नवी दिल्ली: लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील प्रमुख संशयित डॉ. उमर नबीने 2017 मध्ये श्रीनगर येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालय (जीएमसी) येथून एमबीबीएस पूर्ण केले होते, अशी माहिती मिळाली आहे. सोमवारी रात्री लाल किल्ला परिसरात झालेल्या उच्च-तीव्रतेच्या स्फोटात 36 वर्षीय उमरचा मृत्यू झाल्याचे समजले आहे. तो अनंतनाग येथील जीएमसीमध्येही काम करत होता आणि आत्ता अलीकडे फरिदाबादच्या अल-फलाह स्कूल ऑफ मेडिकल सायन्सेस अँड रिसर्च सेंटरमध्ये काम करत होता, असे सूत्रांनी सांगितले. आणखी एक दहशतवादी संशयित डॉ. मुझम्मिल शकील त्याच फरिदाबाद रुग्णालयात काम करत होता.
पुलवामाचा रहिवासी असलेला नबी हा जैश-ए-मोहम्मद (जेईएम) आणि अल कायदाच्या जम्मू-काश्मीर-विशिष्ट विंग अन्सार गजवत-उल-हिंद (एजीयूएच) च्या फरिदाबाद-जम्मू आणि काश्मीर मॉड्यूलचा भाग होता. स्फोटाच्या काही तास आधी, जम्मू-काश्मीर पोलिसांनी आणि हरियाणा पोलिसांनी सोमवारी हरियाणाच्या फरीदाबाद जिल्ह्यातील फतेहपूर टागा गावात शकीलच्या भाड्याच्या जागेतून 2 हजार 500 किलो आयईडी बनवण्याचे साहित्य जप्त केले. या साठ्यात सुमारे 360 किलो अत्यंत ज्वलनशील पदार्थ, अमोनियम नायट्रेट असल्याचा संशय आहे, तसेच रसायने, अभिकर्मक, इतर ज्वलनशील पदार्थ, इलेक्ट्रॉनिक सर्किट, बॅटरी, वायर, रिमोट कंट्रोल, टायमर आणि धातूच्या ब्लँकेटचा समावेश होता. शकीलच्या आधी, आणखी एक दहशतवादी संशयित डॉ. अदील अहमद राठर पोलिसांच्या जाळ्यात सापडला होता. श्रीनगरमध्ये जैश-ए-मोहम्मदला पाठिंबा देणारे व सुरक्षा कर्मचाऱ्यांना धमक्या देणारे पोस्टर्स आढळल्यानंतर शोधमोहीम राबवून दोन्ही डॉक्टरांना अटक करण्यात आली. शकील सुमारे साडेतीन वर्षांपूर्वी जिल्ह्यात आल्यापासून फरीदाबाद रुग्णालयात शिकवत होता, तर कुलगामचा दुसरा दहशतवादी संशयित राठर उत्तर प्रदेशच्या सहारनपूरमधील रुग्णालयात तैनात होता.
या दहशतवादी मॉड्यूलचे नेतृत्व काश्मीरमधील डॉक्टरांच्या गटाने केले होते, असे तपासात उघड झाले आहे, असे सूत्रांनी सांगितले. तसेच इतर अनेक डॉक्टरांची नावेही समोर आली आहेत. “आतापर्यंत या प्रकरणात 10-12 आरोपी आहेत. त्यापैकी सहा ते सात डॉक्टर आहेत,” असे सुरक्षा यंत्रणेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटात नऊ जणांचा मृत्यू झाला तर 20 जण जखमी झाले.

Recent Comments