नवी दिल्ली: पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री आणि उपपंतप्रधान इशाक डार यांनी शनिवारी सांगितले की, “ऑपरेशन सिंदूरदरम्यान देशाच्या लष्कराची कामगिरी जगासाठी एक प्रखर संदेश होती, कारण भारताने स्वतःला दक्षिण आशियाचा प्रमुख सुरक्षा पुरवठादार म्हणून घोषित केले होते, आणि हा दावा अन्य महाशक्तींनी स्वीकारला होता”. जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर, भारताने या मे महिन्यात पाकिस्तानमधील दहशतवादी पायाभूत सुविधांविरुद्ध ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केले होते. इस्लामाबादमध्ये या वर्षाअखेरीस आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना डार यांनी असा युक्तिवाद केला की, “ऑपरेशन सिंदूर ही नवी दिल्लीच्या स्वतःला एक वर्चस्ववादी आणि निव्वळ सुरक्षा पुरवठादार म्हणून सादर करण्याच्या दाव्याची एक प्रत्यक्ष चाचणी होती.
“दक्षिण आशियामध्ये अल्लाहने पाकिस्तानला दिलेले सर्वांत मोठे यश म्हणजे चार दिवसांच्या संघर्षात पाकिस्तानी सशस्त्र दलांची कामगिरी. जगाला एक प्रखर संदेश मिळाला, कारण भारताने दावा केला होता, की ते या प्रदेशातील वर्चस्ववादी आणि सुरक्षा पुरवठादार आहेत. काही मोठ्या शक्तींनी कदाचित हा दावा स्वीकारला असेल,” असे डार म्हणाले, आणि भारताच्या लष्करी वर्चस्वाबद्दलच्या कल्पनांना आव्हान दिले गेले आहे, असेही त्यांनी नमूद केले. जरी त्यांनी कोणाचेही नाव घेतले नसले तरी, डार यांची टिप्पणी अमेरिका आणि इंडो-पॅसिफिक भागीदार, विशेषतः ‘क्वाड’ गटाला उद्देशून असल्याचे दिसत होते. क्वाड गटात भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया यांचा समावेश आहे. अलिकडच्या वर्षांत, वॉशिंग्टनने चीनचा वाढता प्रभाव रोखण्याच्या व्यापक धोरणाचा भाग म्हणून, हिंदी महासागर प्रदेशात स्थिरीकरण शक्ती म्हणून भारताच्या भूमिकेला सार्वजनिकपणे पाठिंबा दिला आहे. या वर्षाच्या सुरुवातीला एका संयुक्त अमेरिका-भारत निवेदनात अमेरिकेने त्या भूमिकेला पुन्हा एकदा दुजोरा दिला होता. मागील शिखर परिषद अमेरिकेत झाल्यानंतर या वर्षी ‘क्वाड’ नेत्यांची शिखर परिषद भारतामध्ये होणार होती, परंतु ती अद्याप नियोजित झालेली नाही.
ऑपरेशन सिंदूरमुळे अनेक धारणा बदलल्याचा दावा डार यांनी केला. मे महिन्याच्या सुरुवातीला युद्धविराम जाहीर होण्यापूर्वी, भारत आणि पाकिस्तान 87 तास हवाई आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांसह संघर्षात अडकले होते. “पाकिस्तान एक मुत्सद्देगिरीच्या दृष्टीने एकाकी पडलेला देश म्हणून ओळखला जात होता, ती धारणा आता बदलली आहे.”
‘उम्माचे नेतृत्व करण्यास सज्ज’
धारणेतील या बदलाचे श्रेय डार यांनी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या नेतृत्वाखालील तत्त्वनिष्ठ, सक्रिय आणि परिणामकारक मुत्सद्देगिरीला दिले. ते म्हणाले की, संकटाच्या काळात परदेशी राजधान्यांशी संवाद साधण्यात आला, आणि दावा केला, की 7 मे रोजी शत्रुत्व वाढण्यापूर्वी आणि नंतर पंतप्रधानांनी 60 हून अधिक आंतरराष्ट्रीय समकक्षांशी संवाद साधला होता. संघर्षाच्या आधीच्या घटनाक्रमाची आठवण करून देताना, डार म्हणाले, की 9 मे रोजी रात्री उशिरा झालेल्या बैठकीत पाकिस्तानच्या नागरी आणि लष्करी नेतृत्वाने महत्त्वाच्या निर्णयांना मंजुरी दिली. ते म्हणाले की, “त्यानंतर भारताने 10 मे रोजी पहाटे नूर खान हवाई तळावर हल्ला करून चूक केली, ज्यामुळे पाकिस्तानने प्रत्युत्तरादाखल कारवाई केली”.
डार यांनी असाही दावा केला की, भारतीय हद्दीत पाकिस्तानी हल्ल्यांबद्दलचे भारताचे दावे आंतरराष्ट्रीय समुदायाला पटवून देऊ शकले नाहीत. ते म्हणाले की, त्यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या पाच स्थायी सदस्यांपैकी एकाला आव्हान दिले आणि असा युक्तिवाद केला, की डिजिटल युगात असे दावे लपवता येणार नाहीत. “त्यांनी मला 16 किंवा 17 तासांनंतर परत फोन केला आणि सांगितले की आम्ही भारतात कुठेही हल्ला केलेला नाही,” असे ते म्हणाले. डार यांच्या मते, महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय घटकांच्या हस्तक्षेपानंतर तणाव कमी झाला. ते म्हणाले की, अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ यांनी त्यांना एका सकाळी लवकर फोन करून सांगितले की भारत युद्धविरामासाठी तयार आहे आणि पाकिस्तान सहमत होईल का असे विचारले. “मी त्यांना सांगितले की आम्हाला कधीच युद्ध नको होते. सौदीचे परराष्ट्र मंत्री प्रिन्स फैसल यांनी नवी दिल्लीशी थेट बोलल्यानंतर भारताने युद्धविराम स्वीकारल्याची पुष्टी केली”. डार यांनी असा युक्तिवाद केला की, या प्रकरणामुळे पाकिस्तानच्या लष्करी आणि संरक्षण क्षमतेची विश्वासार्हता वाढली. “हे सिद्ध झाले आहे की पाकिस्तानचे सशस्त्र दल, त्याचे तंत्रज्ञान आणि संरक्षणाची क्षमता खूप मजबूत आहे,” असे ते म्हणाले.
डार यांनी सुरक्षा विश्वासार्हतेचा संबंध आर्थिक सामर्थ्याशी जोडला आणि म्हणाले, की पाकिस्तानच्या अणु आणि क्षेपणास्त्र क्षमतेशी आर्थिक शक्तीची बरोबरी साधली पाहिजे. देशातील खनिज संपत्ती आणि ऊर्जा संसाधनांकडे लक्ष वेधत ते म्हणाले, की, “पंतप्रधान शरीफ यांच्या नेतृत्वाखालील आर्थिक पुनरुज्जीवनामुळे पाकिस्तान मुस्लिम जगात मोठी भूमिका बजावू शकेल. आम्ही उम्माचे नेतृत्व करू शकू.”

Recent Comments