मुंबई: मुंबईतील समुद्रकिनारी होत असलेल्या ‘प्रॉमेनेड’ची प्रतीक्षा लवकरच संपणार मुंबईच्या कोस्टल रोड ‘प्रॉमेनेड’च्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन 15 जुलैला होणारआहे. कोस्टल रोड प्रॉमेनेडचा पहिला टप्पा 15 जुलै रोजी जनतेसाठी खुला होणार आहे, ज्यामुळे मोकळ्या जागांची कमतरता भरून निघणार असून नागरिकांना दिलासा मिळणार आहे. नियोजित प्रॉमेनेडच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन गेल्या वर्षी कोस्टल रोडच्या उत्तर आणि दक्षिणेकडील लेन उघडल्यानंतर आता एक वर्षानंतर होत आहे. पहिल्या टप्प्यात प्रियदर्शिनी पार्क ते हाजी अली जंक्शन पर्यंत 3.05 किमी आणि बडोदा प्लेस ते वरळी बिंदुमाधव ठाकरे चौकापर्यंत 1.7 किमीचा मार्ग समाविष्ट आहे, असे बीएमसीच्या एका अधिकाऱ्याने ‘द प्रिंट’ला सांगितले.
“आम्हाला हे कळवण्यास आनंद होत आहे की 15 जुलैपासून हा प्रॉमेनेड जनतेसाठी खुला होणार आहे. आम्ही बांधत असलेल्या प्रॉमेनेडची एकूण लांबी 7.5 किमी आहे आणि उर्वरित भाग सप्टेंबरपर्यंत खुला केला जाईल,” असे प्रकल्पाचे निरीक्षण करणारे वरिष्ठ बीएमसी (बृहन्मुंबई महानगरपालिका) अभियंता म्हणाले. या प्रॉमेनेडची रुंदी सुमारे 15 मीटर असेल आणि त्यात लोकांसाठी सायकलिंग व जॉगिंग ट्रॅक असतील. संपूर्ण परिसरात वृक्षारोपण करून तो सजवला जाईल. “हे देशातील सर्वात लांब समुद्रकिनारी प्रॉमेनेडपैकी एक आहे,” असे अधिकाऱ्याने सांगितले. अमरसन गार्डनजवळील भुलाभाई देसाई रोड आणि बिंदू माधव ठाकरे जंक्शन येथील बीएमसीच्या पे-अँड-पार्क सुविधेवरून प्रवेश आणि निर्गमन बिंदू प्रदान केले जातील. अधिकाऱ्याने सांगितले, की प्रॉमेनेडमध्ये प्रवेश करण्यासाठी 11 अंडरपासची योजना आखली आहे, परंतु पहिल्या टप्प्यात फक्त चारच उघडले जातील. हे चार अमरसन गार्डन, महालक्ष्मी मंदिर, बिंदू माधव चौक आणि वरळी डेअरी येथे असतील. या जंक्शनवर बायो-टॉयलेटची योजनादेखील मुंबई महापालिकेने आखली आहे. बीएमसीने पार्किंगची ठिकाणेदेखील योजून ठेवली आहेत. त्यापैकी दोन वरळीच्या भागात उघडली जातील. प्रत्येक पार्किंग जागेत 225 गाड्या सामावून घेण्याची क्षमता असेल. संपूर्ण कोस्टल रोडचा एकूण खर्च 13 हजार कोटी रुपये होता आणि महापालिकेने या मार्गांवर सुमारे 35 कोटी रुपये खर्च केले आहेत. तथापि, मुसळधार पावसाचे हे काही दिवस अजूनही आव्हानात्मक आहेत. प्रियदर्शनी गार्डनजवळील बोगद्यांजवळील प्रोमेनेडच्या फुटपाथ आणि पॅरापेट भिंतीचा काही भाग गेल्या गुरुवारी लाटांनी धडकल्याने खराब झाला. लाटांची तीव्रता इतकी होती की प्रोमेनेडमधील काही टाइल्स आणि साहित्य उडून कोस्टल रोडच्या उत्तरेकडे जाणाऱ्या कॅरेजवेवर पडले.
“ही 4.75 मीटर उंचीची असामान्य भरती होती. अशा वेळी, आपल्याला खबरदारी घ्यावी लागेल. अन्यथा, कोणतीही समस्या नाही,” असे बीएमसी अधिकाऱ्याने सांगितले. गुरुवारी मुंबईत हंगामातील सर्वात जास्त भरती आली, लाटा 4.75 मीटर उंचीपर्यंत पोहोचल्या. महापालिकेने एक सूचना जारी केली होती.
Recent Comments