चेन्नई: ‘राज्याच्या पुरातत्व विभागाच्या निष्कर्षांवरून तामिळनाडूमध्ये लोखंडाचा सर्वात जुना वापर ई.स पूर्व तीन हजार 345 वर्षे एवढा जुना असल्याचे सिद्ध होते’ असे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी गुरुवारी जाहीर केले. “लोहयुगाची सुरुवात तमिळ भूमीवर झाली” असे प्रतिपादन त्यांनी केले. स्टॅलिन यांनी प्रसिद्ध केलेल्या निष्कर्षांवरून असे सूचित होते की तामिळनाडूमधील लोहयुग सिंधू संस्कृतीच्या तांबे/कांस्ययुगाच्या समकालीन होता, म्हणजे सुमारे पाच हजार 300 वर्षांपूर्वी.
चेन्नईतील अण्णा शताब्दी ग्रंथालयात ‘लोहाची प्राचीनता: तामिळनाडूमधील अलिकडच्या रेडिओमेट्रिक तारखा’ या शीर्षकाचा अहवाल प्रकाशित करताना, स्टॅलिन म्हणाले की राज्यातील विविध पुरातत्वीय स्थळांमधून उत्खनन केलेले नमुने जगभरातील प्रयोगशाळांमध्ये पाठवण्यात आले होते.
परिणामी, तामिळनाडूमध्ये लोखंडाचा सर्वात जुना वापर ई.स पूर्व चौथ्या सहस्राब्दीच्या पहिल्या तिमाहीत आढळून आला आहे. “मी जगाला सांगतोय की, लोखंड वितळवण्याचे तंत्रज्ञान तामिळनाडूमध्ये सुमारे पाच हजार 300 वर्षांपूर्वी सुरू झाले. मी ते वैज्ञानिक पुराव्यांसह सांगत आहे. आता आपण आत्मविश्वासाने म्हणू शकतो की लोखंडाचा वापर दक्षिण भारतात, विशेषतः तामिळनाडूमध्ये प्रथम सुरू झाला. अमेरिकेतील फ्लोरिडा येथील प्रयोगशाळांसह जगभरातील प्रयोगशाळांमध्ये पाठवलेल्या नमुन्यांच्या अहवालांवरून याची पुष्टी होते,” स्टॅलिन म्हणाले.
ऑगस्ट 2022 मध्ये, स्टॅलिन यांनी तामिळनाडू विधानसभेत सांगितले होते की कृष्णगिरी जिल्ह्यातील मयिलादुम्पराई येथून उत्खनन केलेली लोखंडी अवजारे 4 हजार 200 वर्षांपूर्वीची आहेत. 2021 मध्ये द्रमुक सत्तेत आल्यापासून, गुरुवारी पहिल्यांदाच तामिळनाडू सरकारने केवळ घोषणा करण्याऐवजी, पुरातत्वीय निष्कर्षांवर आधारित दाव्यांना समर्थन देण्यासाठी कार्बन डेटिंगसाठी प्रयोगशाळेतील चाचणी अहवालांसह एक व्यापक अहवाल प्रसिद्ध केला. स्टॅलिन यांनी गुरुवारी असेही जाहीर केले की तामिळ भूमीतून जगाला लोखंडाची ओळख झाली. “ही तमिळ भाषा, तमिळ लोक, तमिळनाडू आणि तमिळ भूमीसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. ही तमिळ भूमीने मानवजातीला दिलेली देणगी आहे,” असे ते म्हणाले. द्रविड मुन्नेत्र कझगम (द्रमुक) नेत्याने मुख्यमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर काही महिन्यांनीच तामिळ संस्कृतीची प्राचीन मुळे सिद्ध करण्याचा प्रयत्न सुरू केला.
सुमारे 3 हजार 200 वर्षांपूर्वी थुथुकुडीमध्ये संस्कृती अस्तित्वात होती असे कार्बन डेटिंग अहवालांचे उद्धरण दिल्यानंतर, त्यांनी सप्टेंबर 2021 मध्ये विधानसभेत घोषणा केली की भारतीय उपखंडाचा इतिहास तमिळ भूमीवरून पुन्हा लिहिला जाईल. या वर्षी 5 जानेवारी रोजी, सिंधू संस्कृतीच्या शोधाच्या शताब्दीनिमित्त आयोजित परिषदेत, स्टॅलिन यांनी चेन्नईच्या एग्मोर संग्रहालयात सांगितले की सिंधू संस्कृतीचा तांबे/कांस्य युग दक्षिण भारतातील, विशेषतः तामिळनाडूच्या लोहयुगाच्या समकालीन होता. परंतु त्यांनी अचूक तारखा जाहीर केल्या नाहीत. राज्याच्या पुरातत्व विभागाचे शैक्षणिक आणि संशोधन सल्लागार प्राध्यापक के. राजन आणि त्यांचे संयुक्त संचालक आर. शिवनाथम यांनी लिहिलेल्या अहवालाचा हवाला देऊन तारखा आता सार्वजनिक करण्यात आल्या आहेत.
“विंध्याच्या उत्तरेकडील सांस्कृतिक क्षेत्रांनी तांबेयुग अनुभवले तेव्हा, व्यावसायिकरित्या वापरण्यायोग्य तांबे धातूच्या मर्यादित उपलब्धतेमुळे विंध्याच्या दक्षिणेकडील भागाने लोहयुगात प्रवेश केला असावा. “म्हणूनच, उत्तर भारतातील ताम्रयुग आणि दक्षिण भारतातील लोहयुग हे कदाचित समकालीन आहेत,” असे अहवालात म्हटले आहे. राजन यांनी ‘द प्रिंट’ला सांगितले की तारखा घाईघाईने जाहीर केल्या नव्हत्या. “जर आपण एकच तारीख देत असू तर लोक कदाचित सहमत नसतील. परंतु, यावेळी, आम्ही अनेक नमुने तपासले आहेत आणि आम्ही ई.स पूर्व 2 हजार 175 ते मयिलादुम्पराईपासून शिवगलाईपर्यंत ई.स पूर्व 3 हजार 345 पर्यंत अनेक तारखा दिल्या आहेत. त्यामुळे, हे सर्व सिद्ध करते की लोहयुग दक्षिण भारतातून सुरू झाला, विशेषतः तामिळनाडूमध्ये.”
तामिळनाडूचे अर्थ सचिव उदयचंद्रन, जे राज्याच्या पुरातत्व विभागाचे आयुक्त देखील आहेत, यांनी या निष्कर्षांचे कौतुक केले. “एखादी संस्कृती तेव्हाच विकसित होते जेव्हा त्यांना लोखंडाचा वापर करायला मिळतो. हे सर्व लोखंडापासून सुरू होते. ते शस्त्रे बनवू लागतात, ते इतर वस्तू बनवू लागतात ज्यामुळे त्यांना अखेर शेतीकडे नेले जाईल आणि नंतर संस्कृती भरभराटीला येते. म्हणून, त्या दृष्टीने ते महत्त्वाचे आहे,” त्यांनी द प्रिंटला सांगितले.
शिवकलाईमध्ये उत्खननातून मिळालेल्या लोखंडी छिन्नी, कुऱ्हाड आणि तलवारी
अहवालानुसार, चाचणी केलेल्या एकूण नमुन्यांपैकी पाच नमुने थुथुकुडी जिल्ह्यातील शिवकलाई दफनभूमीतून घेण्यात आले होते. पाचपैकी चार कोळशाचे नमुने आणि एक भाताचा नमुना कार्बन डेटिंगसाठी विविध प्रयोगशाळांमध्ये पाठवण्यात आला होता. “ट्रेंच ए2 च्या कलश-2 मधून गोळा केलेला भाताचा नमुना ई.स पूर्व 1155 चा होता. ई.स पूर्व 2953 ते 3345 दरम्यानच्या इतर तीन तारखांमध्ये लोखंडी वस्तू आढळल्या. या अर्थाने, तामिळनाडूमध्ये लोखंडाचा परिचय चौथ्या सहस्राब्दी ईसापूर्वच्या पहिल्या तिमाहीत झाला आहे,” असे अहवालात म्हटले आहे. अहवालानुसार, केवळ शिवकलाई दफनभूमीतून किमान 85 लोखंडी वस्तूंचे उत्खनन करण्यात आले.
“लोखंडी वस्तू कलशाच्या आत आणि बाहेर दोन्ही ठिकाणी ठेवण्यात आल्या होत्या. आत, ते कलशाच्या तळाशी ठेवण्यात आले होते. कलशाच्या आत आणि बाहेरून विविध पातळ्यांवरून चाकू, बाणांचे टोक, अंगठ्या, छिन्नी, कुऱ्हाडी आणि तलवारी अशा 85 हून अधिक लोखंडी वस्तू गोळा करण्यात आल्या,” असे त्यात म्हटले आहे. शिवगलाई नंतरचे महत्त्वाचे ठिकाण म्हणजे आदिचनल्लूर उत्खनन स्थळ, तेही थुथुकुडी येथे. अहवालानुसार, पुरातत्वशास्त्रज्ञांनी या ठिकाणाहून वाट्या, रिंग स्टँड, प्लेट्स, झाकणे, भांडी, बारीक जातींचे भांडे, काळे आणि लाल भांडे, काळे पॉलिश केलेले भांडे, पांढरे रंगवलेले काळे आणि लाल भांडे उत्खनन केले.
“टीएनएसडीएने आदिचनल्लूर येथील वस्तीच्या ढिगाऱ्यात ठेवलेल्या खंदकात थर 4 पासून 220 सेमी खोलीवर लोखंडी वस्तूच्या संयोगाने गोळा केलेल्या कोळशाच्या नमुन्यात पारंपारिक तारीख ई.स पूर्व 2060 आणि कॅलिब्रेटेड तारीख ई.स पूर्व 2517-2513 आढळली. या तारखेमुळे लोखंडाचा परिचय तिसऱ्या सहस्राब्दीच्या मध्यात झाला,” असे अहवालात म्हटले आहे.
अहवालात असेही म्हटले आहे की २०२१ मध्ये कृष्णगिरी जिल्ह्यातील मायिलादुम्पराई येथे केलेल्या उत्खननात सूक्ष्मपाषाणयुगीन साधने, नवपाषाणयुगीन सेल्ट, नवपाषाणयुगीन साधन पॉलिशिंग खोबणी, खडक चित्रे, लोहयुगीन कबरी, तामिली (तामिल-ब्राह्मी) कोरलेले कुंभारकाम, स्मारक दगड आणि व्यापारी गिल्ड शिलालेख यासारख्या सांस्कृतिक वस्तू आढळल्या ज्या सूक्ष्मपाषाणयुगीन काळापासून मध्ययुगीन काळाच्या उत्तरार्धापर्यंतच्या काळाचा समावेश करतात. या ठिकाणाहून नमुन्यांच्या चाचणीतून पूर्वी दक्षिण भारतात लोखंडाचा परिचय ई.स पूर्व दुसऱ्या सहस्राब्दीपर्यंत आढळून आला.
Recent Comments