मुंबई: अभिनेता सैफ अली खानवर गुरुवारी पहाटे त्याच्या मुंबईतील घरी अज्ञात घुसखोराने चाकूने हल्ला केला. सध्या तो लीलावती रुग्णालयात उपचार घेत आहे. मुंबई पोलिसांच्या म्हणण्यानुसार, अभिनेत्याच्या घरात दरोड्याच्या हेतूने घुसलेल्या एका अज्ञात व्यक्तीने त्याच्यावर चाकूने वार केले. “अभिनेता सैफ अली खानच्या घरात एका अज्ञात व्यक्तीने घुसखोरी केली. अभिनेता आणि घुसखोर यांच्यात हाणामारी झाली. यादरम्यान सैफ अली खान जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत” असे पोलिसांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
मुंबईचे पोलिस उपायुक्त दीक्षित गेडाम यांनी ‘द प्रिंट’शी बोलताना सांगितले की, “आरोपीचा हेतू अद्याप अस्पष्ट आहे. मात्र याप्रकरणी अधिक चौकशी सुरू आहे.” तथापि, सैफ अली खानच्या टीमने दिलेल्या निवेदनात हा हल्ला म्हणजे दरोड्याच्या प्रयत्न असल्याचे म्हटले आहे.
” सैफ अली खान यांच्या घरी चोरीचा प्रयत्न झाला. सध्या त्यांच्यावर लीलावती रुग्णालयात शस्त्रक्रिया सुरू आहे. आम्ही माध्यमे आणि चाहत्यांना धीर धरण्याची विनंती करतो. ही पोलिसांची बाब आहे. आम्ही तुम्हाला परिस्थितीची माहिती देत राहू,” असे अधिकृत जनसंपर्क निवेदनात म्हटले आहे. अभिनेत्याला सहा जखमा झाल्या आहेत, त्यापैकी एक त्याच्या मणक्याजवळ आहे.
सैफ अली खानचे कुटुंब लीलावती रुग्णालयात त्याच्याजवळच थांबले आहे. अभिनेता त्याची पत्नी करीना कपूर खान आणि त्यांच्या दोन मुलांसह मुंबईतील वांद्रे पश्चिम येथील सतगुरु शरण येथील अपार्टमेंटमध्ये राहतो.
Recent Comments