भोपाळ: विकी कौशल अभिनीत ‘छावा’ चित्रपटापासून प्रेरित होऊन, जमिनीखाली लपलेला शिवकालीन प्राचीन खजिना शोधण्यासाठी असीरगढ किल्ल्याकडे जाणाऱ्या लोकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली. या आठवड्याच्या सुरुवातीला, सोशल मीडियावर लोक मेटल डिटेक्टर, टॉर्च आणि नांगर घेऊन अंधारातून असीरगढ किल्ल्याजवळील शेतात उतरतानाचे व्हिडिओ समोर आले. दुसऱ्या दिवशी हे प्रकरण जिल्हा प्रशासनापर्यंत पोहोचताच, बुऱ्हाणपूर जिल्हा दंडाधिकारी (डीएम) हर्ष सिंह यांनी नेपानगरच्या उपविभागीय दंडाधिकारी (एसडीएम) यांना चौकशीसाठी पाठवले. सिंह यांनी ‘द प्रिंट’ला सांगितले की, ”एसडीएमला घटनास्थळी पोहोचताच, शेतात बरेच खड्डे खणले गेल्याचे आढळले”.

“ज्या जमिनीवर उत्खनन करण्यात आले, ती हसन नावाच्या व्यक्तीच्या खाजगी मालकीची आहे. लोकांना सोन्याची नाणी सापडल्याच्या अनेक कथा आहेत, परंतु आम्ही एसडीएमच्या अधिकृत अहवालाची वाट पाहत आहोत. जर लोकांना ही नाणी सापडली असतील तर ती राज्य पुरातत्व विभागाची मालमत्ता आहे आणि आम्ही नाणी, कलावस्तू शोधण्यासाठी एएसआय टीमशी संपर्क साधू आणि कदाचित त्या भागात नियंत्रित उत्खनन करू,” असे सिंह यांनी सांगितले. त्यांच्या मते, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या हौशी उत्खननाचे व्हिडिओ दोन वेगवेगळ्या घटनांमधील आहेत – पहिली घटना सुमारे पाच महिन्यांपूर्वीची आहे, जेव्हा असीरगढ किल्ल्याजवळून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामादरम्यान प्राचीन नाणी सापडल्याचे म्हटले जात होते. तर दुसरा व्हिडिओ सुमारे एक आठवड्यापूर्वीचा आहे.

पाच महिन्यांपूर्वी नाणी सापडल्यानंतर, स्थानिक लोक सोन्याची नाणी शोधण्यासाठी अनेकदा असीरगढ किल्ल्याभोवती असलेल्या शेतांकडे वळत असत – जिल्हा प्रशासनाने त्याविरुद्ध कडक इशारादेखील दिला होता. संबंधित जमिनीच्या मालकाने जिल्हा प्रशासनाला असेही कळवले की, गव्हाचे पीक काढल्यानंतर लगेचच उत्खनन पुन्हा सुरू झाले.
रविवारी, जिल्हा अधिकाऱ्यांचे एक पथक, एसडीएम आणि तहसीलदारांसह असीरगढ गावात पोहोचले आणि स्थानिक ग्रामस्थांना त्यांनी शोधून काढलेल्या कोणत्याही कलावस्तू किंवा नाणी त्यांच्याकडे सोपवण्याची विनंती केली. गावकऱ्यांना उत्खननासाठी शेतात न जाण्याचे निर्देशही देण्यात आले. असीरगढ गावाचे सरपंच धर्मेंद्र प्रधान यांनी रविवारी माध्यमांना सांगितले, की ते शेतात रात्रीची गस्त घालतील. “आम्ही ग्रामस्थांना शेतात सापडणारी कोणतीही वस्तू आमच्याकडे सोपवण्याची विनंती करू. यापुढे खोदकाम करण्याची परवानगी दिली जाणार नाही,” असे ते म्हणाले. असीरगढच्या इतिहासाबद्दल बोलताना, जिल्हा पुरातत्व पर्यटन आणि सांस्कृतिक परिषदेचे सदस्य कमरुद्दीन फलक यांनी ‘द प्रिंट’ला सांगितले की, बुऱ्हाणपूर हे मुघलांचे दक्षिण भारतावर राज्य करण्यासाठीचे सत्ताकेंद्र होते.
“मुघलांसाठी दिल्लीनंतर ते दुसरे राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे शहर होते.” बुऱ्हाणपूरमध्ये दोन टांकसाळ होत्या. पण संभाजी महाराजांनी हल्ला केल्यानंतर, त्यांनी शहर लुटले आणि परत गेले. तेव्हा अनेकांनी त्यांची संपत्ती जमिनीखाली गाडली असे मानले जाते,” असे कमरुद्दीन म्हणाले. गेल्या वर्षी नाण्यांच्या शोधाबद्दल ते म्हणाले, “सुमारे सहा महिन्यांपूर्वी नाण्यांनी भरलेले एक भांडे सापडले होते, आणि कधीकधी लोकांनी जमिनीखालील इतर कलावस्तूंसह मातीची भांडी सापडल्याचे सांगितले आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामादरम्यान सापडलेल्या या नाण्यांवर ‘जरब-ए-बुरहानपूर’ आणि ‘जरब-ए-असीर’ हे पर्शियन शब्द कोरलेले होते, ज्याचे भाषांतर होते- मूलतः बुरहानपूर टांकसाळ किंवा असीरगढ टांकसाळ. ” कमरुद्दीन यांनी सरकारला खूप मोठ्या ऐतिहासिक मूल्याच्या या कलाकृती जतन करण्याचे आवाहन केले.
उत्खननाच्या ठिकाणापासून सुमारे 800 मीटर अंतरावर असलेल्या असीरगढ हायस्कूलचे मुख्याध्यापक नितीन पराशर यांनीही सांगितले, की विद्यार्थी अनेकदा या शेतात नाणी सापडल्याची चर्चा करतात. “बऱ्याच स्थानिक धनगरांकडे कांस्य नाणी आढळतात आणि ती त्यांना शेतात सापडली असे ते सांगतात. शाळेजवळ दोन मंदिरे होती आणि स्थानिकांनी सोन्याच्या नाण्यांच्या शोधात त्याखाली खोदकामही केले आहे.” पराशर म्हणाले.
Recent Comments