नवी दिल्ली: दक्षिण दिल्लीतील सीआर पार्क येथील शिकवणी केंद्रात शिकणाऱ्या 15 वर्षांच्या मुलीवर वारंवार बलात्कार आणि तिचा मानसिक छळ केल्याच्या आरोपाखाली दिल्ली पोलिसांनी गुरुवारी एका शिकवणी शिक्षकाला अटक केली. ‘द प्रिंट’शी बोलताना, दिल्ली पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने पुष्टी केली, की आरोपी अरुणव पाल याला अटक करण्यात आली आहे. पाल त्याच्या घरातून चालणाऱ्या शिकवणी केंद्रात विद्यार्थ्यांना गणित आणि विज्ञान शिकवत होता.
एका निवेदनात, पोलिस उपायुक्त (दक्षिण) अंकित चौहान म्हणाले, “मुलीने आणि तिच्या वडिलांनी 26 फेब्रुवारी (बुधवार) रोजी आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली. तिने सांगितले की ती 2022 ते 2025 पर्यंत आरोपीने आयोजित केलेल्या शिकवणी वर्गांना उपस्थित राहत होती. तिने आरोप केला, की आरोपीने शिकवणी केंद्रात तिचा अनेक वेळा मानसिक छळ केला आणि बलात्कार केला. त्याने पीडितेला धमकावले आणि भावनिकदृष्ट्या ब्लॅकमेल केले.” तक्रारीच्या आधारे, पोलिसांनी लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा, 2012 च्या कलम 6 (लैंगिक अत्याचार) आणि भारतीय न्याय संहिताच्या कलम 64 अंतर्गत एफआयआर दाखल केला.
सीआर पार्क पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीत अल्पवयीन मुलीने म्हटले आहे, की आरोपी 2022 पासून, म्हणजे ती आठवीत असल्यापासून तिच्यावर लैंगिक अत्याचार करत होता. तिने पुढे म्हटले आहे की या संपूर्ण घटनेमुळे तिला भावनिक आणि मानसिक त्रास झाला. “त्याने त्याच्या शिकवणीच्या ठिकाणी माझ्यावर अनेक वेळा बलात्कार केला आणि त्याने मला ब्लॅकमेल केले, जर मी कोणाला सांगितले तर तो मला मारहाण करेल, अशी धमकी दिली.” असे एफआयआरमध्ये म्हटले आहे.
15 वर्षीय मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आणि सध्या तिचे समुपदेशन सुरू आहे. “या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे,” असे डीसीपी चौहान यांनी द प्रिंटला सांगितले.
Recent Comments