अंगावरच्या लष्करी पोषाखावर चार ‘स्टार पदके’ मिरवणारे पाकिस्तानी लष्करप्रमुख जे करू शकले नव्हते, ते पाचवा तारा मिळवल्यावर ते करू शकतील का? एक सर्वशक्तिमान पाकिस्तानी लष्करप्रमुख, एक जनरल म्हणून जे करत नव्हते, ते आता फील्ड मार्शल झाल्यावर करू शकणार आहेत का? या प्रश्नाचे उत्तर निश्चितच दिले जाऊ शकते, की ते आणखी काहीतरी करणार. ते त्यांच्या गणवेशाच्या कॉलरला, टोपीला, कारला आणि त्यांना हवे असल्यास, मुख्य युद्ध रणगाड्याला इतर कोणत्याही प्रकारच्या चिन्हाने सुशोभित करतील. असो, हा प्रश्न त्यांनाही सतावत असेलच. त्यांना माहीत आहे की हा पाचवा तारा त्यांना मिळू शकत नाही, आणि मिळाला तरी ते त्याचा काही फार सदुपयोग करू शकणार नाहीत. मग, अशा परिस्थितीत भारतीय सैन्याने चिंता करायला हवी का?
याचे थोडक्यात उत्तर असे आहे, की भारताने नेहमीच पाकिस्तानी सैन्यापासून सावध राहिले पाहिजे आणि तो आहेच. आता व्यवस्थेच्या आत किंवा बाहेरून (तुम्ही या व्यवस्थेत शाहबाज शरीफला कुठे बघता यावर अवलंबून) या विचित्र पदोन्नतीमुळे ही चिंता किंवा सावधगिरी थोडी वाढली आहे. चिंता ही आहे, की ते या पाचव्या ताऱ्याचे काय करतील? पाकिस्तान आणि या उपखंडाच्या संपूर्ण इतिहासात एखाद्याला पाचवा स्टार देण्याची ही दुसरी घटना आहे. (आपले आत्तापर्यंतचे पंचतारांकित लष्करी अधिकारी करिअप्पा, माणेकशॉ आणि अर्जन सिंग यांनी समारंभपूर्वक आपल्या पदाची सूत्रे स्वीकारली आणि अतिशय चमकदार कामगिरी बजावली. आधुनिक सैन्यात पाचवा स्टार देण्याची उदाहरणे दुर्मिळ झाली आहेत. जर एखाद्या महत्त्वाच्या देशाचे उदाहरण द्यायचे झाले तर इजिप्तच्या अब्देल फताह अल-सिसीचे उदाहरण देता येईल. शक्तिशाली अमेरिकन लोकांनीही मार्शल, मॅकआर्थर, आयझेनहॉवर आणि ब्रॅडलीसारख्या नावांनी ही उच्च पदवी रद्दबातल केली आहे. म्हणून, पाकिस्तानी लष्करप्रमुखांना या पदवीसह नक्कीच काहीतरी करायचे असेल. मी इदी अमीनच्या शैलीतून एक उदाहरण घेऊ इच्छितो आणि ‘ब्रिटिश साम्राज्याचा विजेता’ अशी पदवी इथे नमूद करू इच्छितो. पण नाही, ही विनोद करण्याची वेळ नाही.
पाकिस्तानमध्ये नागरी सरकार उलथवून सत्ता हस्तगत करणे हे खूप किचकट आणि कंटाळवाणे झाले आहे. त्यामुळे त्यांना हे सर्व करण्याची गरज नाही. आपले राजकीय-सामरिक विश्लेषण आता मुख्य मुद्द्यावर केंद्रित असले पाहिजे, की फील्ड मार्शल असीम मुनीर जनरल असीम मुनीरपेक्षा कितपत वेगळे असणार आहेत? 16 एप्रिल रोजी परदेशी पाकिस्तानींच्या मेळाव्यात जनरल यांनी केलेल्या भाषणातून आपल्याला त्यांच्या हेतूचा अंदाज आला आणि 22 एप्रिल रोजी पहलगाममध्ये घडलेल्या घटनेवरून ते काय करू शकतात हे स्पष्ट झाले. त्या भाषणात त्यांनी दिलेले आणखी एक वचन आहे जे अद्याप पूर्ण झालेले नाही: पाकिस्तानला “कठोर कणखर देश ” बनवण्याचे वचन. प्रचारासाठी विजय साजरा करणे ही एक गोष्ट आहे; त्यांना माहित आहे की त्यांच्या सैन्याला मोठा धक्का बसला आहे. तरीही, भारतीय विमान पाडल्याचे फुटकळ दावे लोकांना थोड्या काळासाठीच आनंद देऊ शकतात. नष्ट झालेल्या हवाई क्षेत्रांचे (सर्व सिंधू नदीच्या पूर्वेला असलेले) आणि मोठ्या जैश-लष्कर तळांचे चित्र सर्वत्र पसरेल. त्यांनी कितीही छाती ठोकली तरी, पाचव्या ताऱ्याची चमक प्रत्यक्ष वास्तवावर पडणार नाही. म्हणूनच, आता ते दुरुस्तीसाठी काहीतरी करू इच्छितात. खरं तर, त्यांना ते करणे आवश्यक असेल.
मी असाही विश्वास ठेवतो, की ते आपण कल्पना करू शकण्यापूर्वीच ते ही गोष्ट करतील. पाकिस्तानी सैन्याच्या सात वर्षांच्या दहशतवादी कारवायांच्या कारकीर्दीत, भूतकाळातील मोठे दहशतवादी हल्ले आणि त्यांना भारताने दिलेला प्रतिसाद यामुळे पाकिस्तानी सैन्यात इतकी भीती निर्माण झाली होती की सात वर्षे थोडी शांतता राहील. पण यावेळी नाही, कारण मुनीरने ते साध्य केलेले नाही. ते कधी कारवाई करतील, ते काय करतील, या सगळ्याबद्दल आपण फक्त अंदाज लावू शकतो, आपण निश्चितपणे काहीही सांगू शकत नाही. मी फक्त एकच गोष्ट निश्चितपणे सांगू शकतो. जर तुम्ही पुढील सहा-सात वर्षांचा विचार करत असाल तर मुनीर कुठे असतील हे मी तुम्हाला निश्चितपणे सांगू शकतो. पाकिस्तानचे राजकारण, संस्कृती आणि इतिहास आपल्याला सांगतो की तो चांगल्या स्थितीत राहणार नाही. पण प्रथम आपण पाहूया की ते चार-स्टार जनरल असताना त्यांनी कितपत शक्ती संपादन केली? ज्या नागरी सरकारच्या ‘निवडणुकीत’ ते सहभागी होते, ते आधीच त्यांच्यापुढे नतमस्तक झाले होते. छोटे शरीफ, शाहबाज यांचे ‘सिपाहसालर’ (या सरकारचे नेते मुनीर यांना पाचवा स्टार देण्यापूर्वी असे म्हणत असत) यांच्यासमोर असलेले खुशामत करणारे शब्द आणि हावभाव पंतप्रधानांच्या दर्जाचे असू शकतात का? तुम्ही त्यांना दरबारी प्रशंसक म्हणू शकता फार फार तर. मुनीर सर्व महत्त्वाच्या मुद्द्यांवर बोलत आहेत, अगदी देशाला ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनवण्याचे आश्वासनदेखील देत आहेत (जी सध्या फक्त 410 अब्ज डॉलर्सची आहे). त्यांनी लष्कराच्या वाढत्या शक्तीला आव्हान देणारे एकमेव नेते इम्रान खान यांना तुरुंगात टाकले आहे. त्यांनी यापूर्वी त्यांच्या पक्षावर बंदी घातली आहे, त्यांना निवडणुका लढवण्यापासून रोखले आहे. मुनीर यांच्या आवडत्या पक्षांच्या युतीला (पीएमएल-एनच्या नेतृत्वाखाली) ही एकतर्फी निवडणूकही जिंकता आली नाही, परंतु त्यामुळे काही फरक पडला नाही. त्यांनी त्यांच्या हाती सत्ता सोपवली. न्यायव्यवस्थेने आत्मसमर्पण केले आहे, लष्करी न्यायालयांना देशद्रोहासह काही गंभीर गुन्ह्यांसाठी नागरिकांवर खटला चालवण्याचा अधिकार दिला आहे. त्यांनी ‘संस्थात्मक चौर्या’द्वारे निवडून आलेल्या त्यांच्या कठपुतळी संसदेला घटनात्मक-घातक सुधारणांना मान्यता देण्यास भाग पाडले आहे आणि त्यांचा कार्यकाळही वाढवला आहे. त्यांनी न्यायाधीशांना काही ठोससवलतीही दिल्या आहेत. मुनीरने सर्व काही त्यांच्या नियंत्रणाखाली आणले आहे. पुढे काय होईल?
आता, फील्ड मार्शलच्या पदाच्या दृष्टिकोनातून ते पहा. जर त्यांनी पुढील सात वर्षांचा विचार केला तर, म्युच्युअल फंडांशी जोडलेला वैधानिक इशारा, ‘मागील कामगिरी भविष्यातील कामगिरीची हमी मानू नये’, त्यालाही लागू होईल अशी आशा करता येते. भूतकाळातील कामगिरी त्यांना सांगेल, की राजकीय आकांक्षा असलेल्या प्रत्येक ‘महान’ लष्करप्रमुखाचे नशीब वाईट राहिले आहे: पराभवाची लाज सहन करावी लागली, खटल्यांना सामोरे जावे लागले, देशातून हाकलून लावण्यात आले, चारपैकी तीन जण मारले गेले. अयुब, याह्या, झिया, मुशर्रफ, हे चौघेही त्याच माळेतील मणी.
जर आपण ते सविस्तरपणे पाहिले तर, झुल्फिकार अली भुट्टो हुकूमशहा बनले आणि त्यांचेही नशीब असेच झाले. मुनीरचे दोन पूर्ववर्ती, कमर जावेद पहवा आणि राहिल शरीफ, गणवेशात असताना ते कितीही शक्तिशाली असले तरी, त्यांनी थोडीफार समजूत दाखवली पण फार उल्लेखनीय कामगिरी करू शकले नाहीत. आज मुनीरइतका शक्तिशाली कोणताही पाकिस्तानी लष्करप्रमुख हा गोल्फ खेळण्यात निवृत्ती घालवण्याची सुखद कल्पना बाळगणार नव्हता. तो पर्याय नाकारला गेला, मुनीरकडे असे काही शिल्लक राहिले जे त्याच्यातील धार्मिक गुरू अल्लाहकडून मिळालेली संधी मानतात. मला वाटतं अल्लाहने मला निवडलं आहे, आणि जर असं असेल तर मला काय करण्यासाठी निवडलं गेलं आहे? त्याचा उदय फक्त पाकिस्तानपुरताच मर्यादित आहे का? देशाने आपल्याला एक लष्करप्रमुख दिला ज्याला नागरी राजवटीने संरक्षण आणि गृहमंत्री (अयुब) बनवलं, जो नंतर मुख्य मार्शल लॉ प्रशासक बनला, नागरी सरकार उलथवून टाकलं आणि राष्ट्रपती बनला, लवकरच स्वतःला फील्ड मार्शलची पदवी दिली. आपण याह्या, झिया आणि मुशर्रफ यांनाही लष्करी शासक म्हणून पाहिले आहे आणि त्यांचेही असेच भवितव्य आहे. शेवटच्या दोन लष्करप्रमुखांनीही निवडून आलेले सरकार सत्तेत आणण्यात यश मिळवले. या प्रकारचे ‘बोन्साय’ सरकार हे पाकिस्तानचे राजकीय शास्त्रातील अद्वितीय योगदान आहे. जेव्हा एक जनरल थेट सत्तेत नसतो, तेव्हा तो बाहेरून राज्य करतो. पाकिस्तानला आणखी एक अद्वितीय देणगी आहे: एक संकरित सरकार. आज आपल्याकडे असलेल्या सरकारचे तुम्ही कसे वर्णन कराल? एक फील्ड मार्शल सरकार आहे आणि त्याला आव्हान देणारी एकमेव व्यक्ती तुरुंगात आहे. तीन दशकांहून अधिक काळापूर्वी (इंडिया टुडे, 15 मे 1993), जेव्हा नवाझ शरीफ यांना लष्करी यंत्रणेने पदच्युत केले, तेव्हा त्यांनी मला एका मुलाखतीत म्हटले होते, “ही कोणत्या प्रकारची व्यवस्था आहे? अर्धा तीतर, अर्धा बटेर.” पुढच्या वेळी जेव्हा ते बहुमताने सत्तेत आले तेव्हा त्यांनी सांगितले की ते व्यवस्था ‘स्वच्छ’ करण्याचा प्रयत्न करतील, जेणेकरून ते (लष्कर) राज्य करतील किंवा आपण (निवडून आलेले नागरिक) राज्य करतील.
आज आपण जे पाहत आहोत त्याबद्दल ते काय म्हणतील हे मला माहित नाही, त्यांनी स्वतःला त्यांच्या देशातील राजकारणापासून दूर ठेवले आहे. तुम्ही ते कसे पहाल? एका लष्करप्रमुखाला फील्ड मार्शलच्या पदावर बढती दिली जाते, सर्वात लोकप्रिय नेता दोन वर्षांपासून तुरुंगात आहे आणि कपटाने निवडून आलेले नागरी सरकार सत्तेत आहे.
तुम्हाला आठवते का, एका ऑस्ट्रेलियन प्राण्याचे उदाहरण, पक्षी आणि सापांच्या वैशिष्ट्यांसह बदकाच्या तोंडाचा सस्तन प्राणी, जो पाचवीत जीवशास्त्र वर्गात प्रजातींच्या उत्क्रांतीचे स्पष्टीकरण देण्यासाठी वापरला होता? तुम्ही हसत असाल पण नाही, हा विनोद नाही. फील्ड मार्शल आज अशा प्राण्यांच्या गटाचे नेतृत्व करत आहे. तो त्यांच्यावर राज्य करू शकत नाही आणि त्यांना काहीही करू शकत नाही. पाच स्टार पदक हे विजयाच्या दाव्याइतकेच छातीवरचे मोठे ओझे आहे. भारताने तयार राहावे. मुनीर यांना पाच किंवा सात वर्षे थांबता येणार नाही. ते लवकरच पुन्हा आपल्या डोक्यावर बसायचा प्रयत्न करायला येऊ शकतात, कदाचित अगदी पुढील 12 महिन्यांतही!
(अनुवाद : तेजसी आगाशे)
Recent Comments