नवी दिल्ली: लवकरच होणाऱ्या महाकुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रयागराजमध्ये कडेकोट सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली आहे. येथे सुमारे 50 हजार पोलिस कर्मचारी तैनात असणार आहेत. 13 जानेवारीपासून हा महाकुंभ मेळा सुरू होत आहे.
उत्तर प्रदेश पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 40 हजार कर्मचारी हे राज्यातीलच असतील तर उर्वरित 10 हजारांमध्ये निमलष्करी दलांचा समावेश असेल. याव्यतिरिक्त, नॅशनल सिक्युरिटी गार्ड, नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स (NDRF) आणि यूपी फायर सर्व्हिसेस देखील तैनात असतील. शिवाय, कायदा आणि सुव्यवस्थेच्या कोणत्याही समस्या किंवा चेंगराचेंगरीसारख्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी 56 सुसज्ज आणीबाणी युनिट्स असतील, असे सूत्रांनी सांगितले आहे. उत्तर-प्रदेश पोलिसांनी सोशल मीडिया खात्यांवर चोवीस तास पाळत ठेवण्यास सुरुवात केली आहे आणि प्रयागराजमध्ये चेक पॉईंटसदेखील स्थापन करण्यात आले आहेत.
दर 12 वर्षांनी होणारा महाकुंभ मेळा 25 फेब्रुवारी रोजी संपेल आणि त्याला 45 कोटींहून अधिक लोक भेट देतील असा अंदाज आहे. मोठ्या सुरक्षा योजनेचा एक भाग म्हणून, माणसाच्या चेहऱ्याची ओळख पटवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) ने सुसज्ज सुमारे 3 हजार सीसीटीव्ही कॅमेरे आणि ‘रीअल-टाइम’ देखरेखीसाठी ड्रोन्स लावले जाणार आहेत. 10 तांत्रिक बूथ उभारले जातील.
“महाकुंभदरम्यान हरवलेल्या व्यक्तींची तसेच हरवलेल्या वस्तूंची नोंद केली जाऊ शकते. एक तांत्रिक टीम लोकांना मदत करेल आणि ज्या भागातून माणूस बेपत्ता होईल त्या भागातील सीसीटीव्ही तपासले जातील आणि मार्ग शोधला जाईल. आम्ही एआय-सुसज्ज असल्यामुळे, बेपत्ता व्यक्तींचा सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजच्या मार्गाचा अवलंब करून लवकरच शोध लावला जाईल,” अशी माहिती उत्तर-प्रदेश पोलिसांनी दिली आहे.
महाकुंभमेळ्याला देशभरातील लोक भेट देणार असल्याने ‘एआय’च्या सहाय्याने चालणारे बूथ भाषा अनुवादाच्या सोयीने सुसज्ज असतील, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. शिवाय, हरवलेल्या व्यक्तींना त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचवण्यासाठी एक विशेष क्षेत्र देखील नियुक्त केले जाईल. या भागात, हॉलमध्ये फक्त खेळण्यांसह हरवलेल्या मुलांसाठी एक खास क्षेत्र उभारले जाईल. “बेपत्ता व्यक्तींची प्रकरणे आणि इतर आकस्मिक परिस्थिती हाताळण्यासाठी कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांना विशेष सॉफ्ट स्किल प्रशिक्षण दिले गेले आहे,” असे आणखी एका सूत्राने सांगितले.
सातस्तरीय सुरक्षा, पंधरा प्रवेशबिंदू
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महाकुंभमेळ्यासाठी सात थरांची सुरक्षा व्यवस्था असणार आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले, “पहिला सुरक्षा बिंदू भारत-नेपाळ सीमा आहे, त्यानंतर प्रयागराज झोन सीमा आहे. प्रयागराज जिल्ह्याच्या सीमेवर प्रवेश सुरक्षा बिंदूदेखील वाढविण्यात आले आहेत. गंगा, यमुना आणि सरस्वती नद्यांच्या संगमावर, आयसोलेशन झोनमध्ये अनेक सुरक्षा बिंदू आहेत – जिथे भक्त स्नान करतील. महाकुंभमेळ्यासाठी 80 ते 85 टक्के लोक रस्त्याने कार, बसने किंवा पायी प्रवास करतील असा अंदाजही सूत्रांनी व्यक्त केला आहे. सुमारे 10 ते 12 टक्के प्रयागराजमध्ये प्रवेश करण्यासाठी ट्रेनने प्रवास करतील आणि उर्वरित विमानाने. “रस्त्याद्वारे सहा प्रमुख प्रवेश बिंदू आणि नऊ प्रमुख रेल्वे स्थानके ओळखण्यात आली आहेत जिथून भाविक शहरात पोहोचतील. या सर्व बिंदूंवर सुरक्षा तैनात केली जाईल,” अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
अधिकारी म्हणाले की शिखरावर सहा दिवस, विशेष आमंत्रित आणि अति-महत्त्वाच्या लोकांना आपली कार सोडून पाच किलोमीटर पायी चालावे लागेल. महाकुंभमेळ्यातील नियमित दिवसांमध्ये व्हीआयपींना फक्त एक किलोमीटर चालावे लागेल.
Recent Comments