scorecardresearch
Friday, 26 December, 2025
घरदेशनोकरी गमावणे, कारखाना बंद पडणे यांमुळे सुरतचे हिरे कामगार अडचणीत, 18 महिन्यांत...

नोकरी गमावणे, कारखाना बंद पडणे यांमुळे सुरतचे हिरे कामगार अडचणीत, 18 महिन्यांत 71 आत्महत्या

सुरतमध्ये सुमारे 8-10 लाख हिरे कामगार आहेत, असे डायमंड वर्कर्स युनियन, गुजरातचे म्हणणे आहे. यातील बहुतांश कामगार हे ना कायमस्वरूपी आहेत ना पगारावर नोंदणीकृत कर्मचारी आहेत.

सुरत: गेल्या तीन महिन्यांपासून राकेशभाई दाभी आणि त्यांची पत्नी सुरतमधील एका रस्त्यावर रोज संध्याकाळी साडेसातच्या सुमारास एका स्टॉलवर भाजीचे सूप विकत आहेत. त्यांच्या स्टॉलचे नाव, ‘रत्नकलाकर’ (हिरे कामगार) हे येणाऱ्या जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेते.  43 वर्षीय दाभी, मागणीत घट झाल्यामुळे गुजरातच्या हिरे शहरातील अनेक लहान आणि मध्यम-आकाराचे व्यवसाय बंद झाल्यामुळे त्यांना आणि शेकडो हिरे कामगारांना ज्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे त्याबद्दल मोकळेपणाने व्यक्त झाले.

डायमंड कटिंगपासून पॉलिशिंगपर्यंत काम करणाऱ्या दाभी यांनी सुरतच्या बायलेनमध्ये 18 वर्षे काम केले होते. तरीही, त्याचे वेतन प्रतिदिन 1,200-1,300 रुपयांवरून 600-700 रुपयांपर्यंत खाली आले आहे.

कोणताही पर्याय नसल्याने, हे जोडपे आता कुटुंब चालवण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपाचे एक दुकान चालवते.  दाभी यांच्या पत्नीला भीती वाटते की दाभी आपल्या भावाप्रमाणेच टोकाचे पाऊल उचलतील. दाभी यांच्या हिरे कामगार असलेल्या भावाने मे महिन्यात आर्थिक तणावामुळे आपले जीवन संपवले.

“हिरे कामगार म्हणून माझा पगार पुरेसा नाही. म्हणून, पत्नीने सुचवले की आपण खाद्यपदार्थाचा व्यवसाय करू या. माझी पत्नी म्हणते की ती आमची आर्थिक सोय होण्यासाठी मला या व्यवसायात मदत करेल. ती आता कुटुंबाचा आधारस्तंभ आहे,” दाभी यांनी द प्रिंटला सांगितले.

दाभींसारखे सर्वच भाग्यवान नसतात, कारण अनेक हिरे कामगारांनी जे अनेकदा त्यांच्या कुटुंबातील एकमेव कमावते सदस्य असतात त्यांनी नोकरी गमावल्यानंतर असह्य ताणाखाली जीवन संपवण्याचे टोकाचे पाऊल उचलले आहे.

एकेकाळी आपल्या भरभराटीच्या व्यवसायासाठी ओळखले जाणारे सुरत गेल्या काही वर्षांपासून आर्थिक मंदीच्या झळा सोसत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील हिऱ्यांची मागणी कमी झाल्याने या उद्योगात मंदीचे वातावरण आहे.

अनेक हिरे कामगार ज्यांच्याशी ‘द प्रिंट’ ने संवाद साधला, त्यांनी सांगितले की परिस्थिती कशी सुधारली नाही आणि दररोज कोणत्या ना कोणत्या कारखान्यात, एक असहाय कामगार एकतर पगार किंवा नोकरी पूर्णपणे गमावत आहे.

10-तासांच्या शिफ्ट 7-8 तासांवर आल्या कारण मंदीमुळे काम कमी झाले, असे ते म्हणाले. रोजंदारीवर काम करणाऱ्यांचे पगारही घसरले, असेही ते म्हणाले.

“दिवाळीनंतर मी काय करेन याचा मला विचार करावा लागेल. माझ्या मॅनेजरलाही काय करावे हे कळत नाही. या दिवाळीत माझा पगार 25,000 रुपयांवरून 12,000 रुपयांवर आला. हिरे उद्योगासाठी अशा प्रकारची पहिलीच परिस्थिती आहे,” असे एका कामगाराने सांगितले.

डायमंड वर्कर्स युनियन गुजरात (DWUG) च्या म्हणण्यानुसार सुरतमध्ये गेल्या 18 महिन्यांत एकूण 71 हिरे कामगारांनी आत्महत्या केली आहे. यापैकी तब्बल 45 प्रकरणे गेल्या एका वर्षात नोंदवण्यात आली असून त्यापैकी 31 गेल्या सहा महिन्यांत घडल्या आहेत. सुरतमधील आत्महत्यांमागे आर्थिक अस्थिरता आणि बेरोजगारी हे मुख्य कारण आहेत. त्यावर उपाय म्हणून डीडब्ल्यूयूजीने जुलैमध्ये हेल्पलाइन आणली. हेल्पलाइन सुरू झाल्यापासून, कामगारांकडून 2,500 हून अधिक निराशाग्रस्त कॉल्स आले आहेत.

“जेव्हा या आत्महत्या सुरू झाल्या, तेव्हा आम्ही गुजरातच्या कामगार मंत्र्यांना पत्र लिहून या कामगारांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना काही आर्थिक मदत देण्याची विनंती केली. पण सरकारने काहीच हालचाल केली नाही. मग आम्ही ही हेल्पलाइन सुरू करण्याचा निर्णय घेतला,” DWUG चे उपाध्यक्ष भावेश टंक यांनी द प्रिंटला सांगितले.

“आणि जर सरकारने ठोस पावले उचलली नाहीत, तर आत्महत्येचा हा ट्रेंड थांबणार नाही कारण अशा लोकांना ओळखून त्यांना मदत करण्याचा आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत.” असेही ते म्हणाले.

जेम अँड ज्वेलरी एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिलच्या (GJEPC) सप्टेंबरच्या अहवालानुसार, कट आणि पॉलिश्ड हिऱ्यांची एकूण निर्यात $1,290.89 दशलक्ष (रु. 10,822.37 कोटी) होती, जी $1,673.56 दशलक्ष, 233 कोटी (239 कोटी) च्या तुलनेत 22.87 टक्क्यांनी घसरली.

कट आणि पॉलिश्ड हिऱ्यांच्या आयातीबद्दल, ते $158.1 दशलक्ष (रु. 1,312.73 कोटी) वरून 20.11 टक्क्यांनी कमी होऊन $126.3 दशलक्ष (रु. 1,058.42 कोटी) झाले.

तणावग्रस्त कामगारांच्या मदतीसाठी प्रशासन आणि पोलीस दलाने उचललेल्या पावलांबद्दल माहिती घेण्यासाठी साठी द प्रिंटने  गुजरातचे उद्योगमंत्री बलवंत सिंग राजपूत आणि सुरतचे पोलीस आयुक्त अनुपम सिंग गहलौत यांच्याशी फोनवरून संपर्क केला.

‘तो किती तणावात होता हे मला कधीच सांगितले नाही’

DWUG च्या मते, सुरतमध्ये सुमारे 8-10 लाख हिरे कामगार आहेत आणि एकूणच, गुजरातमध्ये सुमारे 25 लाख कामगार आहेत. यातील बहुतांश कामगार हे ना कायमस्वरूपी आहेत ना पगारावर नोंदणीकृत कर्मचारी आहेत. कामगारांचा मोठा भाग सौराष्ट्रातील आहे, तर ओडिशा आणि कर्नाटक सारख्या दूरच्या राज्यांतून बरेच लोक आहेत.

“या उद्योगात आधी सर्व चांगले होते. 2008 मध्ये मंदीच्या काळात अडचणी आल्या पण त्या या प्रकारच्या नव्हत्या.,” दाभी म्हणाले.

तथापि, कोविड साथीनंतर गेल्या दोन वर्षांत, गोष्टी अधिकाधिक बिघडू लागल्या.

“गेल्या अडीच वर्षांत आर्थिक मंदीचा फटका बाजाराला बसला. पगार निम्मे झाले आहेत आणि यामुळे अडचणीत भर पडली आहे,” टंक म्हणाले. “एक कामगार कसा तरी एक किंवा दोन महिने (अडचणी) सहन करू शकतो. पण ही मंदी आता वर्षानुवर्षे टिकून आहे.”

या सेक्टरमध्ये तीन वर्षांपासून काम करणारा 28 वर्षीय हिरे कामगार निकुंज टांक 2 ऑगस्ट रोजी त्याच्या खोलीत पंख्याला लटकलेल्या अवस्थेत सापडला होता. त्यांच्या पश्चात वृद्ध आई-वडील, पत्नी आणि 15 महिन्यांची मुलगी असा परिवार आहे.

त्यांचे वडील जयंतीभाई यांनी ‘द प्रिंट’ला सांगितले की, त्यांच्या मुलावर सुमारे चार लाख रुपयांचे कर्ज आहे. “त्याचा मासिक पगार वाढला नाही आणि शेवटपर्यंत तो 15 हजार रुपये राहिला. मला कर्जाबद्दल माहिती होती, पण तो किती तणावात होता हे त्याने मला कधीच सांगितले नाही. त्या दिवशी मी खाली होतो आणि तो वरच्या मजल्यावर त्याच्या बेडरूममध्ये होता. दुपारी 3.30-4 च्या सुमारास मी त्याच्याकडे गेलो तेव्हा मला तो पंख्याला  लटकलेला दिसला… तो आमच्या कुटुंबातील एकमेव कमावता सदस्य होता. ” जयंतीभाई म्हणाले.

विनूभाई परमार हा 45 वर्षीय दुसरा हिरे कामगार, DWUG हेल्पलाइनवर कनेक्ट झाला होता. तो म्हणाला की, तीन महिन्यांपूर्वी कामावरून काढून टाकण्यात आले. कामावरून काढून टाकण्याचे कारण मंदी असल्याचे सांगितले.

“जेव्हा त्यांनी मला कामावर येऊ नका असे सांगितले तेव्हा मी खूप चिंताग्रस्त झालो आणि घरी परतलो. तिथे मला समजले की माझ्या पत्नीला विजेचा धक्का बसला आणि ती कोसळली. माझी सर्व बचत हॉस्पिटलची बिले आणि नंतरची काळजी घेण्यासाठी गेली. मी प्रचंड दबावाखाली होतो, पण मदतीला कोणी नव्हते. असे तो सांगतो.

गेल्या 35 वर्षांपासून हिरे उद्योगात कार्यरत असलेल्या परमार यांनी टंक यांना एसओएस कॉल दिला. “मी त्याला माझ्या स्थितीबद्दल सर्व काही सांगितले आणि त्याला सांगितले की माझ्याकडे मरण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. तेव्हा या लोकांनी मला समजावले व एका महिन्याचे रेशन किटदेखील दिले,” तो पुढे म्हणाला.

सध्या तो हिऱ्यांच्या वर्कशॉपसाठी मशिनरी बनवणाऱ्या कारखान्यात रोजंदारीवर काम करतो. परमारच्या प्रकरणाप्रमाणेच, टंक यांनी महिनाभरापूर्वीची दुसरी घटना सांगितली. त्यांना कामगाराचा फोन आला की तो आत्महत्या करणार आहे. त्यांनी आपल्या टीमला सावध केले आणि त्या माणसाला कार्यालयात आणले. ‘सुरुवातीचे दोन तास तो रडत राहिला’, टंक सांगतात.

“आम्ही त्याला रडू दिले. तेव्हा त्याने सांगितले की त्याला कामावरून काढून टाकण्यात आले आहे आणि त्याची आर्थिक परिस्थिती खूपच खराब आहे. आम्ही त्यांच्या पत्नीला ऑफिसमध्ये बोलावून त्यांच्याशी बोललो. आम्ही सुरुवातीला त्याला मदत केली आणि आता त्याची आणि त्याच्या कुटुंबाची स्थिती थोडी चांगली आहे,” असेही टंक म्हणाले.

उद्योगधंद्याचा बदलणारा चेहरा

हिरे व्यापारी आणि व्यापाऱ्यांच्या बाबतीत, त्यांच्यातील मोठ्या वर्गाने मंदीचे कारण युक्रेन-रशिया आणि गाझा-इस्रायल युद्ध आणि सद्य परिस्थितीसाठी नैसर्गिक हिऱ्यांच्या मागणीत घट यासारखे देशांतर्गत घटक असल्याचे सांगितले.

सुरतच्या महिधरपुरा भागातील सर्वात मोठ्या रत्नांच्या बाजारपेठेतील हिरे व्यापारी मनोज कचारिया यांनी मान्य केले की मौल्यवान दगडांची बाजारपेठ वाईट काळातून जात आहे. “माझ्या स्टॉकची किंमत आता किमान 50 टक्के कमी झाली आहे. मी साधारणपणे हिरे निर्यात करायचो, पण आंतरराष्ट्रीय बाजारातील माझे नियमित ग्राहक सध्या खरेदी करायला तयार नाहीत,” ते म्हणाले.

आणखी एक महत्त्वाचा घटक म्हणजे प्रयोगशाळेत तयार केले जाणारे हिरे. प्रयोगशाळेत केले जाणारे  हिरे डिझाईन करण्यासाठी  आणि कापण्यासाठी सारखेच तास आणि कामगार घेत असले तरी, ते खूपच स्वस्त आहेत, खणून काढलेल्या हिऱ्यांच्या किंमतीच्या फक्त एक दशांश. या उद्योगाचा उदय 2018 मध्ये झाला आणि तेव्हापासून सातपट वाढला आहे. सीव्हीडी (रासायनिक वाष्प निक्षेप) हिरे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रयोगशाळेत बनवल्या जाणाऱ्या  हिऱ्यांचा व्यवहार करणारे व्यापारी दिपेश धनक म्हणाले की, सरकार आता या हिऱ्यांना उद्योगात प्रोत्साहन देत आहे.

“व्यापारयांंमध्ये संभ्रम आहे. नैसर्गिक हिऱ्यांची मागणी 40-50 टक्क्यांनी घसरली आहे आणि त्यामुळे कामगारांसाठी कोणतेही काम नाही आणि त्यामुळेच मोठ्या प्रमाणावर टाळेबंदी होत आहे. धनक म्हणतात.

उद्योगातील खेळाडूंसाठी यंत्रसामग्री पुरविण्याचे काम करणारे आणखी एक हिरे व्यापारी म्हणाले की, जगभरात या उद्योगात संकट आहे.

त्यामुळे आमच्या निर्यातीला फटका बसला आहे. व्यवसायात नफ्याचे प्रमाण कमी झाले आहे. नैसर्गिक हिऱ्यांची किंमत CVD पेक्षा खूप जास्त आहे, जरी एक सामान्य माणूस हा फरक दिसण्यानुसार करू शकत नाही. त्यामुळे लोक सीव्हीडीला प्राधान्य देऊ लागले. पण तिथेही मार्केटला अडथळा निर्माण झाला आहे,” तो म्हणाला.

“उदाहरणार्थ, 2018 मध्ये 4 लाख रुपयांच्या नैसर्गिक हिऱ्याची किंमत 2.5 लाख रुपये इतकी खाली आली आहे.  सीव्हीडीच्या बाबतीत, 50 हजार रुपयांचा हिरा 10 हजार रुपयांपर्यंत घसरला आहे. त्यामुळे एखादी व्यक्ती 10 हजार  रुपयांचा हिरा पसंत करेल.”

मागणी वाढल्यावर अनेक व्यापारी सीव्हीडीकडे वळले पण या गर्दीमुळे पुरवठ्यात भर पडली आणि त्यामुळे आता या व्यापारालाही त्रास होत आहे, असे हिरे व्यापाऱ्यांनी स्पष्ट केले.

“जशी हिऱ्याची किंमत कमी झाली, तसाच मजुरीच्या खर्चावर आणि पगारावर परिणाम झाला. पण आमची पूर्ण चूक नाही. खरेदीदारांनी त्यांच्या किमती कमी केल्या आहेत परंतु आमच्यासाठी, प्रयोगशाळेत हिरा वाढवण्याचा खर्च अजूनही तसाच आहे.”त्यांच्यापैकी एक म्हणाला. कामगारांना नैसर्गिकरित्या सीव्हीडी कारखान्यात हलवले जाऊ शकते, पण त्याला थोडा वेळ लागेल. ते लगेच होऊ शकत नाही. ती एक प्रक्रिया आहे.” असे धनक यांनी सांगितले.

नैसर्गिक हिऱ्यांचे अनेक मोठे व्यापारी प्रयोगशाळेत बनवलेल्या  हिऱ्यांकडे वळू शकत नाहीत आणि त्यातील काही त्यांचे कारखाने बंद करत आहेत, असेही ते म्हणाले.

‘इथे काम नाही’

गेल्या तीन-चार महिन्यांपासून, जेम अँड ज्वेलरी एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल (GJEPC) च्या मदतीने, DWUG ने 250 कुटुंबांना सुमारे एक महिना टिकणारे रेशन किट दिले आहेत. 150 कुटुंबातील मुलांच्या शाळेची फी भरली.  “नजीकच्या भविष्यात आणखी 200 कुटुंबांना मदत केली जाईल,” टंक म्हणाले.

सप्टेंबरमध्ये, DWUG ने गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघवी यांना पत्र लिहून व्यथित हिरे कामगारांच्या आत्महत्येच्या प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी त्यांच्या हस्तक्षेपाची मागणी केली होती.

“आम्हाला आमच्या मोहिमेसाठी पोलिसांच्या मदतीची गरज आहे आणि त्यांनी ही मोहीम राबवण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. या आत्महत्येचा तपास योग्य पद्धतीने झाला पाहिजे, अशीही आमची मागणी आहे. आरोपी कोणीही असो, त्या व्यक्तीला कठोर शिक्षा व्हायला हवी,” असे पत्रात म्हटले आहे.

 

(तुम्हाला आत्महत्या करावीशी वाटत असल्यास  किंवा नैराश्य जाणवत असल्यास, कृपया तुमच्या राज्यातील हेल्पलाइन नंबरवर कॉल करा)

 

संबंधित लेख

चुकवू नका

Recent Comments