नवी दिल्ली: ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी दुबईतील एका कॉन्सर्टमधील एका व्हायरल क्षणाने सरत्या वर्षाला निरोप दिला. 91 वर्षीय आशाताईंनी ‘बॅड न्यूझ’ या चित्रपटातील करण औजला यांनी गायलेले ‘तौबा तौबा’ गाणे सादर करून उपस्थितांची मने जिंकली. पांढऱ्या रंगाची साडी परिधान करून, भोसले यांनी गाणे गायले आणि चित्रपटातील अभिनेता विकी कौशलचे ‘सिग्नेचर स्टेप’देखील करून दाखवली.
अमेझॉन प्राइम व्हिडिओच्या अधिकृत खात्याने या कार्यक्रमाचे कौतुक करत पोस्ट केले की, “2024 आम्हाला आश्चर्यचकित करण्यात अपयशी ठरले नाही,”. आशा भोसले आणि सोनू निगम लेगसी कॉन्सर्टमध्ये रविवारी आशा भोसले यांनी सादरीकरण केले.
‘संगीताची देवी’
औजला यांचे गाणे आणि विकी कौशलचा नाच खूप हिट झाला. लोकांनी कौशलची ‘हुक स्टेप’ करून रील्स बनवायलाही सुरुवात केली. आशाताईंचा व्हिडिओ ऑनलाइन शेअर केल्यानंतर, लोकांनी करण औजलाला व्हिडिओवर टॅग केले आणि त्यानेही त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर भावनिक प्रतिसाद दिला.
“संगीताची देवी, नुकताच केला तौबा तौबा…! या गाण्याला केवळ चाहत्यांमध्येच नव्हे तर संगीत कलाकारांमध्येही खूप प्रेम आणि मान्यता मिळाली आहे, पण हा क्षण खरोखरच प्रतिष्ठित आहे आणि तो मी कधीही विसरणार नाही. मी खरोखर धन्य आणि आभारी आहे. ” असे त्याने लिहिले. त्याने मजकुरासह रीलदेखील शेअर केले. “मी ते गाणे 27 व्या वर्षी लिहिले होते. त्यांनी वयाच्या 91 व्या वर्षीही ते उत्तम गायले आहे.” अशी कॅप्शन त्याने दिली.
औजला सध्या त्याच्या ‘इट वॉज ऑल अ ड्रीम’ टूरसाठी देशाच्या दौऱ्यावर आहे आणि काल रात्री जयपूरमध्ये त्याने कार्यक्रम केला.
Recent Comments