scorecardresearch
Friday, 13 February, 2026
घरदेशइंफाळ-दिमापूर राष्ट्रीय महामार्ग-2 सुरू, मात्र वांशिक संघर्ष कायमच

इंफाळ-दिमापूर राष्ट्रीय महामार्ग-2 सुरू, मात्र वांशिक संघर्ष कायमच

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 13 सप्टेंबरपासून सुरू झालेल्या मणिपूर दौऱ्यापूर्वी केंद्र सरकारने राष्ट्रीय महामार्ग 2 वर प्रवाशांना मुक्तपणे प्रवास करण्याची घोषणा केली. परंतु पंतप्रधानांच्या भेटीनंतर फारसा बदल झालेला दिसत नाही.

इंफाळ: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 13 सप्टेंबरपासून सुरू झालेल्या मणिपूर दौऱ्यापूर्वी केंद्र सरकारने राष्ट्रीय महामार्ग 2 वर प्रवाशांना मुक्तपणे प्रवास करण्याची घोषणा केली. हा महामार्ग इंफाळला नागालँडमधील दिमापूरशी जोडतो आणि राज्याच्या जीवनरेषांपैकी एक मानला जातो. आदिवासी समुदायांची सर्वोच्च संस्था असलेल्या कुकी-झो परिषदेच्या नेत्यांसोबत दिल्लीत झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. परंतु पंतप्रधानांच्या भेटीनंतर – मे 2023 मध्ये मैतेई आणि कुकी-झो समुदायांमध्ये हिंसाचार उसळल्यानंतरच्या पहिल्याच टप्प्यावर फारसा बदल झालेला दिसत नाही. खोऱ्यातील जिल्ह्यांमध्ये राहणारे बिगर-आदिवासी मैतेई आणि डोंगरांवर राहणारे आदिवासी कुकी-झो, सुरक्षेच्या कारणास्तव महामार्गापासून दूर राहतात.

तथापि, नागा आणि नेपाळींसह इतर समुदायांचे प्रवासी एनएच-2 वर नियमितपणे प्रवास करत आहेत, जो आसाममधील दिब्रुगडजवळील एनएच-15 च्या जंक्शनपासून सुरू होतो आणि मिझोराममध्ये संपण्यापूर्वी नागालँड आणि मणिपूरमधून जातो. दोन्ही समुदायाबाहेरील लोकांकडून चालवली जाणारी व्यावसायिक आणि मालवाहू वाहनेदेखील नियमितपणे धावत आहेत. 2023 मध्ये वांशिक संघर्ष सुरू झाल्यापासून, मैतेई लोकांनी कांगपोक्पी या डोंगराळ जिल्ह्यातून दिमापूरला जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग-2 चा वापर करणे बंद केले आहे. यामुळे त्यांच्याकडे मणिपूरच्या बाहेर जाण्यासाठी विमानाने प्रवास करण्याशिवाय पर्याय उरला नाही, जे अनेकांना परवडणारे नाही.

त्याचप्रमाणे, सुरक्षेच्या कारणास्तव, कांगपोक्पी सीमेपासून इम्फाळपर्यंतच्या राष्ट्रीय महामार्ग-2 च्या पट्ट्यावर कुकी-झो प्रवास करत नाहीत. जर त्यांना मणिपूरच्या बाहेर प्रवास करायचा असेल तर, इम्फाळ विमानतळापर्यंत 40 मिनिटांच्या ड्राईव्हऐवजी, त्यांना दिमापूरला पोहोचण्यासाठी खड्डेमय महामार्गावरून सात-आठ तासांचा प्रवास करावा लागतो.

कांगपोक्पी गावाची सीमा ओलांडणारे ट्रक | प्रवीण जैन | द प्रिंट
कांगपोक्पी गावाची सीमा ओलांडणारे ट्रक | प्रवीण जैन | द प्रिंट

मे 2023 नंतर केंद्र सरकारने राष्ट्रीय महामार्ग-2 पुन्हा सुरू करण्याचा आणि दोन्ही समुदायांच्या लोकांना मुक्तपणे प्रवास करण्यास परवानगी देण्याचा प्रयत्न करण्याची ही तिसरी वेळ आहे. पहिला प्रयत्न डिसेंबर 2023 मध्ये करण्यात आला होता, जो यशस्वी झाला नाही. “त्या वेळी परिस्थिती अनुकूल नव्हती आणि मुक्त हालचालींना परवानगी देण्याची योजना यशस्वी झाली नाही,” असे इंफाळमधील एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. “8 मार्च रोजी राज्य प्रशासनाने इम्फाळहून कांगपोक्पीला बस चालवण्याचा प्रयत्न केला तेव्हा आणखी एक प्रयत्न करण्यात आला. परंतु तो निर्णय उलटला. परिस्थिती बिकट झाली आणि आम्हाला बळाचा वापर करावा लागला. एक व्यक्ती ठार झाली,” असे अधिकारी म्हणाले. तेव्हापासून, दोन्ही समुदायांनी एकमेकांच्या प्रदेशातून प्रवास करणे टाळले आहे.

वांशिक संघर्षानंतर इम्फाळ-कांगपोक्पी सीमेवर सुरक्षा दलांनी तैनात केलेला एक अनधिकृत “बफर झोन” तयार करण्यात आला होता, ज्यामुळे दोन्ही समुदायांच्या सीमा निश्चित झाल्या. कुकी-झो लोक जिथे राहतात तिथे प्रवेश करण्यासाठी मैतेई  लोक बफर झोन ओलांडत नाहीत, तर कुकी-झो लोक मैतेई भागात जात नाहीत. बफर झोनमधील सुरक्षा व्यवस्था आता बरीच कमी झाली आहे, परंतु मैतेई कुकी-झो क्षेत्रात जाणार नाहीत आणि कुकी झोही मैतेई क्षेत्रात जाणार नाहीत. असा अलिखित नियम कायम आहे, असे कांगपोक्पी जिल्ह्यातील एका पोलिस अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर ‘द प्रिंट’ला सांगितले. “दोन्ही समुदायातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. विश्वासाची कमतरता दूर करण्यासाठी वेळ लागेल.” असेही ते म्हणाले.

मणिपूरमधील वांशिक संघर्षामुळे 200 हून अधिक लोकांचा बळी गेला आणि 60 हजारहून अधिक लोक विस्थापित झाले.  मैतेई लोक जिथे राहतात, त्या खोऱ्यातील जिल्ह्यांमधून कुकी-झो लोक पळून गेले आहेत, तर मैतेई लोक डोंगरातून पळून गेले आहेत. सध्या, दोन्ही समुदायाबाहेरील लोकांकडून चालणारी मालवाहतूक आणि व्यावसायिक वाहने मुक्तपणे धावत असली तरी, खाजगी बस आणि मैतेई किंवा कुकी-झो प्रवाशांना घेऊन जाणारी वाहने त्यांच्या संबंधित भागात मर्यादित आहेत. “गेल्या दोन वर्षांहून अधिक काळ असेच आहे. सुरक्षेच्या कारणास्तव, मी माझी बस बफर झोनच्या दुसऱ्या बाजूला नेऊन गमगीफाईमध्ये प्रवेश करण्याचा कोणताही मार्ग नाही, जिथून कुकी-झो क्षेत्र सुरू होते. मला मारले जाईल आणि माझे प्रवासीही मारले जातील,” असे कांगपोक्पी जिल्हा सुरू होण्यापूर्वी पश्चिम इम्फाळमधील कांगलाटोम्बी शहरातील मैतेई बस चालक सोमेन सिंग म्हणाले.

मैतेई प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसचा चालक सोमेन सिंग | प्रवीण जैन | द प्रिंट
मैतेई प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसचा चालक सोमेन सिंग | प्रवीण जैन | द प्रिंट

रविवारी, डझनभर खाजगी प्रवासी बसेसनी कांगलाटोंबीहून इम्फाळला मैतेई प्रवाशांना नेण्यात आले. हा 20 किमीचा प्रवास 50 रुपये खर्चाचा आहे. “एखाद्याला मणिपूरच्या बाहेर प्रवास करायचा असेल तर त्याला इम्फाळ विमानतळावरून विमानाने जावे लागते. दुसरा कोणताही मार्ग नाही. हिंसाचार सुरू होण्यापूर्वी, कांगपोक्पी मार्गे दिमापूरला रस्त्याने प्रवास करता येत होता. पण आता ते शक्य नाही,” असे कांगलाटोंबी येथील आणखी एक मैतेई ड्रायव्हर बिजेश्वर सिंग म्हणतात.

कांगलाटोंगबी गावात बसमध्ये बसलेले मेईती प्रवासी इम्फाळला प्रवास करताना | प्रवीण जैन | द प्रिंट
कांगलाटोंगबी गावात बसमध्ये बसलेले मेईती प्रवासी इम्फाळला प्रवास करताना | प्रवीण जैन | द प्रिंट

कांगपोकपी या डोंगराळ जिल्ह्यात राहणाऱ्या आदिवासी समुदायांचीही अशीच कहाणी आहे. “वैद्यकीय आणीबाणी आली तरी, आपल्यापैकी कोणीही इम्फाळमधील रुग्णालयात जाण्याचे धाडस करणार नाही, जे फक्त 20 किमी अंतरावर आहे. आपल्याला दिमापूरला रस्त्याने जावे लागेल,” असे आदिवासी एकता समितीचे प्रवक्ते लुन किपगेन म्हणाले. “रस्त्याच्या स्थितीनुसार, कांगपोकी ते दिमापूरला जाण्यासाठी सहा ते आठ तास लागतात”, असे ते पुढे म्हणाले. “लूटमारीनंतर आमची घरे आणि मालमत्ता जळून खाक झाली. आमच्या महिला आणि बहिणींवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. या सर्वांनंतर तुम्ही आम्हाला मैतेई भागात जायला सांगता?” असे ते म्हणाले.

लुन किपगेन (उजवीकडे), आदिवासी एकता समितीचे प्रवक्ते | प्रवीण जैन | द प्रिंट
लुन किपगेन (उजवीकडे), आदिवासी एकता समितीचे प्रवक्ते | प्रवीण जैन | द प्रिंट

चुराचांदपूर ते कांगपोक्पी कामासाठी प्रवास करणाऱ्या कुकी-झोसना देखील मैतेई -बहुल भागात प्रवेश टाळण्यासाठी लांब वळसा घ्यावा लागतो. कांगपोक्पीच्या मोटबुंग येथील प्रेसिडेन्सी कॉलेजमधील सहाय्यक प्राध्यापक ल्हानेइलम बैते म्हणाल्या की, त्यांच्या राहत्या चुराचांदपूर येथून महाविद्यालयात जाणे अशक्य झाले आहे. “चुराचांदपूर ते इम्फाळ मार्गे कांगपोक्पीपर्यंत रस्त्याने जाण्यासाठी मला दोन तासांपेक्षा थोडा जास्त वेळ लागला. पण मे 2023 पासून, तो पर्याय राहिला नाही. मला मोटबुंगमधील माझ्या महाविद्यालयात पोहोचण्यासाठी सुमारे आठ तासांचा लांब पर्यायी मार्ग घ्यावा लागतो,” त्या सांगतात. “या मार्गावर खाजगी बसेस चालत नाहीत. मला बोलेरोने प्रवास करावा लागतो, ज्याचे एका दिशेने शुल्क 3 हजार रुपये आहे. दररोज असा प्रवास करणे शक्य नाही,” असेही त्या म्हणाल्या.

एका मैतेई नागरी समाज कार्यकर्त्याने द प्रिंटला सांगितले की, “पंतप्रधानांनी इंफाळमधील भाषणात मैतेई आणि कुकी-झो यांच्यातील दरी कमी करण्याबद्दल प्रतिपादन केले  आणि ते निघून गेले. परंतु इथे प्रत्यक्षात आमच्या जीवनाचे कठीण वास्तव पूर्वीसारखेच आहे. जोपर्यंत तुम्ही यावर लक्ष देत नाही तोपर्यंत गोष्टी तशाच राहतील.” ते म्हणाले.

संबंधित लेख

चुकवू नका

Recent Comments