बारामती: बुधवारी सकाळी सदाशिव रघु आपल्या शेताकडे जात असताना, त्यांना वाटत होते, की हा नेहमीप्रमाणेच सामान्य दिवस असेल. त्यांचे घर बारामती विमानतळाच्या जवळ असल्याने, अधूनमधून विमान उतरण्याचा आवाज येणे ही त्यांच्यासाठी काही वेगळी गोष्ट नव्हती. विमानतळाजवळ काहीशी लगबग सुरू होती, कारण 5 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या प्रचारासाठी बारामतीमध्ये येणारे आपले नेते, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वागताची तयारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (एनसीपी) कार्यकर्ते करत होते.
“विमान उतरताना कसा आवाज येतो, हे आम्हाला माहीत आहे. हा आवाज तसा नव्हता, आणि आम्हाला काही कळायच्या आतच एक मोठा स्फोट झाला आणि आमच्या पायाखालची जमीन थोडी हादरली,” असे रघु म्हणाले. पवार आणि इतर चार जण—त्यांचे वैयक्तिक सुरक्षा अधिकारी विदीप जाधव, फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी, कॅप्टन सुमित कपूर आणि सह-वैमानिक कॅप्टन शांभवी पाठक यांचा जागीच मृत्यू झाल्याचे जाहीर करण्यात आले. विमानाने धावपट्टी चुकवली आणि ते बाजूला कोसळले, ज्यामुळे मोठा आगडोंब उसळला आणि धुराचे लोट सर्वत्र पसरले. हे विमान सकाळी 8.10 वाजता मुंबईहून निघाले होते आणि सुमारे 8.50 वाजता कोसळल्याचे सांगण्यात आले. अपघातस्थळाजवळ राहणाऱ्या लोकांनी सांगितले की, विमानाने धावपट्टीवर उतरण्याचा प्रयत्न केला, परंतु तो यशस्वी झाला नाही. त्यानंतर त्याने पुन्हा प्रयत्न करण्यापूर्वी एक चक्कर मारली. अपघातस्थळापासून 50 पावलांपेक्षा कमी अंतरावर राहणारे स्थानिक लोकच सर्वात आधी मदतीसाठी धावले.
‘द प्रिंट’शी बोलताना कमला कैलाश अटले म्हणाल्या, “आम्ही सकाळी आमची कामे करत असताना आम्हाला मोठा आवाज ऐकू आला. ज्वाला आणि धूर वेगाने पसरताना दिसला. आम्ही पाणी आणि ब्लँकेट घेऊन तिकडे धावलो. दोन मृतदेह घटनास्थळापासून काही अंतरावर पडले होते. अपघाताच्या वेळी ते विमानातून बाहेर फेकले गेल्यासारखे दिसत होते. अग्निशमन दलाचे वाहन आमच्यानंतर फक्त 5 मिनिटांनी पोहोचले, पण त्या लोकांना कोणीही वाचवू शकले नसते.” त्या पुढे म्हणाल्या, “आम्ही तिथे पोहोचलो तेव्हा आम्हाला माहीत नव्हते, की दादा (अजित पवार) या लोकांपैकी एक आहेत. आम्ही फक्त लोकांना वाचवण्याचा प्रयत्न करत होतो. नंतर आम्हाला कळले, की ते त्याच विमानात होते. पण कोणता मृतदेह कोणाचा आहे, हे आम्हाला ओळखता आले नाही, कारण सर्व चेहरे जळले होते.” नाव उघड न करण्याची इच्छा असलेल्या अग्निशमन दलाच्या एका अधिकाऱ्याने ‘द प्रिंट’ला सांगितले, “जेव्हा आम्ही घटनास्थळी पोहोचलो, तेव्हा ग्रामस्थांच्या सुरुवातीच्या प्रयत्नांमुळे धूर आणि आग शांत झाल्यासारखी दिसत होती. आग पूर्णपणे विझवण्यासाठी आम्हाला 20 मिनिटे लागली.”
वरिष्ठ फॉरेन्सिक अधिकारी दुपारी 2.30 वाजता अपघातस्थळी पोहोचले आणि दुपारी 3 वाजता पाहणी करून तेथून रवाना झाले. 1991 पासून अजित पवार ज्या बारामती मतदारसंघाचे विधानसभेत प्रतिनिधित्व करत आहेत, तेथील लोक शोकाकुल, भावनाविवश आणि त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी गर्दी करत असल्याने, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पार्थिव बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर आणण्यात आले आहे. त्यांच्यावर गुरुवारी सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येतील.

Recent Comments