आपल्याला माहिती आहे, की ऑपरेशन सिंदूर अजून संपलेले नाही. सीमेवर शांतता असली तरी, शत्रुत्व हे सीमेवरून क्रिकेटच्या क्षेत्रापर्यंत पसरले आहे. जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था, तिसरी सर्वांत मोठी सेना आणि सर्वांत मोठी लोकसंख्या असलेला देश, ज्याने दहशतवादाविरुद्ध युद्ध सुरू केले, तो आता पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळायचे की नाही याबाबत निर्णय घेत आहे. हा स्तंभ खरे तर क्रिकेट, खेळ किंवा भारत-पाकिस्तान संबंधांबद्दल नाही. तो आपल्या खोलवर रुजलेल्या दांभिकपणावर भाष्य करण्याचा एक नम्र प्रयत्न आहे.
हा ढोंगीपणा उघड करण्यासाठी, मी तुम्हाला टोकियोच्या भव्य राष्ट्रीय स्टेडियमचे उदाहरण देऊ इच्छितो. तिथे जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भालाफेक स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या 12 खेळाडूंपैकी उपखंडातील चार खेळाडूंमध्ये (दोन भारतीय, एक पाकिस्तानी आणि एक श्रीलंकन) पहिली ऐतिहासिक स्पर्धा होत आहे. जर तुम्ही त्या दिवशी सोशल मीडियावर काय घडत होते याकडे लक्ष दिले असेल, विशेषतः भालाफेकीदरम्यान, तर तुमच्या लक्षात आले असते, की त्यावर काहीही ट्रेंडिंग नव्हते. नीरज चोप्रा आणि सचिन यादव हे पाकिस्तानच्या अर्शद नदीम विरुद्ध लढत होते आणि त्यात कोणताही राग, द्वेष नव्हता. हे आपल्याला विचार करायला भाग पाडते. 1896 मध्ये अथेन्समध्ये ऑलिंपिक खेळ सुरू होऊन 130 वर्षे उलटली आहेत, तरीही दोन अब्ज लोकसंख्या असलेल्या किंवा जगाच्या एक चतुर्थांश लोकसंख्येच्या या उपखंडाने फक्त तीन वैयक्तिक ऑलिंपिक सुवर्णपदके जिंकली आहेत. या तीन खेळाडूंपैकी दोन नीरज चोप्रा आणि अर्शद नदीम आहेत, जे अलीकडेच टोकियोमध्ये अंतिम फेरीत पोहोचले होते.
सर्वप्रथम, तुम्हाला या खेळांमध्ये लोकांना खूप रस असेल, असे तुम्हाला वाटू शकते. पण ते तसे नव्हते. भारताने पाकिस्तानशी खेळावे की नाही याबद्दलचाच तो उत्साह आणि उत्कंठा होती. मी पाकिस्तानी माध्यमे आणि सार्वजनिक वादविवाददेखील पाहिले. त्यांच्यासाठी, त्यांचा ऑलिंपिक सुवर्णपदक विजेता आणि विश्वविक्रमधारक त्याच्या सर्वात मोठ्या भारतीय प्रतिस्पर्ध्याचा सामना करणार होता! पण त्यांच्यामध्ये फारसा उत्साह नव्हता. खरं तर, आपला उत्साह फक्त क्रिकेटभोवतीच मर्यादित राहतो.
मी म्हणेन की, एका अर्थाने, हे आणखी चांगले आहे. पहलगाम दुर्घटनेतील मृतांसाठी अजूनही शोक व्यक्त केला जात असला तरीही, इंटरनेट आणि टीव्हीचे प्रेक्षक पाकिस्तानी खेळाडूविरुद्ध खेळताना आर्मी जेसीओ नीरज चोप्रा यांना त्रास देत नव्हते हे एक दिलासा देणारे आहे. क्रिकेट आणि अॅथलेटिक्स स्पर्धांभोवती भावनिक उलथापालथीतील फरक अंशतः आपल्या कट्टर क्रिकेटभक्तीमुळे आहे आणि ते एक किरकोळ कारणदेखील आहे. दुसरे कारण, किंवा अगदी प्राथमिक हेतू, सोशल मीडियावर प्रतिक्रिया भडकवण्याचा छंद आहे, ज्याला “एंगेजमेंट फार्मिंग” म्हणून ओळखले जाते. या संदर्भात, 24 तास एकप्रकारचा उन्माद निर्माण करण्यासाठी क्रिकेट कोणत्याही ऑलिंपिक स्पर्धेपेक्षा खूपच योग्य असल्याचे सिद्ध होते. या संदर्भात, मला त्या प्रमुख व्यक्तींची, विशेषतः पत्रकारांची आठवण येते, जे पहलगाम दुर्घटनेतील बळींच्या वडिलांचे अंत्यसंस्कार करतानाचे किंवा रडणाऱ्या विधवांचे फोटो पोस्ट करतात आणि विचारतात की आपण पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळून या पीडितांना न्याय देत आहोत का? माझा प्रश्न असा आहे: क्रिकेट न खेळता आणि पाकिस्तानला सामना देऊन टाकून तरी आपण त्यांना न्याय देऊ शकू का?
आपल्या हवाई दल, लष्कर आणि नौदलाच्या एकत्रित प्रचंड आक्रमक शक्तीचा वापर करून आपण त्यांना न्याय मिळवून दिला नाही का? जर अनेक मूढ पाकिस्तानी लोकांप्रमाणे तुम्हाला असे वाटत असेल, की जैश-ए-मोहम्मद आणि लष्कराच्या मुख्यालयांचा नाश, डझनभर पाकिस्तानी विमानतळांचा नाश आणि पाकिस्तानी रडार जाळून टाकणे हे मोजण्यापलीकडे आहे, तर यावर काय प्रतिक्रिया द्यावी? दहशतवादाविरुद्धच्या युद्धात आपल्या सैन्याने काय साध्य केले नाही किंवा भविष्यात गरज पडल्यास ते काय साध्य करू शकत नाही? सर्वच साध्य करू शकते. तर मग भारतीय क्रिकेट काय साध्य करू शकते?
खेळाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन ‘एकेश्वरवादी’ आहे, क्रिकेट हा आपला एकमेव देव आहे. या प्रकरणात, राग हा जिंकण्यापेक्षा खेळण्याने किंवा बहिष्कार टाकण्याने जास्त निर्माण होतो. जर सोशल मीडिया नसता, तर तुम्ही याला बालिश प्रवृत्ती म्हणून नाकारू शकला असतात. फरक असा आहे, की ही प्रवृत्ती टीव्ही वादविवादांवरही वर्चस्व गाजवते. प्रत्येक प्राइम-टाइम वादविवादात, दोन्ही बाजू अधिकाधिक आक्रमक आणि कटु बनतात, अपशब्द आणि थेट सांप्रदायिक आरोपांसह. उदाहरणार्थ, क्रिकेटपटू मोहम्मद युसूफ. तो सध्या तबलिगी जमातीचा वेश परिधान केलेला दिसतो आणि एका महिला निवेदिकेसमोर भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवचे नाव चुकीचे उच्चारून तो त्याची खिल्ली उडवताना दिसला. मी काही आता त्याचीच पुनरावृत्ती इथे करून त्याचा अनादर करणार नाही. पण अशा प्रकारची विकृत पद्धत दोन्ही बाजूंनी प्रचलित आहे.
अनेक लोक आता असा पवित्रा घेत आहेत, की कोणत्याही आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळणे राजकीय, सामरिक आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे नैतिकदृष्ट्या चुकीचे आहे. भारताने अशा स्पर्धांवर बहिष्कार टाकावा किंवा पाकिस्तानला सामने जिंकू द्यावेत अशी त्यांची इच्छा आहे. हा स्पर्धात्मक खेळांचा अपमान आहे. भारत दहशतवादाचा बळी आहे आणि ही निश्चितच वाईट गोष्ट आहे. तर, भारताने सर्व आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पाकिस्तानला वॉकओव्हर देत राहावे का? ही कोणत्या प्रकारची पराभूत भावना आहे? याचा अर्थ असा होईल की गेल्या 20 वर्षात कोणत्याही खेळात भारताविरुद्ध दहापैकी फक्त एकच सामना जिंकणारा पाकिस्तान आता न खेळताही जिंकेल.
काही क्रीडा आकडेवाऱ्या खूप बोलक्या आहेत. भारतीयांच्या दोन पिढ्या, ज्यामध्ये आज सर्वात जास्त नाराज असलेल्या पिढ्यादेखील आहेत, पाकिस्तानविरुद्धच्या पराभवाच्या आपल्या इतिहासाने पछाडल्या आहेत. परंतु गेल्या 25 वर्षात परिस्थिती उलट झाली आहे. उदाहरणार्थ, गेल्या 20 वर्षात भारताने 14 पैकी 11 टी-20 सामन्यांमध्ये पाकिस्तानला हरवले आहे. गेल्या दशकात पाकिस्तानविरुद्ध भारताचा एकदिवसीय सामना 8-1 असा आहे. 2017 मध्ये,ओव्हल येथे झालेल्या चॅम्पियनशिप ट्रॉफीच्या अंतिम सामन्यापर्यंत भारताची धावसंख्या 7-0 होती. पाकिस्तानचा विजय आता एक दुर्मिळ अपवाद बनला आहे. आता आपण हे सर्वसामान्य बनवावे का? सतत पराभूत होणाऱ्या पाकिस्तानचे सतत विजेत्यामध्ये रूपांतर केल्याने पहलगाम दुर्घटनेतील पीडितांना न्याय मिळेल का? पाकिस्तान आणखी ज्या खेळात प्रतिस्पर्धी राहिला आहे, तो म्हणजे हॉकी. तिथेही, क्रिकेटपेक्षा समीकरणे जास्त बदलली आहेत. गेल्या 10 वर्षांत, भारताने पाकिस्तानविरुद्ध खेळलेले सर्व सात सामने जिंकले आहेत, ज्यामध्ये 2023 च्या हांग्झो येथे झालेल्या आशियाई स्पर्धेत 10-2 असा विजय समाविष्ट आहे. 2012 पासून, पाकिस्तान हॉकी ऑलिंपिकसाठी पात्रही ठरू शकलेला नाही.
गेल्याच महिन्यात, बिहारमधील राजगीर येथे झालेल्या आशियाई चषकातून माघार घेण्याचा निर्णय घेतला. या चषकातील विजेता संघ आपोआप पुढील विश्वचषकासाठी पात्र ठरतो. भारतीय हॉकी फेडरेशन (IHF) वर सोशल मीडिया, प्रभावशाली व्यक्ती किंवा टीव्ही कमांडोकडून पाकिस्तानला आमंत्रित न करण्याचा कोणताही दबाव नव्हता. केवळ एखादा मूर्खच पाकिस्तानला खेळ जिंकण्याची संधी देऊ शकेल. तुम्ही म्हणू शकता की बंदी तात्पुरती आहे, कारण पहलगाम घटनेच्या जखमा अजूनही ताज्या आहेत. परंतु केवळ एक धाडसी सरकारच घोषित करू शकते, की लोकांच्या जखमा बऱ्या झाल्या आहेत आणि आपण आता पाकिस्तानसोबत खेळू शकतो. येथे, आपण मोदी सरकारचे त्याच्या समर्थकांपेक्षा जास्त शहाणपण दाखवल्याबद्दल कौतुक करू शकतो.
आज भारत जागतिक क्रिकेटमध्ये आघाडीवर आहे आणि हॉकी इंडिया लीगच्या पुनरागमनामुळे हॉकीमध्ये त्याचे वर्चस्व वाढत आहे. ते द्विपक्षीय मुद्दे बहुपक्षीय खेळांमध्ये येऊ शकत नाहीत. भविष्यात, आयसीसीचे जवळजवळ प्रत्येक प्रमुख भारतीय असतील. जय शहा आणि राजीव शुक्ला यांनी पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) आणि आशियाई क्रिकेट परिषदेचे (एसीसी) अध्यक्ष आणि पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसीन रझा नक्वी यांच्याशी बोलले पाहिजे. जागतिक गरजा मान्य केल्या पाहिजेत. शेवटी, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ उपस्थित असतानाही, पंतप्रधान मोदींनी तियानजिनमधील एससीओ शिखर परिषदेनंतर ग्रुप फोटोसाठी उभे राहण्यास नकार दिला नाही.
भूतकाळातील बहिष्कार किंवा निर्बंध उदाहरण म्हणून काम करू शकत नाहीत. इंदिरा गांधींच्या कार्यकाळात, भारताने त्यांच्या वर्णभेद धोरणांमुळे 1974 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध डेव्हिस कप फायनल खेळण्यास नकार दिला आणि विजय मिळवला. इंतिफादा हत्याकांडाच्या निषेधार्थ राजीव गांधींच्या सरकारने इस्रायलला रेलीगेशन राउंड सामना दिला. अमेरिकन आणि सोव्हिएत छावण्यांनी मॉस्को ऑलिंपिक (1980) आणि लॉस एंजेलिस ऑलिंपिक (1984) वर बहिष्कार टाकून प्रत्युत्तर दिले. युक्रेनियन युद्धामुळे रशियावर पॅरिस ऑलिंपिकमधून बंदी घालण्यात आली होती. अनेक देशांनी या बहुपक्षीय कृती केल्या होत्या.
एकतर्फी बहिष्कारामुळे केवळ भारतीय क्रिकेटचे नुकसान होईल आणि पाकिस्तानला विजय मिळेल. त्याहूनही वाईट म्हणजे आपण एका सौम्य सरकारप्रमाणे वागू. ऑपरेशन सिंदूरने आपण स्थापित केलेल्या सामान्यतेचा नवीन मानक, “नवीन सामान्यता” आणि ज्या प्रकारे आपण लष्कराला केंद्रस्थानी ठेवले आहे, ते पाहता आपल्याला हे सर्व करण्याची आवश्यकता नाही. भारतीय क्रिकेट या युद्धात ‘योद्धा’ नाही.
अनुवाद: तेजसी आगाशे

Recent Comments