नवी दिल्ली: जम्मू आणि काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील बुधल तालुक्यामध्ये केवळ 45 दिवसांत 17 नागरिकांचे काही अज्ञात कारणाने मृत्यू झाले आहेत. तीन कुटुंबातील उर्वरित सदस्यांना कांडी गावातीलच एका स्वतंत्र आश्रयस्थानात हलवण्यात आले आहे. त्यांची घरे सील करण्यात आली आहेत आणि त्यांना देण्यात येणाऱ्या अन्नाचीही चाचणी केली जात आहे. जम्मू प्रशासनातील एका सूत्रानुसार, बुधलमध्ये आणखी ‘गूढ’ मृत्यू होण्याची शक्यता रोखण्यासाठी या व्यवस्था केल्या आहेत. गेल्या 45 दिवसांत बुधलमध्ये मृत्युमुखी पडलेल्या तीन परस्परसंबंधित कुटुंबातील 17 सदस्यांमध्ये तेरा मुलांचा समावेश आहे.
वैद्यकीय प्रक्रियेद्वारे विषाणू आणि जंतूंच्या संसर्गाची शक्यता नाकारण्यात आली आहे, प्राथमिक निष्कर्षांमध्ये न्यूरोटॉक्सिन हे संभाव्य कारण असल्याचे दिसून आल्याची माहिती सूत्रांनी दिली. मृत्युमुखी पडलेल्या लोकांना मृत्यूपूर्वी ताप, घाम येणे, उलट्या होणे, निर्जलीकरण, पोटदुखी आणि बेशुद्ध पडणे अशी लक्षणे दिसून आली होती. शनिवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एका आंतर-मंत्रालयीन पथकाला या गावाला भेट देण्याचे निर्देश दिले. या पथकात आरोग्य, कृषी, रसायने आणि खते, जलसंपदा मंत्रालयातील तज्ज्ञांचा समावेश असेल. रक्त, प्लाझ्मा, अन्न, पाणी आणि पर्यावरणीय नमुन्यांसह 12 हजार 500 हून अधिक नमुन्यांची तपासणी राष्ट्रीय आरोग्य संस्थांनी केली आहे, असे कळते. परंतु या मृत्यूंचे कारण अद्याप निश्चित झालेले नाही.
शुक्रवारी, कांडी गावातील झऱ्यातून घेतलेल्या नमुन्यांमध्ये काही कीटकनाशके आढळून आली, त्यानंतर कोणताही ग्रामस्थ तेथील पाणी पिणार नाही याची खातरजमा करून घेण्याचे आदेश दिले गेले आहेत. दरम्यान, जम्मू-काश्मीर पोलिसांनी या मृत्यूंची चौकशी करण्यासाठी बुधलचे पोलिस अधीक्षक (ऑपरेशन्स) वजाहत हुसेन यांच्या नेतृत्वाखाली 11 सदस्यीय विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले आहे. या पथकात फॉरेन्सिक तज्ञ, पॅथॉलॉजिस्ट आणि आरोग्य अधिकारी यांचा समावेश आहे. जम्मू आणि काश्मीरच्या आरोग्यमंत्री सकिना इटू यांनी आश्वासन दिले की सरकार या मृत्यूंचे कारण ओळखण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करत आहे. “वारंवार चाचण्या आणि देखरेख करूनही, विषारी स्त्रोत अद्याप अज्ञात आहेत,” असेही त्यांनी सांगितले आहे.
राजौरी जिल्हा मुख्यालयापासून सुमारे 60 किमी अंतरावर असलेल्या बुधल तहसीलमधील कांडी गावात हे मृत्यू झाले. बुधलची लोकसंख्या 3 हजारपेक्षा थोडी जास्त आहे आणि येथे प्रामुख्याने अनुसूचित जमाती (एसटी) राहतात, जे लोकसंख्येच्या सुमारे 65.54 टक्के आहेत.
बुधलच्या ग्रामस्थांमध्ये भीती
घटनांची ही दुःखद साखळी पहिल्यांदा 5 डिसेंबर 2024 रोजी उलगडली. तेव्हा बुधल तालुक्यातील रहिवासी फजल हुसेन आणि त्याच्या कुटुंबातील सदस्य त्यांच्या मोठ्या मुलीच्या लग्नादरम्यान सामुदायिक जेवणानंतर आजारी पडले. पोटदुखी, उलट्या आणि शुद्ध हरपणे अशी लक्षणे असलेल्या 40 वर्षीय व्यक्तीचे 7 डिसेंबर रोजी निधन झाले. कुटुंबातील आणखी चार जण, राबिया कौसर (14), रुख्खसर (11), फरमान कोसर (5) आणि रफ्तर अहमद (5) यांचा एका आठवड्यात मृत्यू झाला. 12 डिसेंबर रोजी, मोहम्मद रफिकच्या कुटुंबातील आणखी तीन मुलांचा मृत्यू झाला.
एक महिन्यानंतर, जानेवारी रोजी, दुसऱ्या सामुदायिक मेळाव्यात जेवल्यानंतर दहा जणांचे आणखी एक कुटुंब आजारी पडले. मोहम्मद अस्लमच्या कुटुंबातील या 10 सदस्यांपैकी सहा जणांचा मृत्यू झाला. शेवटचा मृत्यू 19 जानेवारी रोजी एका अल्पवयीन मुलाचा झाला होता, त्यामुळे मृतांची संख्या 17 झाली. “मोहम्मद अस्लमने त्याच्या कुटुंबातील जवळजवळ सर्वांना गमावले आहे… गावातील प्रत्येकजण घाबरला आहे,” असे स्थानिक रहिवासी नासिर अहमद यांनी द प्रिंटला सांगितले. “जेव्हा फक्त तीन कुटुंबातील सदस्य मरताना दिसून येतात तेव्हा हा विषाणू कसा असू शकतो? जर हा आजार असता तर तो गावातील इतरांमध्ये पसरला असता. आम्हाला भीती वाटते. आपण खाल्लेल्या अन्नामुळे आपल्याला जीव जाऊ शकतो हे आम्हाला कसे कळेल? हे शक्य तितक्या लवकर सोडवण्याची गरज आहे,” असे ते म्हणाले.
जम्मू आणि काश्मीर सरकारने त्याच वेळी, चंदीगडमधील पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च (पीजीआयएमईआर) मधील अनेक तज्ञ पथके गावात पाठवली आहेत; नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (एनआयव्ही), इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) आणि नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल (एनसीडीसी) यांना बाधित गावात पाठवण्यात आले. “प्रारंभिक अहवालांनुसार, मेंदूला नुकसान झाल्याचे संकेत आहेत, ज्यामुळे आम्हाला असे वाटते की मृत्यूचे कारण न्यूरोटॉक्सिन असू शकते. तथापि, हे कोणते विष आहे आणि [त्याचे] स्रोत काय होते हे माहित नाही,” असे जम्मूमधील एका सार्वजनिक आरोग्य अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.
मृतांमधील जवळचे कौटुंबिक संबंध आणि सामुदायिक जेवणानंतर होणाऱ्या मृत्यूंच्या वारंवार होणाऱ्या पद्धतीमुळे तपासकर्त्यांना अन्न ही संभाव्य वितरण यंत्रणा असू शकेल असा निष्कर्ष निघत आहे असे जम्मू आणि काश्मीरमधील एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. “आम्ही तपासात कोणतीही कसूर ठेवलेली नाही. अनेक लोकांना चौकशीसाठी आणण्यात आले आहे, परंतु आतापर्यंत कोणालाही अटक करण्यात आलेली नाही,” असे पोलिस अधिकारी म्हणाले.
दरम्यान, बुधल भीतीने ग्रासले आहेत कारण या मृत्यूंमुळे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे आणि जवळच्या समुदायात तणाव वाढला आहे. गावकरी सामुदायिक मेळावे आणि जेवण टाळत आहेत. “आम्हाला भीती वाटते कारण आम्हाला हे रहस्यमय मृत्यू कशामुळे होत आहेत हे माहित नाही,” स्थानिक रहिवासी नसीर राथेर यांनी द प्रिंटला सांगितले. “येथील प्रत्येक कुटुंब भीतीच्या सावटाखाली जगत आहे. अधिक जीव जाण्यापूर्वी आम्ही अधिकाऱ्यांना तपास जलद करण्याची आणि मूळ कारण शोधण्याची विनंती करतो.”
एसआयटी आणि वैद्यकीय पथकांव्यतिरिक्त, जम्मू-काश्मीर सरकारने तपास जलद करण्यासाठी राष्ट्रीय तज्ञांची मदत घेतली आहे. शनिवारी, जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी बुधलमधील परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी श्रीनगरमध्ये एक उच्चस्तरीय बैठक घेतली.
Recent Comments