नवी दिल्ली: मणिपूरमधील राष्ट्रपती राजवट संपुष्टात येण्यास अकरा दिवस शिल्लक असताना, भाजपने राज्यातील सर्व एनडीए आमदारांना दिल्लीत बोलावले आहे. यांमध्ये मेईतेई, कुकी आणि नागा समुदायांच्या आमदारांचा समावेश आहे. राज्यातील परिस्थितीवर चर्चा करणे आणि राज्यात सरकार पुनर्स्थापित करण्याच्या शक्यता तपासणे, हा यामागील उद्देश आहे. ही बैठक आज, सोमवारी संध्याकाळी होण्याची शक्यता आहे, असे नाव न सांगण्याच्या अटीवर एका पक्ष नेत्याने ‘द प्रिंट’ला सांगितले.
गेल्यावर्षी फेब्रुवारीमध्ये मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. मे 2023 मध्ये प्रामुख्याने हिंदू मेईतेई आणि आदिवासी ख्रिश्चन कुकी समुदायांमध्ये झालेल्या वांशिक संघर्षांनंतर निर्माण झालेल्या राजकीय अस्थिरतेमुळे ही परिस्थिती उद्भवली होती. त्यावेळी राज्य विधानसभा निलंबित अवस्थेत ठेवण्यात आली होती. 60 सदस्यीय मणिपूर विधानसभेत भारतीय जनता पक्षाकडे बहुमत आहे. गेल्या जानेवारीत नॅशनल पीपल्स पार्टीचे (एनपीपी) आमदार एन. कायसी यांच्या निधनानंतर सध्या विधानसभेत 59 आमदार आहेत. भाजपच्या आमदारांकडे 32 जागा आहेत, ज्यात कुकी-झो समुदायाच्या सात आमदारांचा समावेश आहे. 2022 च्या विधानसभा निवडणुकीनंतर जनता दल (युनायटेड) चे पाच आमदार भाजपमध्ये सामील झाले होते, ज्यामुळे पक्षाचे संख्याबळ प्रभावीपणे 37 आमदारांपर्यंत पोहोचले होते. उर्वरित आमदारांमध्ये भाजपचा माजी मित्रपक्ष असलेल्या कॉनरॅड संगमा यांच्या नेतृत्वाखालील एनपीपीचे सहा आमदार आहेत. नोव्हेंबर 2024 मध्ये, एनपीपीने संघर्षाच्या पार्श्वभूमीवर एन. बिरेन सिंग सरकारचा पाठिंबा काढून घेतला होता. तथापि, हा पक्ष केंद्रात भाजपला पाठिंबा देत आहे. भाजपचा आणखी एक माजी मित्रपक्ष, कुकी पीपल्स अलायन्स, याचे दोन आमदार आहेत. याव्यतिरिक्त, नागा पीपल्स फ्रंटचे (एनपीएफ) पाच, तीन अपक्ष, काँग्रेसचे पाच आणि जेडी(यू)चा एक आमदार आहे.
नाव न सांगण्याच्या अटीवर एका भाजप आमदाराने सांगितले की, एनडीएचे मित्रपक्ष असलेल्या एनपीपी आणि एनपीएफच्या प्रत्येकी एका आमदारासह 16 आमदार रविवारी रात्री दिल्लीत पोहोचले आहेत. “उर्वरित आमदार सोमवारी सकाळी पोहोचतील,” असे त्या नेत्याने सांगितले. दिल्लीत पोहोचलेल्यांमध्ये मणिपूर विधानसभेचे अध्यक्ष थ. सत्यब्रता सिंग, माजी राज्यमंत्री वाय. खेमचंद सिंग, एनपीपीचे थ. शांती सिंग, एनपीएफचे अवांगबो न्यूमाई आणि इतर नेत्यांचा समावेश आहे. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने गेल्या चार महिन्यांत पक्षाच्या आमदारांसोबत, ज्यात कुकी-झो समुदायाच्या आमदारांचाही समावेश आहे, तसेच मित्रपक्ष एनपीपी आणि एनपीएफ यांच्यासोबत, सरकार स्थापनेसाठी परिस्थिती अनुकूल आहे की नाही, याचे मूल्यांकन करण्यासाठी अनेक बैठका घेतल्या आहेत. लोकप्रिय सरकार पुनर्सथापित करण्याच्या केंद्रासमोरील आव्हानांमध्ये आणखी भर पडली आहे, ती म्हणजे पक्षाच्या सात कुकी-झो आमदारांनी घेतलेली कठोर भूमिका. त्यांनी केंद्रीय नेतृत्वाला कळवले आहे की, मार्च 2027 मध्ये सध्याच्या विधानसभेचा कार्यकाळ संपण्यापूर्वी विधानमंडळ असलेल्या केंद्रशासित प्रदेशाच्या त्यांच्या मागणीची पूर्तता केली जाईल, असे लेखी आश्वासन मिळाल्यासच ते सरकार स्थापनेत सहभागी होतील.
मणिपूरमधील हिंसाचारात आतापर्यंत 250 हून अधिक लोकांचा बळी गेला आहे आणि दोन्ही समुदायांचे 60 हजारहून अधिक लोक विस्थापित झाले आहेत. हिंसाचार हळूहळू कमी झाला असला तरी, काही तुरळक घटनांमुळे अस्थिरता वाढत आहे. जानेवारीमध्ये, चुराचंदपूरमध्ये आपल्या कुकी जोडीदाराला भेटायला गेलेल्या एका मेईतेई व्यक्तीची संशयित कुकी अतिरेक्यांनी हत्या केली. गेल्या महिन्यात कांगपोकपी जिल्ह्यातील एका गावात नागा भूमिगत गटाच्या एका समूहाने काही कुकी-झो लोकांची घरे जाळल्यानंतरही तणावात वाढ झाली होती.

Recent Comments