scorecardresearch
Thursday, 25 December, 2025
घरराजकारणबिहार निवडणूक निकाल : 'जदयू'चे अनंत सिंह मोकामा येथून आघाडीवर

बिहार निवडणूक निकाल : ‘जदयू’चे अनंत सिंह मोकामा येथून आघाडीवर

शुक्रवारी सकाळी 11 वाजता निवडणूक आयोगाने दिलेल्या आकडेवारीनुसार मोकामा येथील जद(यू) उमेदवार सिंग हे त्यांच्या जवळच्या प्रतिस्पर्धी 'राजद'च्या वीणा देवी यांच्यापेक्षा 11 हजार 20 हून जास्त मतांनी आघाडीवर होते.

नवी दिल्ली: एका हत्येसंदर्भात अनंत सिंग यांना मध्यरात्री नाट्यमयरीत्या अटक झाली होती. पण त्यामुळे सिंग यांच्या निवडणूक यशावर फारसा परिणाम झाला नाही. शुक्रवारी सकाळी 11 वाजता निवडणूक आयोगाने दिलेल्या आकडेवारीनुसार मोकामा येथील जद(यू) उमेदवार सिंग हे त्यांच्या जवळच्या प्रतिस्पर्धी ‘राजद’च्या वीणा देवी यांच्यापेक्षा 11 हजार 20 हून जास्त मतांनी आघाडीवर होते. सिंग यांना 26 हजार 229 मते मिळाली, तर देवी यांना 15 हजार 174 मते मिळाली. तोपर्यंत 25 पैकी फक्त आठ फेऱ्यांमध्ये मतमोजणी पूर्ण झाली. जर हा कल कायम राहिला तर बिहार विधानसभा मतदारसंघातून सिंग यांचा हा सलग सहावा विजय असेल.

जन सुराज पक्षाच्या (जेएसपी) उमेदवारासाठी प्रचार करणारे दुलार चंद यादव यांची भांडणानंतर हत्या झाली तेव्हा ते उपस्थित होते, असा आरोप बिहार पोलिसांनी केल्यानंतर 2 नोव्हेंबर रोजी सिंग यांना अटक करण्यात आली. मोकामा येथील विजय हा सिंग यांनी तुरुंगातून लढवलेली सलग तिसरी विधानसभा निवडणूक असेल. 2015 च्या निवडणुकीत यादव समुदायाच्या एका तरुण सदस्याच्या हत्येप्रकरणी अटक झाल्यानंतर त्यांना तुरुंगात टाकण्यात आले होते. त्यावेळी सत्ताधारी जनता दल (युनायटेड) आणि राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) यांच्यात युती होती. 2020 मध्ये, पोलिसांनी नदवान गावातील त्यांच्या वडिलोपार्जित घरातून शस्त्रास्त्रे आणि दारूगोळ्याचा मोठा साठा जप्त केल्यानंतर, त्यांनी तुरुंगातून प्रचार केला. जद(यू) नेते सिंग हे ५० हून अधिक प्रकरणांमध्ये आरोपी आहेत.

या निवडणुकीत सिंग यांची लोकप्रियता केंद्रीय मंत्री राजीव रंजन सिंग यांच्यामुळे आहे, ज्यांना लालन सिंग म्हणूनही ओळखले जाते, ज्यांनी अटकेनंतर त्यांच्या प्रचाराची जबाबदारी स्वीकारली. सिंग यांना न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर दुसऱ्याच दिवशी, लालन यांनी मोकामा येथे रस्त्यावर उतरून पक्ष कार्यकर्त्यांना आवाहन केले. “प्रत्येक व्यक्तीने अनंत सिंग म्हणून निवडणूक लढवावी,” असे लालन यांनी पक्ष कार्यकर्त्यांना सांगितले. “अनंत बाबू बाहेर असताना माझ्या जबाबदाऱ्या कमी होत्या, पण आता ते तुरुंगात असल्याने माझ्या जबाबदाऱ्या आणखी वाढल्या आहेत. आजपासून मी मोकामाची कमान माझ्या हातात घेतली आहे. अनंत सिंग यांच्या अटकेमागे कट असल्याचे मला म्हणायलाच हवे. पोलिस या प्रकरणाची चौकशी करत असून, सत्य लवकरच बाहेर येईल आणि लोकांना कट रचणाऱ्यांबद्दलही माहिती मिळेल,” असे ते म्हणाले होते. परंतु “काही लोकांना मतदानाच्या दिवशी बाहेर येण्यापासून रोखण्याची गरज होती” असे म्हणताना लालन यांच्या प्रचार मोहिमेवर वाद झाला. परिणामी पाटणा पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध आदर्श आचारसंहिता उल्लंघनाचा गुन्हा दाखल केला.

“छोटे सरकार” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अनंत सिंग यांनी गेल्या वर्षीच्या लोकसभा निवडणुकीत लालन यांच्यासाठी प्रचार केला होता, जेव्हा मंत्री मुंगेरमध्ये अशोक महतो यांच्याकडून कठीण स्पर्धा झाली होती. सिंग यांना निवडणुकीच्या मध्यात ‘जमीन वाद’ सोडवण्यासाठी पॅरोलवर सोडण्यात आले होते, परंतु बाहेर पडल्यानंतर त्यांनी स्पष्ट केले, की त्यांचा लालन यांच्यासाठी प्रचार करण्याचा हेतू आहे.

संबंधित लेख

चुकवू नका

Recent Comments