याची अचूक मारा करण्याची क्षमता वाढवेल. SPICE-1000 चा वापर भारतीय हवाई दलाने 2019 च्या बालाकोट कारवाईत केला होता.
भारतीय हवाई दलासाठी सर्वात महत्त्वपूर्ण घडामोडींपैकी एक म्हणजे अस्त्र एमके-2 क्षेपणास्त्रे खरेदी करण्यास मिळालेली मंजुरी. भारतीय हवाई दल किमान 700 क्षेपणास्त्रे खरेदी करण्याची योजना आखत आहे, जी सुखोई आणि तेजस विमानांमध्ये समाकलित केली जातील. या क्षेपणास्त्राची मारक क्षमता 200 किमी पेक्षा जास्त असेल, जी राफेल विमानात समाकलित केलेल्या युरोपियन मेटिऑरपेक्षा जास्त आहे. सुरुवातीची योजना 160 किमी पल्ल्याच्या अस्त्र एमके 2 ची होती, परंतु आता 200 किमीपेक्षा जास्त क्षमता सुनिश्चित करण्यासाठी योजनेत बदल करण्यात आला आहे. हे क्षेपणास्त्र पाकिस्तान आणि चीन या दोन्ही देशांकडून वापरल्या जाणाऱ्या पीएल-15 क्षेपणास्त्राला प्रत्युत्तर देईल. सूत्रांनी सांगितले की, अस्त्र एमके-2 ची पहिली चाचणी 2026 मध्ये होईल आणि त्यानंतरच्या आवृत्त्यांमध्ये त्याची मारक क्षमता 300 किमीपेक्षा जास्त नेण्याची योजना आहे. भारतीय नौदलासाठी, बोलार्ड पुल टग्स, हाय फ्रिक्वेन्सी सॉफ्टवेअर डिफाइन्ड रेडिओ, (एचएफ एसडीआर) मॅनपॅक आणि हाय अल्टिट्यूड लाँग रेंज रिमोटली पायलिटेड एअरक्राफ्ट सिस्टीम (आरपीएएस) भाड्याने घेण्यासाठी खरेदीला मंजुरी देण्यात आली आहे.
बीपी टग्सच्या समावेशामुळे नौदलाची जहाजे आणि पाणबुड्यांना बंदिस्त पाण्यात/बंदरात नांगर टाकणे, नांगर काढणे आणि हालचाल करण्यास मदत होईल. एचएफ एसडीआरमुळे बोर्डिंग आणि लँडिंग ऑपरेशन्स दरम्यान लांब पल्ल्याच्या सुरक्षित संवादात वाढ होईल, तर आरपीएएस भारतीय महासागर क्षेत्रावर सतत गुप्तचर माहिती, पाळत ठेवणे आणि टेहळणी तसेच विश्वसनीय सागरी क्षेत्राची जागरूकता सुनिश्चित करेल. भारतीय नौदल सध्या दोन सी गार्डियन भाड्याने चालवत आहे आणि पूर्वीचा करार संपणार असल्याने पुढील भाडेकरारासाठी ही मंजुरी देण्यात आली आहे.

Recent Comments