नवी दिल्ली: “देशासाठी प्राण देणे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीचे प्रतिबिंब आहे, देशाला समृद्धीच्या सर्वोच्च शिखरावर नेणे ही संघाची विचारसरणी आहे आणि देशाच्या परंपरांचे जतन करणे हेच संघाचे ध्येय आहे, असे प्रतिपादन अमित शहा यांनी केले आहे. लोकसभेत बुधवारी निवडणूक सुधारणांवर झालेल्या जोरदार चर्चेदरम्यान, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भारतीय निवडणूक आयोगासह इतर संस्थांवर संघाच्या ‘संस्थात्मक नियंत्रणा’चा आरोप केला होता, त्याला केंद्रीय गृहमंत्री उत्तर देत होते.
“राहुल गांधी म्हणाले, की सर्व संवैधानिक संस्था भ्रष्ट झाल्या आहेत. संघाच्या विचारसरणीच्या लोकांना महत्त्वाच्या पदांवर बसवले जात आहे. यात आक्षेप काय आहे? या देशात असा कोणता कायदा झाला आहे की संघाच्या विचारसरणीचे लोक महत्त्वाच्या पदांवर राहू शकत नाहीत?” असा सवाल शहा यांनी केला. ते पुढे म्हणाले, “देशाचे पंतप्रधान संघाच्या विचारसरणीचे पालन करतात, देशाचे गृहमंत्री संघाच्या विचारसरणीचे पालन करतात आणि ते तुमच्या कृपेने नव्हे, तर जनतेच्या जनादेशाने सत्तेवर आले आहेत.” अवैध स्थलांतरितांना मतदार यादीत ठेवण्यासाठी विशेष सखोल पडताळणी (एसआयआर) प्रक्रियेवर आक्षेप घेतल्याचा आरोप अमित शहा यांनी केल्यानंतर विरोधी पक्षाच्या खासदारांनी त्यांच्या भाषणादरम्यान सभात्याग केला.
‘मतचोरी’ मोहिमेवर टीका करताना शहा म्हणाले की, “2014 पासून ते 2025 पर्यंत, विरोधक निवडणूक यंत्रणेबद्दल तक्रार करत आहेत. या काळात भाजपने लोकसभा आणि राज्य विधानसभांसह 44 निवडणुका जिंकल्या, परंतु विरोधी पक्षांनीही जागा जिंकल्या.” राहुल गांधींच्या ‘हायड्रोजन बॉम्ब’ खुलाशांच्या पत्रकार परिषदेचा संदर्भ देत, ज्यात सुधारित हरियाणा मतदार यादीतील विसंगती निदर्शनास आणल्या होत्या, शहा म्हणाले की “पराभवानंतर काँग्रेस निवडणूक यंत्रणेला दोष देते. जेव्हा ते जिंकतात, तेव्हा ते कधीही दोष देत नाहीत… तेव्हा तर तुम्ही लगेच शपथ घेता. जर मतदार यादी भ्रष्ट असेल, तर शपथ का घेता?”
काँग्रेस नेतृत्वावर जोरदार हल्ला चढवताना शहा म्हणाले की, “निवडणुकीतील पराभवाचे मुख्य कारण पक्षाचे नेतृत्व आहे, मतदार यादी किंवा इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन्स (ईव्हीएम) नाहीत. एक दिवस काँग्रेस कार्यकर्ते पराभवामागील कारणे विचारतील. आम्हीसुद्धा एकेकाळी विरोधी पक्षात होतो; आम्ही जिंकलेल्या निवडणुकांपेक्षा जास्त निवडणुका हरलो आहोत. आमच्या आयुष्याचा एक चतुर्थांश काळ विरोधी पक्षात गेला आहे. पण आम्ही कधीही निवडणूक आयोगावर किंवा मुख्य निवडणूक आयुक्तांवर आरोप केले नाहीत,” एका शाब्दिक चकमकीत, गृहमंत्री आणि विरोधी पक्षनेते दोघांनीही एकमेकांवर सभागृहाला आणि जनतेला दिशाभूल केल्याचा आरोप केला. राहुल गांधींनी अमित शहा यांना निवडणूक फसवणुकीच्या आरोपांवर वादविवाद करण्याचे आव्हान दिले. “अमित शहा जी, मी तुम्हाला तीन पत्रकार परिषदांवर वादविवाद करण्याचे आव्हान देतो,” असे राहुल म्हणाले. तथापि, शहा यांनी हा व्यत्यय फेटाळून लावला आणि उलट हल्ला सुरू केला.
‘काँग्रेसची मतचोरी’
अमित शहा यांनी जवाहरलाल नेहरू यांची भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून झालेली नियुक्ती, आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधींनी स्वतःला दिलेली कायदेशीर संरक्षण आणि सोनिया गांधींच्या पदाचा उल्लेख काँग्रेसच्या “मतचोरी”ची काही उदाहरणे म्हणून केला. “स्वातंत्र्यानंतर, देशाचे पंतप्रधान कोण होणार यावर मतदान झाले होते. त्यावेळी, प्रांतांसाठी, निवडणुकीत संबंधित काँग्रेस अध्यक्षांचे प्रत्येकी एक मत होते. सरदार वल्लभभाई पटेलजी यांना 28 मते मिळाली. दोन मते जवाहरलाल नेहरूजी यांना मिळाली. पण पंतप्रधान जवाहरलाल नेहरू जी पंतप्रधान झाले,” असे शहा म्हणाले. त्यांनी असाही आरोप केला की, सोनिया गांधींनी भारतीय नागरिकत्व मिळवण्यापूर्वीच मतदार म्हणून नोंदणी केली होती – हा एक असा विषय आहे जो न्यायालयात पोहोचला आहे, असे ते म्हणाले. घुसखोरी सामान्य करणे, त्यांना मान्यता देणे आणि मतदार यादीत नावे जोडून तिला औपचारिक स्वरूप देणे हे काँग्रेसचे धोरण असल्याचा दावा करत, शहा म्हणाले, की “विरोधक एसआयआरच्या विरोधात आहेत, कारण त्यांना सर्व घुसखोरांना संरक्षण द्यायचे आहे. एनडीएचे धोरण ‘शोधणे, वगळणे, हद्दपार करणे’ हे आहे आणि आम्ही घटनात्मक प्रक्रियेनुसार ‘शोधणे, वगळणे, हद्दपार करणे’ पूर्ण करू.” ते म्हणाले.
जेव्हा त्यांच्या उत्तरादरम्यान विरोधकांनी सभात्याग केला, तेव्हा शहा म्हणाले, “ते सभागृहातून का पळून गेले? मी काँग्रेस पक्षाबद्दल बोलत नव्हतो; मी घुसखोरांबद्दल बोलत होतो.”

Recent Comments