नवी दिल्ली: दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटात सहभागी असलेल्या आय 20 कार चालवणाऱ्या कथित आत्मघातकी बॉम्बरला आश्रय दिल्याच्या आरोपावरून राष्ट्रीय तपास यंत्रणेने हरियाणाच्या एका रहिवाशाला अटक केली आहे. सोयब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या आरोपीला फरिदाबाद येथून ताब्यात घेण्यात आले आहे. फरिदाबादमध्येच डॉक्टरांच्या नेतृत्वाखालील दहशतवादी मॉड्यूल विकसित केले गेले असल्याचे म्हटले जाते.
10 नोव्हेंबर रोजी झालेल्या स्फोटात 15 जणांचा मृत्यू आणि 32 जण जखमी झाले होते. या स्फोटात अमोनियम नायट्रेट इंधन तेलाचा (एएनएफओ) वापर केला गेला होता. ते फरिदाबादच्या धौज गावातील अल फलाह स्कूल ऑफ मेडिकल सायन्सेस अँड रिसर्च सेंटरमध्ये कार्यरत असलेल्या डॉ. उमर उन नबी यांच्या नेतृत्वाखालील डॉक्टरांच्या गटाने जमा केले होते. सोयब त्याच गावातील होता आणि त्याने नबीला ‘लॉजिस्टिक सपोर्ट’ पुरवला होता, असे एनआयएच्या प्रवक्त्याने बुधवारी सांगितले. तपास आणि प्रकरणाच्या तपशीलांशी परिचित असलेल्या सूत्रांनुसार, सोयाब अल फलाह येथेही काम करत होता आणि स्फोटापूर्वी त्याने नबीला आश्रय दिल्याचा आरोप आहे. “नबी हरियाणाच्या नूह जिल्ह्यात सोयाबच्या मेव्हणीच्या घरी राहिला होता,” असे एका सूत्राने ‘द प्रिंट’ला सांगितले. “एनआयएच्या तपासात असे दिसून आले आहे, की त्याने 10 नोव्हेंबर रोजी दिल्लीतील लाल किल्ल्याबाहेर झालेल्या कार बॉम्बस्फोटापूर्वी दहशतवादी उमरला लॉजिस्टिक सपोर्ट देखील दिला होता, ज्यामध्ये अनेक लोकांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले,” असे प्रवक्त्याने निवेदनात म्हटले आहे.
एजन्सी आत्मघातकी बॉम्बस्फोटासंदर्भात विविध धागेदोरे शोधत आहे आणि या भयानक हल्ल्यात सहभागी असलेल्या इतरांची ओळख पटवण्यासाठी आणि त्यांचा माग काढण्यासाठी संबंधित पोलिस दलांशी समन्वय साधून राज्यांमध्ये शोध घेत आहे. एनआयएने यापूर्वी डॉ. नबीच्या दोन प्रमुख साथीदारांना – अमीर रशीद अली आणि जसीर बिलाल वाणी उर्फ दानिश – यांना लॉजिस्टिक सपोर्ट पुरवल्याच्या आरोपाखाली अटक केली होती. अमीर रशीद अलीला स्फोटासाठी वापरलेले वाहन नबीला पुरवल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली होती, जे त्याच्या नावाने फरिदाबाद येथील एका डीलरकडून खरेदी करण्यात आले होते. दानिशला “ड्रोनमध्ये बदल करून आणि रॉकेट बनवण्याचा प्रयत्न करून दहशतवादी हल्ले करण्यासाठी तांत्रिक मदत पुरवल्याबद्दल” अटक करण्यात आली होती.
एजन्सीने अल फलाह मेडिकल कॉलेजमध्ये डॉक्टर म्हणून काम करणाऱ्या मुझम्मिल शकील आणि शाहीन सईद यांनाही ताब्यात घेतले आहे, तसेच जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या पोस्टर्सशी संबंधित एका प्रकरणात जम्मू आणि काश्मीर पोलिसांच्या ताब्यात असलेल्या आदिल राथेर यांनाही ताब्यात घेतले आहे. स्फोटाच्या चौकशीचा भाग म्हणून एजन्सीने शोपियान येथील धर्मोपदेशक मुफ्ती इरफान अहमद वागे यांनाही दिल्लीला आणले.

Recent Comments