नवी दिल्ली: उत्तराखंड वक्फ बोर्डाने निर्णय घेतला आहे, की त्यांच्याकडे नोंदणीकृत सर्व मदरसे आता राज्य शिक्षण परिषदेचा अभ्यासक्रम स्वीकारतील. अधिकाऱ्यांनी सांगितले, की यामागील उद्देश त्यांच्या विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहातील शिक्षणाशी जोडणे हा आहे. ‘द प्रिंट’शी बोलताना, उत्तराखंड वक्फ बोर्डाचे अध्यक्ष शादाब शम्स म्हणाले, की “117 मदरसे त्यांच्या अधिकारक्षेत्रात आहेत आणि त्यांच्या विद्यार्थ्यांना आता हिंदी, इंग्रजी, विज्ञान, गणित, सामाजिक विज्ञान, इतिहास, भूगोल आणि संस्कृत असे महत्त्वाचे विषय शिकवले जातील. ते राम, कृष्ण, बुद्ध आणि पैगंबर मोहम्मद यांच्या कथादेखील शिकतील.”
उत्तराखंड वक्फ बोर्डाने 15 एप्रिल रोजी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की, “उत्तराखंड वक्फ बोर्डाकडे नोंदणीकृत सर्व मदरसे आधुनिक मदरसे म्हणून विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या उद्देशाने, उत्तराखंड शिक्षण परिषदेकडून मान्यता मिळवणे अनिवार्य आहे.” या निर्देशात असा इशारा देण्यात आला आहे की कोणत्याही मदरसा व्यवस्थापनाने त्याचे पालन न केल्यास त्यांच्याविरुद्ध विद्यमान नियम आणि कायद्यांनुसार कारवाई केली जाईल. या पत्रात कोणती कारवाई करावी हे स्पष्ट केलेले नाही. या पत्रात देहरादून येथील उत्तराखंड प्राथमिक शिक्षण महासंचालकांना सर्व जिल्हा मुख्य शिक्षण अधिकाऱ्यांना आवश्यक सहकार्य करण्याचे निर्देश देण्याची विनंती करण्यात आली आहे. शादाब शम्स म्हणाले की, वक्फ बोर्डाच्या मालमत्तेवर चालणाऱ्या सर्व मदरशांमध्ये उत्तराखंड शिक्षण परिषदेचा अभ्यासक्रम सुरू करणे सुलभ करण्यासाठी हे समर्थन आहे. मदरसा बोर्ड किंवा राज्याच्या शिक्षण विभागाकडे नोंदणी न केल्यामुळे उत्तराखंड सरकारने राज्यातील 170 हून अधिक मदरशांना सील करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी, मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी सांगितले होते, की शिक्षणाच्या नावाखाली कट्टरपंथी विचारसरणी वाढवणाऱ्या संस्था कोणत्याही परिस्थितीत राज्यात खपवून घेतल्या जाणार नाहीत.
उत्तराखंड वक्फ बोर्डाचे अध्यक्ष शम्स यांनी ‘द प्रिंट’ला सांगितले की, “मदरशांचे व्यवस्थापक, प्रशासक, मुतवल्ली (संरक्षक) आणि व्यवस्थापन समित्यांना उत्तराखंड शिक्षण परिषदेकडून मान्यता मिळवण्यासाठी त्यांच्या संबंधित जिल्ह्याच्या मुख्य शिक्षण अधिकाऱ्यांशी समन्वय साधण्याचे निर्देश देण्यात आले आहेत”. “आम्हाला मदरशांमध्ये शिकणाऱ्या आमच्या मुलांना इतर विद्यार्थ्यांइतक्याच संधी मिळाव्यात अशी आमची इच्छा आहे. सकाळी 8 ते दुपारी 1 या वेळेत उत्तराखंडमधील इतर विद्यार्थ्यांप्रमाणेच विज्ञान, हिंदी, इंग्रजी, गणित आणि अगदी संस्कृत या विषयांचा अभ्यास करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ते राम, कृष्ण, बुद्ध आणि पैगंबर मोहम्मद यांच्या कथादेखील शिकतील,” असे ते म्हणाले. ते पुढे म्हणाले, “अभ्यासक्रमात जे काही समाविष्ट आहे ते शिकवले जाईल आणि उत्तराखंडच्या शाळांमध्ये संस्कृत अनिवार्य असल्याने ते अभ्यासक्रमाचा एक भाग असेल. दुपारी 2 नंतर, विद्यार्थी कुराण, अरबी आणि उर्दू शिकून त्यांचे धार्मिक अभ्यास सुरू ठेवतील. ही रचना अगदी नर्सरी स्तरापासून लागू होईल.” शम्स म्हणाले की, “राज्यात आधीच डॉ. एपीजे अब्दुल कलाम मॉडर्न मदरसे स्थापन करण्यात आली आहेत जी राज्य अभ्यासक्रमाचे अनुसरण करतील. हे 117 मदरसे समान मॉडेल स्वीकारतील. आम्हाला या संस्थांच्या व्यवस्थापनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे आणि लवकरच ते लागू करण्याची आशा आहे,” असे ते म्हणाले.
वक्फ बोर्डाने मुख्यमंत्री धामी यांना डॉ. एपीजे अब्दुल कलाम मॉडर्न मदरशांच्या धर्तीवर यापैकी सुमारे 50 आधुनिक मदरशांना चालविण्यास पाठिंबा देण्याची विनंती केली आहे, जे या वर्षाच्या अखेरीस कार्यरत होण्याची अपेक्षा आहे. सध्या उत्तराखंडमध्ये नोंदणीकृत आणि नोंदणीकृत नसलेले सुमारे 1 हजार मदरसे आहेत, परंतु शम्स म्हणाले, की वक्फ बोर्ड त्यांच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या मदरशांची संख्या 250 ते 300 पर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवत आहे.
Recent Comments