नवी दिल्ली: अभिनेता विक्रांत मॅस्सीने चित्रपटसृष्टीतून निवृत्त होत असल्याच्या घोषणेने चाहत्यांना धक्का बसला आहे. हा ’12वी फेल’ फेम स्टार फक्त 37 वर्षांचा आहे आणि त्याची कारकीर्द 50 पेक्षा कमी चित्रपटांपुरती मर्यादित आहे. व्यापार विश्लेषक रोहित जसवाल म्हणाले, “पुढील पाच वर्षांत पुढचा ‘इरफान खान’ होण्याची त्याच्यात क्षमता होती. सोशल मीडियावर निवृत्तीची अधिकृत घोषणा करणारा मॅसी हा पहिला बॉलिवूड स्टार आहे. 2025 हे चित्रपटसृष्टीतील माझे शेवटचे वर्ष असेल,असे तो म्हणाला आहे.
“गेली काही वर्षे आणि त्यापुढील काळ अभूतपूर्व आहे. तुम्ही कायमच भरभरून दिलेल्या पाठिंब्याबद्दल मी तुमच्यापैकी प्रत्येकाचे आभार मानतो,” असे मॅस्सीने समाजमाध्यमांवरील पोस्टमध्ये लिहिले आहे.
व्यापार विश्लेषक, चाहते आणि समीक्षक आशा करत आहेत तो भविष्यात पुनरागमन करेल. चित्रपट समीक्षक रमेश बाला यांचे मत आहे की मॅस्सी 2027 पर्यंत मनोरंजन उद्योगात परत येऊ शकतो. पूर्वी, आमिर खान आणि शाहरुख खान सारख्या स्टार्सनीदेखील ब्रेक घेतला होता, परंतु काही काळानंतर ते परत आले” असेही बाला म्हणाले. “मॅस्सीला कुटुंबासोबत काही काळ शांतपणे व्यतीत करायचा आहे, थोडा वेळ लागेल पण ही कायमची निवृत्ती नाही, असा माझा अंदाज आहे” असे ते म्हणतात.
‘द साबरमती रिपोर्ट’नंतर….
2002 च्या गोध्रा ट्रेन जाळण्याच्या घटनेवर आधारित, नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘द साबरमती रिपोर्ट’ या चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर मॅस्सीने हा निर्णय घेतला अशी चर्चा आहे. 50 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने थिएटरमध्ये तीन वीकेंड्सनंतर केवळ 30 कोटी रुपयांची कमाई केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी दुपारी हा चित्रपट पाहणार आहेत. ‘द साबरमती रिपोर्ट’च्या आधी, ‘फिर आयी हसीन दिलरुबा’मधील त्याच्या अभिनयासाठी मॅस्सीने प्रशंसा मिळवली आणि विधू विनोद चोप्राच्या ’12th फेल’मधील मनोज कुमार शर्माच्या भूमिकेसाठी 2024 क्रिटिक्स चॉईस अवॉर्ड्समध्ये त्याला ‘सर्वोत्कृष्ट अभिनेता’ म्हणून गौरवण्यात आले.
त्याच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये, अभिनेत्याने नमूद केले की त्याचे आणखी दोन चित्रपट प्रलंबित आहेत – ‘यार जिगरी’ आणि ‘आंखों की गुस्ताखियां’. हे दोन्ही चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहेत.
15 वर्षांची मजल
मॅसी 15 वर्षांपासून मनोरंजन उद्योगाचा एक भाग आहे. डिस्नेच्या धूम मचाओ धूम (2007) मध्ये त्याच्या टेलिव्हिजन पदार्पणानंतर, तो ‘बालिका वधू’ आणि ‘धरम वीर’सारख्या सिरियल्समध्ये झळकला. मॅस्सीने रणवीर सिंग आणि सोनाक्षी सिन्हा अभिनीत विक्रमादित्य मोटवानेच्या लुटेरामधून (2013) मधून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्याने प्रथम अभिनेत्री कोंकणा सेन शर्मा दिग्दर्शित ‘डेथ इन द गुंज’मध्ये (2017) मुख्य भूमिकेत काम केले. ब्रोकन बट ब्यूटीफुल (2018), मिर्झापूर (2018) आणि क्रिमिनल जस्टिस (2019) मधील कामगिरीसह ओटीटी प्लॅटफॉर्मवरील सिरीज हा त्याच्या कारकिर्दीतील टर्निंग पॉइंट ठरला.
जसवाल म्हणाले, “हा प्रवास विलक्षण आहे. त्याने जे काही साध्य केले आहे ते केवळ त्याच्या प्रतिभा आणि मेहनतीमुळे आहे. कोणत्याही वादामुळे त्याला यश मिळाले नाही किंवा तो प्रकाशझोतात आला नाही.”
Recent Comments