नवी दिल्ली: ज्येष्ठ चित्रपट अभिनेते धर्मेंद्र यांचे निधन झाल्यानंतर बॉलिवूडमधून श्रद्धांजलीचा वर्षाव सुरू झाला. श्वसनाच्या त्रासासाठी धर्मेंद्र हे ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार घेत होते. त्यांना डिस्चार्ज मिळाल्यानंतर एका आठवड्यातच ही बातमी आली आहे. धर्मेंद्र 89 वर्षांचे होते आणि 8 डिसेंबर रोजी ते त्यांचा 90 वा वाढदिवस साजरा करणार होते. त्यांच्या कुटुंबाने अद्याप औपचारिक जाहीर निवेदन जारी केलेले नसले तरी, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. सेलिब्रिटींमध्ये अक्षय कुमार, करण जोहर आणि शिखर धवन यांनी शोकसंदेश पोस्ट केले आहेत. पंतप्रधान म्हणाले, “धर्मेंद्रजींच्या निधनाने भारतीय चित्रपटसृष्टीतील एका युगाचा अंत झाला. ते एक प्रतिष्ठित, वलयांकित व्यक्तिमत्व होते, एक असामान्य अभिनेते होते. त्यांनी प्रत्येक भूमिका अभ्यासपूर्णरीत्या जिवंत केली. त्यांनी विविध भूमिका ज्या पद्धतीने साकारल्या ते असंख्य लोकांना भावले.”
सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ समोर आले ज्यामध्ये हेमा मालिनी आणि मुलगी ईशा देओलसह त्यांचे कुटुंबीय पवन हंस स्मशानभूमीत दाखल झालेले दिसून आले. शाहरुख खान, सलमान खान, अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चनदेखील स्मशानभूमीत पोहोचताना दिसले.
2023 मध्ये आलेल्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटात धर्मेंद्र यांच्यासोबत काम करणारे चित्रपट निर्माते करण जोहर म्हणाले की, त्यांच्या निधनाने एका युगाचा अंत झाला आहे. “हा एका युगाचा अंत आहे. एक मेगा स्टार… मुख्य प्रवाहातील चित्रपटसृष्टीतील हिरो..धर्मेंद्र हे भारतीय चित्रपटसृष्टीतील एक लीजंड होते, आणि इतिहासाच्या पानांवर त्यांचे नाव सुवर्ण अक्षरांनी कोरलेले राहील. ते माणूस म्हणून सर्वोत्तम होते. आपल्या इंडस्ट्रीतील प्रत्येकाने त्यांना खूप प्रेम दिले .” असे करण जोहरने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे.
उल्लेखनीय बाब म्हणजे, श्रीराम राघवनचा बहुप्रतिक्षित युद्ध चित्रपट ‘इक्किस’ हा धर्मेंद्र यांचा मोठ्या पडद्यावरील शेवटचा चित्रपट असेल. अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा मुख्य भूमिकेत असलेला हा चित्रपट 25 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

Recent Comments