scorecardresearch
Thursday, 25 December, 2025
घरदेशप्रतिबंधित भागात आंदोलन केल्याबद्दल प्रशांत किशोर यांना अटक

प्रतिबंधित भागात आंदोलन केल्याबद्दल प्रशांत किशोर यांना अटक

कथित पेपर लीक प्रकरणी डिसेंबरमध्ये घेण्यात आलेली प्राथमिक परीक्षा रद्द करण्याच्या मागणीसाठी बीपीएससीच्या उमेदवारांच्या निषेधार्थ किशोर 2 जानेवारीपासून अनिश्चित काळासाठी उपोषण करत होते.

नवी दिल्ली: पाटणा पोलिसांनी जन सूरज पक्षाचे नेते प्रशांत किशोर यांना अटक केली आणि पाटणाच्या गांधी मैदानावर “बेकायदेशीरपणे” निदर्शने केल्याबद्दल सोमवारी पहाटे अनेक समर्थकांना ताब्यात घेतले. कथित अनियमिततेमुळे यावर्षीची प्राथमिक परीक्षा रद्द करण्याच्या मागणीसाठी बिहार लोकसेवा आयोगाच्या (BPSC) उमेदवारांच्या समर्थनार्थ किशोर उपोषणाला बसले होते.

पहाटे चारच्या सुमारास किशोर आणि इतर आंदोलक घटनास्थळी गांधी पुतळ्याजवळ झोपले असताना पोलिसांनी कारवाई केली. वृत्तसंस्थांनी शेअर केलेल्या घटनेच्या व्हिडिओ क्लिपमध्ये, पोलिस कर्मचारी किशोर यांना  घटनास्थळावरून हटवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत आणि त्यांच्या समर्थकांशी झटापट होताना दिसत आहे. जन सूरजचे कार्यकर्ते ‘वंदे मातरम’च्या घोषणा देताना दिसून येतात व शेवटी पोलीस किशोर यांना अटक करून घेऊन गेल्याचे दृश्य दिसते.

“जन सूरज पक्षाचे प्रशांत किशोर आणि इतर काही लोक त्यांच्या पाच कलमी मागण्यांसाठी गांधी मैदानातील प्रतिबंधित भागात गांधी पुतळ्यासमोर बेकायदेशीरपणे निदर्शने करत होते,” असे वरिष्ठ पोलीस अधीक्षक अवकाश कुमार यांनी माध्यमांना सांगितले.“प्रतिबंधित क्षेत्रात बेकायदेशीरपणे निषेध केल्याबद्दल गांधी मैदान पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला होता. वारंवार विनंती करून आणि पुरेसा वेळ देऊनही जागा रिकामी करण्यात आली नाही.” अशी माहितीही त्यांनी दिली.

किशोर यांना अटक केल्यानंतर, त्यांना आरोग्य तपासणीसाठी एम्स पाटणा येथे नेण्यात आले होते. एक्सवरील एका पोस्टमध्ये जन सूरज पक्षाने आरोप केला आहे की किशोर यांना एम्समध्ये पाहण्यासाठी जमलेल्या जमावावर पोलिसांनी लाठीचार्ज केला. किशोर यांनी 2 जानेवारी रोजी आपले उपोषण सुरू केले व बिहारमधील तरुणांसाठी पाच मागण्या मांडल्या, ज्यात पेपर लीकची चौकशी आणि 18 ते 35 वयोगटातील लोकांना बेरोजगारी वेतन यासह अनेक मागण्या करण्यात आल्या होत्या.

पाटणा येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना किशोर यांचे डॉक्टर लाल पांडे यांनी रविवारी सांगितले की, “त्यांची तब्येत बरी असली तरी उपासमारीने त्यांच्या  साखरेच्या पातळीत चढ-उतार होत होते. त्यांनी उपोषण लवकर संपवले नाही तर त्यांची प्रकृती आणखी बिघडू शकते”.राज्याची राजधानी पाटणा येथील बापू भवन परीक्षा केंद्रातून प्रश्नपत्रिका फुटल्याची अफवा पसरल्यानंतर शेकडो इच्छुकांनी 13 डिसेंबर रोजी घेण्यात आलेली 70 वी एकत्रित पूर्वपरीक्षा रद्द करण्याची मागणी केली आहे. परीक्षा ही बिहार सरकारमधील प्रशासकीय पदांसाठी उमेदवारांच्या भरतीसाठी बीपीएससीद्वारे आयोजित बिहार संयुक्त स्पर्धा परीक्षा (CCE) चा पहिला टप्पा आहे.

बीपीएससीने मोठ्या प्रमाणावर प्रश्नपत्रिका फुटल्याच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांचे आरोप फेटाळून लावले आहेत आणि 13 डिसेंबरच्या परीक्षेसाठी बसलेल्या उमेदवारांच्या निवडक गटासाठी पुन्हा परीक्षा घेण्याचे आदेश दिले आहेत.

 

संबंधित लेख

चुकवू नका

Recent Comments