गेल्या सहा दशकांमध्ये भारतीय राष्ट्रवाद किंवा देशभक्ती कशी विकसित झाली आहे हे समजून घेण्याचा एक दृष्टिकोन म्हणजे चित्रपट आणि विशेषतः बॉलिवूडने वेगवेगळ्या काळात त्याची व्याख्या कशी केली आहे हे पाहणे.
“भारत” मनोज कुमार (जन्म: हरिकृष्ण गिरी गोस्वामी, 24 जुलै 1937) यांचे 87 व्या वर्षी झालेले निधन आपल्याला यावर विचार ती संधी देते. त्यांनी इतर कोणत्याही अभिनेत्यापेक्षा देशभक्ती, राष्ट्रवाद, चांगले नागरिकत्व, कायदेशीर राहणीमान आणि सद्गुणी जीवनशैलीची एक वेगळी व्याख्या केली. त्यांनी निवडलेल्या ‘भारत’ या नावाने विविध पात्रे साकारताना त्यांनी परिपूर्ण भारतीयाचे चित्रण केले. 1996 मध्ये आलेल्या ‘हिंदुस्तानी’ या चित्रपटात कमल हसन यांनी अशीच एका आदर्श भारतीयाची भूमिका साकारली होती. असा भारतीय, जो स्वतःच्या ‘राष्ट्रविरोधी’ मुलाच्या पोटात जणूकाही तीक्ष्ण तलवारीचा वार करतो. हा लेख म्हणजे मनोज कुमार यांचा मृत्युलेख नाही. 1962 (चीनशी युद्ध) पासून आणीबाणीच्या आधीच्या काळात, आपल्या सर्वात धोकादायक दशकात, भारतीयांच्या दोन पिढ्यांसाठी देशभक्तीची व्याख्या करण्यात त्यांचे किती मोठे योगदान होते, याविषयीचा हा लेख आहे.
त्यांनी ‘भारत’च्या रूपात त्यागशील, वीर आणि विजयी असे पात्र साकारले. 1967 च्या ‘उपकार’ चित्रपटात एक सामान्य सैनिक (आणि हरियाणाच्या शेतकऱ्याचा मुलगा), 1969 च्या ‘पूरब और पश्चिम’मध्ये विश्वासघात झालेल्या स्वातंत्र्यसैनिकाचा हुशार मुलगा आणि 1974 च्या ‘रोटी कपडा और मकान’ (आरकेएम) मध्ये एक बेरोजगार अभियंता. या प्रत्येक भूमिकेने इंदिरा काळाच्या सुरुवातीपासून ते आणीबाणीच्या काळापर्यंत मोठा प्रभाव निर्माण केला. आपल्याला माहिती आहेच, ती भूमिका नंतर अमिताभ बच्चन यांनी घेतली.
मनोज कुमार यांनी 1965 च्या ‘शहीद’ चित्रपटात भगतसिंगांची भूमिका केली. तो हिट झाला आणि त्यांना प्रचंड प्रसिद्धी मिळाली. गोष्ट अशी होती, की मनोज कुमार लाल बहादूर शास्त्री (तत्कालीन पंतप्रधान) यांना भेटले, ज्यांनी तेव्हा नुकताच ‘शहीद’ पाहिला होता. तुम्ही ‘जय जवान, जय किसान’ या थीमवर चित्रपट का बनवत नाही?’ असे शास्त्रीजींनी विचारले. याचा परिणाम म्हणजे, 1967 मध्ये ‘उपकार’ हा पश्चिम दिल्ली आणि हरियाणाच्या बाहेरील गावांमध्ये चित्रित झाला. भरत हा एक नम्र शेतकरी (किसन) होता जो 1965 च्या युद्धात एक सामान्य सैनिक (जवान) म्हणून लढला. धोती-कुर्ता, नांगर घेऊन, तसेच रायफल, युद्ध रंग आणि रक्तासह लष्कराच्या गणवेशात तुम्हाला या ‘भरत’ची पोस्टर्स दिसतील.
पिढ्यानपिढ्या हिट ठरलेली गाणी ही एका यादीत मावणार नाहीत, इतकी आहेत. आपल्याला फक्त एकच विचार करायला हवा: ‘मेरे देश की धरती सोना उगले, उगले हीरे मोती’… गुलशन बावराच्या या ओळी कितपत टिकाऊ आहेत? दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश प्रतिभा सिंह यांनी जेएनयू कार्यकर्ते कन्हैया कुमारच्या जामीन आदेशात या ओळी वापरल्या. अर्थात, चित्रपटात, जय जवान, जय किसानच्या जयघोषाने गाणे त्याच्या ‘उच्चतम बिंदू’पर्यंत पोचते. हे बघून शास्त्रीजी स्वर्गातून गालातल्या गालात हसले असतील.
1969 मध्ये त्यांनी ‘भारत’ फ्रँचायझीला ‘पूरब और पश्चिम’ या चित्रपटासह एका वेगळ्या कथानकाकडे नेले. आजच्या काळात, तेव्हा तो चित्रपट करमुक्त असेल आणि पंतप्रधान, त्यांचे संपूर्ण मंत्रिमंडळ, जवळजवळ सर्व मुख्यमंत्री, अगदी सरसंघचालकदेखील त्यावर लक्ष ठेवतील. ‘उपकार’पेक्षा अगदीच विरुद्ध असलेला हा चित्रपट सांस्कृतिक राष्ट्रवादाभोवती बांधला गेला होता. एका विश्वासघात झालेल्या (आणि मारल्या गेलेल्या) स्वातंत्र्यसैनिकाचा मुलगा लंडनला पोहोचतो आणि त्याच्यासोबत असलेल्या कुटुंबातील मित्राची मुलगी (सायरा बानू) इतकी पाश्चात्य वळणावर जाते की ती धूम्रपान करते, दारू पिते, सोनेरी विग घालते, कधीही भारतात आलेली नाही आणि ती, तिचे वडील किंवा भाऊ यांनाही तिची काळजी नाही.
त्या पिढीतील अनिवासी भारतीयांना भारताबद्दल फक्त तिरस्कार होता आणि ‘भारत’ने ते दुरुस्त करायला सुरुवात केली. यामध्ये एका बारमध्ये ‘शून्य जो दिया मेरे भारत ने…’ असे गाणे गाणे समाविष्ट होते जेव्हा कोणीतरी त्याला असे म्हणत टोमणे मारतो. की भारताचे जगाला काय योगदान आहे? कारण भारताने जगाला शून्य आणि दशांशची देणगी दिली. भारताने पृथ्वी आणि चंद्र यांच्यातील अंतर मोजले. शेवटी तो सायरा बानूला अशा प्रकारे ‘सरळ’ करतो की, आज, तो महिलाद्वेष ठरेल. तो तिला अपमानित करतो आणि त्रास देतो जोपर्यंत ती भारतीय नारी बनत नाही. या चित्रपटाने एका ‘मेगास्टार’च्या उदयाची घोषणा करणाऱ्या दोन सुपरहिट चित्रपटांना मागे टाकले, तो मेगास्टार म्हणजे राजेश खन्ना. ‘पूरब और पश्चिम’ने त्या दोघांमध्ये स्वतःचे स्थान राखले. आणि तो अनिवासी भारतीयांची खिल्ली उडवत असूनही, तो लंडनमध्ये 50 आठवडे अखंड चालला, जो एक चतुर्थांश शतकाहून अधिक काळानंतर ‘हम आपके हैं कौन’ (1994) च्या विक्रमाशी बरोबरी करतो.
1965 नंतरच्या लष्करीकरणाच्या उच्चांकावरून, भारताच्या चिंता आता जगण्याच्या, बेरोजगारीच्या, भूकबळी, लाचखोरीच्या आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांभोवती फिरत होत्या. त्यामुळे ‘रोटी कपडा और मकान’मध्ये एका नवीन भारताचा जन्म झाला. ही कथा एका पात्र अभियंत्याबद्दल आहे जो स्वभावाने अतिशय सरळ आहे. ‘आकाशवाणी’साठी गाणी गाऊन तो (मैं ना भूलुंगा…) आपला उदरनिर्वाह करतो. मात्र त्याची मैत्रीण, (झीनत अमान) त्याला तिच्या बॉससाठी (शशी कपूर) सोडून देते. पण भारत लढतो, तो लढा जिंकतो आणि आपल्या सर्वांना (विशेषतः माझ्या किशोरवयीन पिढीला) मार्ग दाखवतो. दरम्यान, ‘शोर’साठी, तो भारतपेक्षा शंकरला प्राधान्य देतो. आणि संकल्पना पुन्हा एकदा पीडित पण धाडसी गरीब भारतीय, कामगार संप आणि श्रीमंतांविरुद्ध शोषितांची लढाई याकडे येते. त्याचे विचार अजूनही गुंजत आहेत: ‘एक प्यार का नगमा है’.
हे भारतासाठी अनेक प्रकारे निराशाजनक वर्ष होते. इंदिरा गांधींचा समाजवाद आणि 1973 नंतरची तेल आणीबाणी यांमुळे नोकऱ्या नष्ट झाल्या. ज्यामुळे आपल्याला रेशन दुकानांवर जावे लागले आणि महागाईचा दर जवळजवळ 30 टक्क्यांपर्यंत पोहोचला. बेरोजगारी ही त्या काळातली रोजचीच रड होती, आणि गुलजार यांनी त्यांच्या ‘मेरे अपने’ मध्ये ते पाहिले होते, तर मनोज कुमार यांनी लगेचच त्याचा ताबा घेतला. तथापि, ‘आरकेएम’ हे रूपक केवळ भारतीय नव्हते. ते बहुधा शोधून काढले गेले होते आणि निश्चितच बहुतेकदा झुल्फिकार अली भुट्टो यांनी वापरले होते, जे आता इंदिरा गांधींपेक्षा अधिक समाजवादी म्हणून स्वतःला पुन्हा सादर करत आहेत.
आणीबाणीने मनोज कुमारच्या जलद गतीला काहीशी खीळ बसली, परंतु त्यांच्या ‘भारत’ने ज्या सामाजिक-राजकीय परिस्थितीशी झुंज दिली होती त्या संतप्त तरुणाच्या उदयाला चालना मिळाली आणि ‘बच्चन’चा जन्म ‘जंजीर’, ‘दीवार’, ‘मुकद्दर का सिकंदर’, ‘कालिया’, ‘कुली’ या चित्रपटांसह झाला. 80 च्या दशकाच्या मध्यात, राजीव गांधींच्या ‘मेरा भारत महान’ राष्ट्रवादाने भारताने आणखी एक आशावादी वळण घेतले, तेव्हा ऐंशीच्या दशकातील बॉलीवूडची देशभक्ती त्यावेळच्या समांतर चित्रपटातून आली, ज्याने जातीयवाद, पितृसत्ता आणि इतर अन्यायांशी लढा दिला. विचार करा- ‘आक्रोश’, ‘मिर्च मसाला’, ‘अर्धसत्य’, ‘सलीम लंगडे पे मत रो’, ‘अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यों आता है?’ असे कित्येक सिनेमे.
‘रोजा’ (1992) ही इंडियन ऑइलच्या वरिष्ठ कार्यकारी अधिकारी के. दोराईस्वामी यांची काल्पनिक कथा, ज्यांचे काश्मिरी दहशतवाद्यांनी अपहरण केले. या चित्रपटाने कडवा राष्ट्रवाद पुन्हा एकदा जागवला. अरविंद स्वामी यांनी साकारलेले हे पात्र खूपच गाजले. (हा चित्रपट हिंदीमध्ये डब करण्यात आला होता आणि दोन्हीमध्ये तो प्रचंड हिट ठरला होता). ‘रोजा’ने दोन बंधने दूर केली. पहिले म्हणजे, मुस्लिमांना आता चांगला माणूस राहण्याची गरज नव्हती, त्यांनी नायकासाठी, त्याच्या जिवलग मित्रासाठी आपले जीवन अर्पण करावे लागले. तो आता दहशतवादी बनला होता. नवीन राष्ट्रवाद म्हणजे पाकिस्तानविरुद्ध युद्ध. मी ‘रोजा’ हा चित्रपट प्रथम तमिळ भाषेत मद्रासच्या एका चित्रपटगृहात आमच्या (इंडिया टुडे) तमिळ आवृत्तीच्या संपादिका वासंती यांच्यासोबत पाहिला आणि त्यांना सांगितले, की टॉलिवूडने नुकताच एक मोठा नवीन राष्ट्रीय ट्रेंड सुरू केला आहे. ‘रोजा’ने दाखवून दिले की पाकिस्तानविरुद्धचा राग आता उत्तरेकडील घटना राहिलेली नाही.
ती थीम पुढील दशकांमध्ये टिकून राहिली आणि आजही वाढत आहे. 1965 च्या आयएएफ फायटर पायलटच्या अपुर्या पद्धतीने साजरे केलेल्या शौर्याचे बॉलीवूड-आधारित वर्णन बघायचे असेल तर अगदी अलीकडेच आलेला ‘स्काय फोर्स’ सिनेमा पहा. तथापि, दरम्यान, आपल्याकडे सनी देओलचा काळ होता जेव्हा दहशतवादी सहसा जवळच्या मशिदीतून अजानच्या आवाजाने जागे व्हायचा आणि वाईट लोकांना – जवळजवळ नेहमीच मुस्लिमांना – तेव्हापासून विश्रांती मिळाली नाही. कारगिल युद्धामुळे स्वतःच्याच प्रकारचे हास्यास्पद, बालसुलभ युद्ध चित्रपट निर्माण झाले, ज्यांच्यावर निवडणुकीपूर्वीचा ‘उरी, द सर्जिकल स्ट्राईक’ हा चित्रपट आला. अर्थात, या सर्व चित्रपटांपैकी सर्वात मोठा ट्रिगर म्हणजे सनी देओलचा 1997 चा ‘बॉर्डर’.
मनोज कुमारचा हा ‘भारत’ आज काय करणार? ‘उपकार’मध्ये, त्याने युद्धाच्या प्रतिकूल गोष्टींबद्दलही भाष्य केले. आता, त्याला ते युद्ध जिंकावे लागेल आणि शत्रूला संपवावे लागेल. कारण शत्रू मूर्ख आहे आणि भारत आता उदयोन्मुख आहे. कारण शेवटी तो आता ‘विकसित’ आहे!
(अनुवाद : तेजसी आगाशे)
Recent Comments