नवी दिल्ली: पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) च्या 13 हजार 600 कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील आरोपी, हिरे व्यापारी मेहुल चोक्सीला भारतीय अधिकाऱ्यांनी औपचारिक विनंती केल्यानंतर बेल्जियम पोलिसांनी शनिवारी तात्पुरती अटक केली. केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) मधील सूत्रांनुसार, त्यांनी बेल्जियमच्या अधिकाऱ्यांना विनंती केली होती, त्यानंतर त्यांनी तात्पुरती अटक करण्यास सुरुवात केली. “काही महिन्यांपूर्वी बेल्जियमला औपचारिक प्रत्यार्पणाची विनंतीदेखील पाठवण्यात आली होती. बेल्जियममध्ये त्याचे स्थान निश्चित झाल्यानंतर आम्ही गेल्या काही महिन्यांपासून त्याच्या अटकेसाठी दबाव आणत होतो. शेवटी, बेल्जियम पोलिसांनी ते केले आणि आम्हाला कळविण्यात आले,” असे सीबीआयच्या सूत्रांनी सांगितले.
सीबीआय आणि अंमलबजावणी संचालनालय (ईडी) या दोघांनीही चोक्सीच्या परतीसाठी परराष्ट्र मंत्रालयामार्फत बेल्जियमला औपचारिक प्रत्यार्पणाची विनंती आधीच पाठवली आहे, असे सूत्रांनी सांगितले. सीबीआयमधील एका सूत्राने सांगितले की, चोक्सी त्याच्या प्रकृतीच्या कारणास्तव जामीन अर्ज करण्याची शक्यता आहे परंतु सध्या तो बेल्जियम पोलिसांच्या ताब्यात आहे. “सीबीआयच्या विनंतीवरून ही तात्पुरती अटक असल्याने, तो आता बेल्जियममध्ये कायदेशीर पर्यायांचा अवलंब करू शकतो आणि संपूर्ण प्रक्रिया तेथील न्यायालयात होईल,” असे सूत्राने सांगितले. औपचारिक प्रत्यार्पणाची विनंती पूर्ण होण्यापूर्वी देश सोडून जाण्यापासून रोखण्यासाठी तात्पुरती अटक म्हणजे एखाद्या व्यक्तीला तात्पुरते ताब्यात ठेवणे. प्रत्यार्पणाच्या प्रक्रियेतील हे पहिले पाऊल आहे.
चोक्सी हा ‘गीतांजली जेम्स’चा व्यवस्थापकीय संचालक आहे आणि नीरव मोदीचा मामादेखील आहे. चोक्सीने 1985 मध्ये त्याचे वडील चिनुभाई चोक्सी यांच्याकडून गीतांजली जेम्सचा ताबा घेतला होता. त्याने गिली, नक्षत्र, अस्मी, ददमास, माया, दिया आणि संगिनी असे ब्रँड लाँच करून एक विस्तारित उत्पादन-पोर्टफोलिओ तयार केला.
ईडीच्या म्हणण्यानुसार, मेहुल चोक्सी प्रकरणात मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (पीएमएलए) केलेल्या चौकशीत असे दिसून आले आहे, की त्याने 2014 ते 2017 दरम्यान त्याच्या सहकाऱ्यांशी आणि पीएनबीच्या बँक अधिकाऱ्यांशी संगनमत केले आणि बनावट पद्धतीने लेटर ऑफ अंडरटेकिंग (एलओयू) आणि फॉरेन लेटर ऑफ क्रेडिट मिळवले, ज्यामुळे बँकेचे 6 लाख 97 हजार 63 कोटी रुपयांचे नुकसान झाले. त्याने आयसीआयसीआय बँकेकडून कर्जही घेतले होते आणि ते कर्जही त्याने चुकीच्या पद्धतीने फेडले होते, असे ईडीने म्हटले आहे. 22 पानांच्या सीबीआय एफआयआरमध्ये पीएनबीने केवळ तीन महिन्यांत बँकांच्या परदेशी शाखांना जारी केलेल्या सर्व 143 एलओयूची माहिती नमूद केली आहे.
एफआयआरमध्ये 16 आरोपी आणि कंपन्यांची नावे नमूद केली आहेत, ज्यामध्ये कंपन्यांना एलओयू जारी करण्यात मदत करणारे अज्ञात पीएनबी अधिकारी यांचा समावेश आहे. सीबीआयला संशय आहे, की बँकेतील उच्चपदस्थांच्या संगनमताशिवाय हे शक्य झाले नसते. 2021 मध्ये, भारतीय अधिकाऱ्यांचे एक पथक चोक्सीला परत आणण्यासाठी खाजगी विमानाने डोमिनिकाला गेले होते, परंतु ते रिकाम्या हाताने परतले. चोक्सीचे वकील वेन मार्श यांनी असा दावा केला होता की अँटिग्वा पोलिसांसह भारतीयांसारखे दिसणारे काही लोक त्याचे अपहरण करत होते, आणि चोक्सीला अँटिग्वामधून बाहेर काढण्यासाठी भारतीय एजन्सींनी केलेली ही कारवाई होती, जी अयशस्वी झाली.

Recent Comments