नवी दिल्ली: दिल्ली प्राणीसंग्रहालयातील एकमेव आफ्रिकन हत्ती शंकरचा बुधवारी वयाच्या 29 व्या वर्षी मृत्यू झाला. या हत्तीचे आयुष्य म्हणजे एक शोकांतिका होती. दिल्लीच्या राष्ट्रीय प्राणीशास्त्र उद्यानाने गुरुवारी सांगितले, की तो दोन दिवसांपासून व्यवस्थित जेवत नव्हता. मृत्यूचे मुख्य कारण शोधण्यासाठी चौकशी सुरू आहे. “तो काल रात्रीच मरण पावला. मृत्यूच्या कारणांचा शवविच्छेदन आणि चौकशी पूर्ण होईपर्यंत उहापोह करता येणार नाही ” असे प्राणीसंग्रहालयाचे संचालक संजीत कुमार यांनी ‘द प्रिंट’ला सांगितले.
शंकर 2012 पासून एकाकी एका कुंपणात होता आणि तो हट्टी आणि आक्रमक वागू लागल्यानंतर त्याला साखळदंडांनी बांधून ठेवले होते. दिल्ली प्राणीसंग्रहालयाने म्हटले आहे की शंकर त्याच्या सौम्य स्वभावासाठी ओळखला जात होता. दिल्ली उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय आणि अगदी जागतिक प्राणीसंग्रहालय आणि मत्स्यालय संघटना (WAZA) यांनीही शंकरचे राहणीमान सुधारण्यासाठी आणि त्याला जोडीदार शोधण्यासाठी प्राणिसंग्रहालयाला वारंवार विनंती केली होती. दिल्ली प्राणीसंग्रहालय हे देशातील एकमेव प्राणीसंग्रहालय आहे जे केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाद्वारे थेट व्यवस्थापित केले जाते. “शंकरचा मृत्यू हा वर्षानुवर्षे चाललेल्या संस्थात्मक उदासीनता आणि दुर्लक्षाचा कळस आहे,” असे प्राणी कार्यकर्त्या आणि पीपल फॉर अॅनिमल्सच्या विश्वस्त गौरी मौलेखी यांनी द प्रिंटला सांगितले. “गेल्या दशकाहून अधिक काळ, प्राणी कल्याण कार्यकर्त्यांनी या प्राण्याच्या मानसिक छळाबद्दल वैज्ञानिक पुरावे सादर केले आहेत आणि याचिका दाखल केल्या आहेत.”
प्राणीसंग्रहालयाने सांगितले की बुधवारी रात्री आपत्कालीन उपचारादरम्यान शंकरचा मृत्यू झाला, परंतु 16 सप्टेंबरपूर्वी आजार किंवा असामान्य वर्तनाचा कोणताही अहवाल आला नाही. प्राणीसंग्रहालयाबाहेरील अधिकाऱ्यांचा असा विश्वास आहे, की त्याच्या अकाली मृत्यूचे कारण प्राणीसंग्रहालयाचा निष्काळजीपणा हेच आहे. “तो फक्त 30 वर्षांचा होता. सामन्यतः हत्ती 65-70 वर्षांपर्यंत जगतात. तो नुकताच प्रौढ झाला होता आणि अचानक त्याचे निधन झाले,” असे दिल्ली प्राणीसंग्रहालयाशी जवळून संबंधित असलेल्या एका तज्ज्ञाने सांगितले. शंकरला यापूर्वी एकांतवासात राहिल्यामुळे आरोग्याच्या समस्या होत्या, 2021 मध्ये पीटीआयने वृत्त दिले होते, की साखळ्यांमुळे त्याच्या पायांवर जखमा झाल्या होत्या. तसेच, सोबत्याशिवाय राहणे हे त्याला अतिशय त्रासदायक ठरले. त्यामुळेच तो आक्रमक झाला.
शंकरच्या बाबतीत अलिकडेच घडलेल्या घटनेत, ऑक्टोबर 2024 मध्ये वर्ल्ड असोसिएशन ऑफ झूज अँड अॅक्वेरियम्स (WAZA) ने शंकरच्या गैरवर्तनामुळे दिल्ली प्राणीसंग्रहालयाचे सदस्यत्व निलंबित केले. त्यानंतर, रिलायन्सच्या वनतारा प्राणीसंग्रहालयातील पशुवैद्यकांच्या पथकाने त्याच्या आरोग्याची तपासणी करण्यासाठी दिल्ली प्राणीसंग्रहालयाला भेट दिली. “शंकरला त्याच्या मानसिक आरोग्यासाठी त्याच्यासारख्या इतरांसोबत राहण्याची आवश्यकता आहे,” असे भारतातील जागतिक प्राणी संरक्षणाचे वन्यजीव प्रकल्प व्यवस्थापक शुभोवोतो घोष यांनी ऑक्टोबरमध्ये ‘द प्रिंट’ला सांगितले होते.
शंकरचा मृत्यू आरोग्य समस्या आणि संसर्गामुळे प्राणीसंग्रहालयात पाचपैकी चार नवजात वाघांच्या पिलांचा मृत्यू झाल्यानंतर अवघ्या एक महिन्याने झाला आहे. तसेच, प्राणीसंग्रहालयातील पक्ष्यांमध्ये एव्हीयन इन्फ्लूएंझामुळे शेड्यूल I पेंटेड स्टॉर्कचा मृत्यू झाला आणि प्राणीसंग्रहालय सध्या पर्यटकांसाठी बंद आहे. वारंवार इशारे देऊनही आणि शंकरच्या आरोग्याबद्दल दिल्ली प्राणीसंग्रहालयाचे WAZA सदस्यत्व रद्द करूनही, काही तज्ञ त्याच्या मृत्यूला प्राणीसंग्रहालयाच्या अधिकाऱ्यांच्या अपयशाचे लक्षण मानतात.
शंकरचा भारतातील प्रवास
1998 मध्ये शंकरने पहिल्यांदा भारतीय भूमीवर पाऊल ठेवले, त्याची महिला साथीदार, बोम्बई हिच्यासह. दोन्ही आफ्रिकन हत्ती झिम्बाब्वेचे तत्कालीन अध्यक्ष रॉबर्ट मुगाबे यांनी तत्कालीन भारताचे राष्ट्रपती शंकर दयाल शर्मा यांना भेट म्हणून दिले होते. बोम्बई आणि शंकर दोघांनाही केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाद्वारे चालवल्या जाणाऱ्या दिल्ली प्राणीसंग्रहालयात ठेवण्यात आले होते, परंतु बोम्बईचा दोन वर्षांतच मृत्यू झाला. त्यानंतर, शंकरला प्राणीसंग्रहालयात आशियाई हत्तींसोबत वाढवण्यात आले, परंतु लवकरच त्यांनाही दुसरीकडे हलवण्यात आले आणि तो एकाकी पडला. 2012 पासून, केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाच्या मार्गदर्शक सूचना असूनही, त्याला एकाकी कुंपणात ठेवण्यात आले.
2022 मध्ये, किशोरवयीन निकिता धवनने प्राणीसंग्रहालयात साखळ्यांमध्ये बांधलेली त्याची स्थिती पाहिल्यानंतर, शंकरसाठी जोडीदार शोधण्यासाठी किंवा त्याला जंगलात सोडण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. तथापि, शंकर हा आंतरराष्ट्रीय देशाकडून मिळालेली भेटवस्तू असल्याने आणि तो भारतातील एक विदेशी प्राणी असल्याने, त्याला भारतातील जंगलात सोडण्यास नियमांनी मनाई केली आहे. 2024 च्या WAZA निलंबनानंतर, झिम्बाब्वे आणि बोट्सवाना या दोन्ही देशांनी शंकरसाठी जोडीदार मिळवण्यासाठी एक मादी आफ्रिकन हत्ती पाठवण्यास स्वेच्छेने भाग घेतला. तथापि, दिल्ली प्राणीसंग्रहालयाने शंकरसाठी जोडीदार मिळवण्यासाठी पुढे कोणतेही पाउल उचलले नाही.

Recent Comments