scorecardresearch
Tuesday, 9 September, 2025
घरदेशअभिनेता सैफ अली खानची प्रकृती स्थिर, जिवावरचा धोका टळला

अभिनेता सैफ अली खानची प्रकृती स्थिर, जिवावरचा धोका टळला

सैफला मुंबईच्या लीलावती रुग्णालयात आणले गेले व त्याच्यावर शस्त्रक्रियाही झाली आहे. त्याची प्रकृती स्थिर असून जिवावरचा धोका टळला असल्याची माहिती मिळाली आहे.

मुंबई: बुधवारी रात्री उशिरा वांद्रे येथे सैफ अली खानवर दरोड्याच्या उद्देशाने आलेल्या अज्ञात व्यक्तीने हल्ला केल्यानंतर अभिनेता गंभीररीत्या जखमी झाला होता. त्यानंतर त्याला मुंबईच्या लीलावती रुग्णालयात आणले गेले व त्याच्यावर शस्त्रक्रियाही झाली आहे. त्याची प्रकृती स्थिर असून जिवावरचा धोका टळला असल्याची माहिती मिळाली आहे.  रुग्णालयात सैफ अजूनही अतिदक्षता विभागात आहे आणि एक-दोन दिवसांत त्याला केबिनमध्ये हलवले जाईल, असे डॉक्टरांनी सांगितले.

लीलावतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नीरज उत्तमानी यांनी माध्यमांना सांगितले की, “त्याच्या जखमांवर झालेल्या  शस्त्रक्रियेनंतर अभिनेता आता बरा होत आहे. तो आयसीयूमध्ये आहे, कदाचित एक-दोन दिवसांत त्याला वॉर्डमध्ये हलवले जाईल. जखमा बऱ्यापैकी खोल होत्या परंतु आमच्या डॉक्टरांनी आणि आमच्या वैद्यकीय पथकाने त्याच्यावर खूप चांगले उपचार केले.”

सैफवर शस्त्रक्रिया करणारे डॉ. नितीन डांगे म्हणाले की, चाकू आतमध्ये अडकल्याने अभिनेत्याच्या मणक्याला गंभीर दुखापत झाली होती. “चाकू काढून टाकण्यासाठी आणि गळणाऱ्या स्पायनल फ्लुइडची दुरुस्ती करण्यासाठी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्याच्या डाव्या हाताला आणि मानेला उजव्या बाजूला आणखी दोन खोल जखमा होत्या, ज्यावर प्लास्टिक सर्जरी टीमने उपचार केले,” डॉ. डांगे म्हणाले.

अभिनेत्याच्या टीमने एक निवेदनही जारी केले, ज्यामध्ये असे म्हटले आहे की सैफवरील शस्त्रक्रिया सुखरूप पार पडली असून आता तो बरा होत आहे. डॉक्टर त्याच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत. कुटुंबातील सर्व सदस्य सुरक्षित आहेत आणि पोलिस घटनेचा तपास करत आहेत.”

गुरुवारी पहाटे 2 वाजताच्या सुमारास सैफवर त्याच्या 12 व्या मजल्यावरील वांद्रे येथील अपार्टमेंटमध्ये एका चोराने हल्ला केला. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, अभिनेता झोपलेला असताना घुसखोर सतगुरु शरण अपार्टमेंटमध्ये घुसला, परंतु घरच्या मदतनीस महिलेने चोराला हटकले. अभिनेत्याने परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी हस्तक्षेप केला परंतु चोरट्याने फ्लॅटमधून पळून जाण्यापूर्वी त्याच्यावर चाकूने वार केले.

संबंधित लेख

चुकवू नका

Recent Comments