नवी दिल्ली: सोमवारी दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या कार स्फोटानंतरच्या गोंधळाचे वर्णन प्रत्यक्षदर्शींनी केले आहे. रस्त्यावर मृतदेहांचे तुकडे विखुरलेले होते आणि एकामागोमाग अनेक वाहने आगीच्या भक्ष्यस्थानी पडली होती, असे या लोकांनी सांगितले. मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक 1 जवळ सायंकाळी 6.50 वाजता ट्रॅफिक सिग्नलजवळ उभ्या असलेल्या एका कारमध्ये स्फोट झाल्याचे वृत्त आहे. यामुळे चेन-रिअॅक्शनप्रमाणे एक लहान ट्रक आणि एक ई-रिक्षा यासह किमान सात इतर वाहने यात अडकली. स्फोटामुळे गर्दीच्या परिसरात घबराट निर्माण झाली.
मोहसीन अली नावाच्या रहिवाशाने सांगितले की, धूर आणि राखेने परिसर कोंदून गेला होता. त्यानंतर मोठा आवाज ऐकू आला. “काय झाले हे मला कळण्यापूर्वीच, माझ्या समोर एक व्यक्ती मृत्युमुखी पडली. मी पोहोचलो तेव्हा आग पसरली होती आणि सर्व काही जळून खाक झाले होते. पहिल्या स्फोटानंतर, आणखी दोन कार आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या.” तो म्हणाला. जवळच राहणारे राजधर पांडे म्हणाले की, “स्फोट इतका शक्तिशाली होता की आमचे घर हादरले. एक मोठा स्फोट झाला. माझ्या घराच्या खिडक्या हादरल्या. मी माझ्या घरातून आगीच्या ज्वाळा पाहिल्या आणि घटनास्थळी धावलो,” असे त्यांनी वृत्तसंस्थेला सांगितले.
एका दुकानदाराने सांगितले, “मी माझ्या आयुष्यात इतका मोठा स्फोट कधीच पाहिला किंवा ऐकला नव्हता. धडकेमुळे मी तीन वेळा पडलो. जणू सर्वजण मरणार आहोत असे वाटले,” तो म्हणाला. घटनास्थळी धावलेल्या 12 वर्षीय कचरा वेचक नजरने त्या भयानक दृश्याचे वर्णन केले. “मी एक ई-रिक्षा आगीत जळताना पाहिली आणि एक व्यक्ती आधीच मृतावस्थेत होती. जणू काही त्याच्या अंगावरून एक रॉड गेला होता. मृत झालेल्या दुसऱ्या व्यक्तीला गंभीर दुखापत झाली होती,” तो म्हणाला. एका रहिवाशाने सांगितले, की “रस्त्यावर मृतदेहांचे तुकडे पसरलेले होते. काय झाले, हे कोणालाही कळू शकले नाही. अनेक गाड्यांचे नुकसान झाले आहे.”
उपमुख्य अग्निशमन अधिकारी ए.के. मलिक यांनी सांगितले की, सात अग्निशमन दलांनी संध्याकाळी 7:29 पर्यंत आग आटोक्यात आणली. दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाची एक टीम घटनास्थळी तपास करण्यासाठी पोहोचली. लोक नायक जयप्रकाश नारायण रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक बी.एल. चौधरी म्हणाले की, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच आठ जणांचा मृत्यू झाला. स्फोटात डझनभर लोक जखमी झाले आहेत.

Recent Comments