scorecardresearch
Wednesday, 24 December, 2025
घरराजनैतिकशांघाय विमानतळावर भारतीय महिलेचा पासपोर्ट ठरला ‘अवैध’, भारताकडून चीनचा तीव्र निषेध

शांघाय विमानतळावर भारतीय महिलेचा पासपोर्ट ठरला ‘अवैध’, भारताकडून चीनचा तीव्र निषेध

अरुणाचल प्रदेशातील भारतीय महिलेला शांघाय विमानतळावरून प्रवास करताना थांबवून 18 तासांहून अधिक काळ रोखून ठेवल्याबद्दल भारताने बीजिंग आणि नवी दिल्ली या दोन्ही ठिकाणी चीनविरुद्ध कडक निषेध नोंदवला आहे.

नवी दिल्ली: अरुणाचल प्रदेशातील भारतीय महिलेला शांघाय विमानतळावरून प्रवास करताना थांबवून 18 तासांहून अधिक काळ रोखून ठेवल्याबद्दल भारताने बीजिंग आणि नवी दिल्ली या दोन्ही ठिकाणी चीनविरुद्ध कडक निषेध नोंदवला आहे. पेमा वांगजोम थोंगडोक या महिलेने नंतर आरोप केला, की चिनी अधिकाऱ्यांनी तिचा भारतीय पासपोर्ट अवैध घोषित केला. सूत्रांनी सांगितले, की “ही घटना घडली त्याच दिवशी बीजिंग आणि दिल्लीमध्ये कडक निषेध नोंदवण्यात आला. शांघायमधील आमच्या वाणिज्य दूतावासानेही स्थानिक पातळीवर हा मुद्दा उपस्थित केला आणि अडकलेल्या प्रवाशाला पूर्ण मदत केली.”

“अरुणाचल प्रदेश हा निर्विवादपणे भारतीय भूभाग आहे आणि तेथील रहिवाशांना भारतीय पासपोर्ट घेऊन प्रवास करण्याचा पूर्ण अधिकार आहे.” हाही मुद्दा सूत्रांनी अधोरेखित केला. एक दशकाहून अधिक काळ युकेमध्ये राहणाऱ्या भारतीय नागरिक थोंगडोक यांना लंडनहून जपानला जाताना शांघाय विमानतळावर चिनी अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले. एएनआयला त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी त्यांना रांगेतून बाहेर काढले आणि त्यांचा भारतीय पासपोर्ट अवैध घोषित केला. चिनी अधिकारी त्यांची थट्टा करत होते व त्यांना चिनी पासपोर्टसाठी अर्ज करण्यास सांगत होते. भारतीय अधिकाऱ्यांनी अखेर त्यांना मदत केली व मध्यस्थी केली. “नागरी विमान वाहतूक संबंधी शिकागो आणि मॉन्ट्रियल अधिवेशनांचे उल्लंघन करणारे चिनी अधिकाऱ्यांचे कृत्य आहे हे देखील अधोरेखित झाले आहे,” असे भारतीय सूत्रांनी सांगितले.

2020 मधील गलवान संघर्षानंतर, भारत आणि चीन द्विपक्षीय संबंध स्थिर करण्यासाठी प्रयत्न करत असताना ही परिस्थिती उद्भवली आहे. चीनने सातत्याने अरुणाचल प्रदेशला आपल्या देशाचा भाग असल्याचा दावा केला आहे. भारताने चीनचे दावे फेटाळून लावले आहेत आणि अरुणाचल प्रदेश निर्विवादपणे भारताचा भाग असल्याचे म्हटले आहे.

 

संबंधित लेख

चुकवू नका

Recent Comments