मुंबई: महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मुघल सम्राट औरंगजेबाची कबर राजकीय तणावामुळे तात्पुरती बंद करावी लागली होती. त्याच्या जवळपास तीन वर्षांनंतर, हे स्थळ पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. जिल्ह्यातील खुलताबाद येथे असलेली ही कबर उध्वस्त करावी या मागणीसाठी हिंदुत्ववादी संघटना विश्व हिंदू परिषद (विहिंप) ने सोमवारी महाराष्ट्रभर निदर्शने केली. नागपूरमध्ये, विहिंप आणि बजरंग दलाच्या निदर्शनांमुळे शहरातील महाल परिसरात दोन गटांमध्ये हाणामारी झाली. जमावाने वाहनांची तोडफोड आणि दगडफेक केली.
लोकसभेत नागपूरचे प्रतिनिधित्व करणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लोकांना शांततेचे आवाहन केले. ‘एक्स’वर पोस्ट केलेल्या व्हिडिओ संदेशात ते म्हणाले, “काही अफवांमुळे नागपुरात जातीय तणाव निर्माण झाला आहे. नागपूरला नेहमीच शांत शहर म्हणून ओळखले गेले आहे. मी सर्वांना आवाहन करतो, की कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, शांतता राखा आणि रस्त्यावर उतरू नका. बेकायदेशीर कृत्यांमध्ये सहभागी असलेल्या प्रत्येकावर सरकार कारवाई करेल.”
नागपूरचे डीसीपी अर्चित चांडक यांनी एएनआयला सांगितले की, “ही घटना काही गैरसमजांमुळे घडली. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. येथील आमचे पथक मजबूत आहे. मी सर्वांना आवाहन करतो की त्यांनी बाहेर पडू नये… किंवा दगडफेक करू नये. दगडफेक होत होती, म्हणून आम्ही शक्तीप्रदर्शन केले आणि अश्रूधुराचा वापरही केला… काही वाहने जाळण्यात आली, आम्ही आग विझवली.” “काही पोलिस कर्मचारी जखमी झाले. “दगडफेकीत माझ्या पायालाही थोडी दुखापत झाली. पण आम्ही सर्वांना शांतता राखण्याचे आवाहन करतो… अफवांवर विश्वास ठेवू नका… कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नका आणि पोलिसांना पाठिंबा द्या. आम्ही कायदेशीर कारवाई करत आहोत.” असेही ते म्हणाले.
https://x.com/ANI/status/1901666249404473718
विहिंप महाराष्ट्रातील सर्व 36 जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना कबर पाडण्याच्या मागणीचे निवेदन देण्याची योजना आखत आहे. भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या नेत्यांनी,म्हणजे दोन्ही सत्ताधारी महायुती आघाडीच्या सदस्यांनी ही कबर पाडण्याची मागणी लावून धरली आहे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याने (एएसआय) या थडग्याबाहेर सुरक्षा वाढवली आहे. ही कबर या विभागाच्या अखत्यारीत येते. “आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात छोटी छोटी निदर्शने करत आहोत. पुढचे पाऊल म्हणजे आमची मागणी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोचवणे आणि जर त्यातूनही काही निष्पन्न झाले नाही तर आम्ही थडग्यावर कारसेवेचा अवलंब करू.” असे विहिंप प्रवक्ते श्रीराज नायर यांनी द प्रिंटला सांगितले.
खुलताबादमध्ये अनेक राजे आणि सूफी संतांना दफन करण्यात आले आहे. औरंगजेबाची कबर ख्वाजा सय्यद जैनुद्दीन शिराजी यांच्या कबरीच्या परिसरात आहे, ज्यांना तो त्याचे गुरू मानत असे. औरंगजेब या क्रूर प्रशासकाचे निधन 1707 मध्ये अहमदनगर येथे झाले. आता त्याचे नामकरण ‘अहिल्यानगर’ असे करण्यात आले आहे. औरंगजेबाच्या वसिहतनाम्यानुसार, त्याला त्याच्या आध्यात्मिक गुरूजवळ दफन करायचे होते.
1689 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजी महाराज यांना देहदंड देणारा औरंगजेब हे महाराष्ट्रातील अत्यंत वादग्रस्त व्यक्तिमत्त्व आहे. अगदी अलीकडेच प्रदर्शित झालेला, विकी कौशल अभिनीत ‘छावा’ हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. त्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचे औरंगजेबाशी झालेले युद्ध आणि औरंगजेबाने महाराजांना कैद करून त्यांच्यावर केलेले अमानुष अत्याचार चित्रित करण्यात आले आहेत. समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी या महिन्याच्या सुरुवातीला महाराष्ट्र विधानसभेत दावा केला होता, की चित्रपटात दाखवलेले काही घटक चुकीचे आहेत. त्यांनी असेही म्हटले होते, की औरंगजेब हा खरं तर एक चांगला प्रशासक होता. त्यानंतर आझमी यांना अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी विधानसभेतून निलंबित करण्यात आले.
‘कबर उद्धवस्त करण्याच्या मागणीसाठी हीच वेळ योग्य’
विहिंपने आताच कबर पाडण्याची मागणी का केली आहे, असे विचारले असता, नायर म्हणाले, “1947 पासून आपल्या सर्वांना माहीत आहे की, आपल्या देशात मुस्लिमधार्जिण्या सरकारने राज्य केले. 2014 नंतरच आपल्याला अयोध्येतील राम मंदिराच्या जीर्णोद्धारसारख्या मुद्द्यांवर कार्यवाही होताना दिसली. म्हणून, ही मागणी करण्याची ही योग्य वेळ आहे असे आम्हाला वाटते. ही मागणी भारतीय मुस्लिमांविरुद्ध नाही कारण मूळ मुस्लिमांचे पूर्वज मुघल नाहीत.” विहिंप रस्त्यावर उतरून निदर्शने करत असली तरी आता महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातही कबर पाडण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
या महिन्याच्या सुरुवातीला, छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असलेले साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी औरंगजेबाला चोर म्हटले आणि कबर पाडण्याची मागणी केली. “ज्यांना कबरीला भेट द्यायची आहे त्यांनी ती कबर त्यांच्या घरी घेऊन जावी” असेही ते म्हणाले. गेल्या आठवड्यात, शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी लोकसभेत हीच मागणी केली.
मागील आठवड्यात महाराष्ट्र विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कबर पाडण्याच्या आवाहनाला पाठिंबा दिला होता, परंतु ते कायदेशीर पद्धतीनेच करावे लागेल, असे त्यांनी म्हटले होते. कारण मागील काँग्रेस-नेतृत्वाखालील सरकारने ते संरक्षित स्थळ म्हणून एएसआयकडे सोपवले होते. काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सारख्या विरोधी पक्षांनी औरंगजेबाच्या कबर पाडण्याच्या मागणीला विरोध केला आहे आणि म्हटले आहे, की हे महाराष्ट्राच्या मराठा साम्राज्याचा इतिहास पुसून टाकण्याच्या उद्देशाने आहे. शिवसेनेचे (उबाठा) मुखपत्र सामनामधील सोमवारीच्या संपादकीयात म्हटले आहे की, “कबर पाडण्याची मागणी करणारे ‘इतिहासाचे शत्रू’ आहेत. ते महाराष्ट्राचे वातावरण बिघडवू इच्छितात आणि स्वतःची तालिबानी हिंदू अशी ओळख निर्माण करू इच्छितात. ते हिंदुत्वाचे विकृतीकरण करत आहेत आणि शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा अपमान करत आहेत.”
2022 मध्ये काय घडले?
मे 2022 मध्ये, ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) नेते अकबरुद्दीन ओवैसी यांनी कबरीला भेट दिली आणि फुले अर्पण केली, त्यानंतर राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) हे थडगे पाडण्याची मागणी केली होती. या वादाच्या पार्श्वभूमीवर, खुलताबादमधील मशीद समितीच्या विनंतीवरून एएसआयने पाच दिवसांसाठी कबर बंद ठेवली होती. त्यावेळी, शेख निसार अहमद, ज्यांचे कुटुंब सहा पिढ्यांपासून थडग्याची काळजी घेत आहे, त्यांनी द प्रिंटला सांगितले होते की, “छत्रपती संभाजीनगर शहरापासून सुमारे 28 किमी अंतरावर असलेले हे स्मारक जातीय तणावाच्या भीतीमुळे पहिल्यांदाच बंद करावे लागले”. अहमद म्हणाले होते, की त्यांचे पूर्वज औरंगजेबाचे खादिम (सेवक) होते.
“औरंगजेबाच्या मृत्युनंतर, त्यांच्या मुलाने सांगितले की आमच्या कुटुंबाने त्यांच्या वडिलांची चांगली सेवा केली आहे आणि आम्हाला त्यांच्यासोबत त्यांच्या समाधीस्थळी राहण्यास सांगितले. 1977 मध्ये माझ्या वडिलांच्या मृत्युनंतर, मी काळजीवाहू म्हणून काम हाती घेतले,” अहमद म्हणाले होते. अहमदचे कुटुंब उर्स (पुण्यतिथी) आणि इतर समारंभांचे आयोजन करते. गेल्या चार दशकांपासून हे कुटुंब रत्ने आणि सुगंधी द्रव्यांचा व्यवसाय करत आहे. अहमद थडग्याच्या बाहेर एक छोटे दुकान चालवतो. अहमदच्या मते, औरंगजेबाची इच्छा होती की त्याची कबर मातीची असावी. त्याच्या शेजारी तुळशीचे रोप असावे. अहमद पुढे म्हणाले होते, की लोक खुलताबादला केवळ औरंगजेबाच्या कबरीसाठीच नव्हे तर ते स्थळ म्हणजे सूफी संतांचा किल्ला आहे, म्हणूनही येतात. खुलताबादमध्ये भद्र मारुती मंदिर आणि डेक्कनचे आफ्रिकन वंशाचे लष्करी सेनापती मलिक अंबर यांची कबरही आहे.
Recent Comments