scorecardresearch
Thursday, 25 December, 2025
घरराष्ट्रहिताच्या दृष्टीतून‘न्यू’ यॉर्क,‘न्यू’ कॉम्रेड: महापौर जोहरान ममदानी व त्यांचा देशी समाजवाद

‘न्यू’ यॉर्क,‘न्यू’ कॉम्रेड: महापौर जोहरान ममदानी व त्यांचा देशी समाजवाद

जोहरान ममदानी हे केवळ न्यूयॉर्क शहर किंवा अमेरिकन राजकारणातच नव्हे, तर भारतीय राजकारणातही चर्चेचा विषय ठरणार आहेत, असे चित्र आहे. ते बातम्यांमध्ये असतील असे म्हणण्याऐवजी, आजच्या डिजिटल युगाला आणि त्याच्या लोकसंख्येला अनुकूल असलेल्या भाषेचा वापर करून, ते काही काळ तरी सर्वाधिक 'गुगल सर्च' होणारे नाव असेल, असे आपण म्हणू शकतो.

जोहरान ममदानी हे केवळ न्यूयॉर्क शहर किंवा अमेरिकन राजकारणातच नव्हे, तर भारतीय राजकारणातही चर्चेचा विषय ठरणार आहेत, असे चित्र आहे. ते बातम्यांमध्ये असतील असे म्हणण्याऐवजी, आजच्या डिजिटल युगाला आणि त्याच्या लोकसंख्येला अनुकूल असलेल्या भाषेचा वापर करून, ते काही काळ तरी सर्वाधिक ‘गुगल सर्च’ होणारे नाव असेल, असे आपण म्हणू शकतो.

भारतीय वंशाच्या या 33 वर्षीय रुबाबदार आणि स्पष्टवक्त्या मुस्लिम व्यक्तिमत्त्वामध्ये लोकांना आकर्षित करण्याची प्रचंड क्षमता आहे. ते जगातील सर्वात उदारमतवादी, शक्तिशाली, श्रीमंत आणि यहूदी-बहुल शहराची सूत्रे हाती घेणार आहेत. भारतात, ते हिंदू-मुस्लिम संबंधांबाबतच्या चर्चेचा विषय बनले आहेत. उजव्या विचारसरणीच्या हिंदू मानसिकतेकडून या घटनेचा या उपखंडातील एका मुस्लिमाचा दुसऱ्या मोठ्या जागतिक शहरावर विजय अशा दृष्टीने विचार केला जाऊ शकतो. दुसरे मुस्लीम राजकीय व्यक्तिमत्त्व म्हणजे लंडनचे महापौर सादिक खान, हे आहेत. ममदानी हे गाझाचे समर्थक आहेत, अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या त्यांच्या प्रदेशात ट्रम्पविरोधी भावना ते निर्माण करतात आणि ‘डेमोक्रॅटिक डाव्यां’चे समर्थन करतात. अर्थात, या सर्व गोष्टींमुळे त्यांना एवढे महत्त्व प्राप्त झाले की दस्तुरखुद्द डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्यावर एक लांबलचक पोस्ट लिहिली. ट्रम्प यांनी त्यांना “100% कम्युनिस्ट” असे संबोधून त्यांची प्रशंसा केली, शिवाय, ” ते अतिशय उग्र दिसत असून त्यांचा आवाज कर्कश आहे” अशी स्तुतिसुमनेही उधळली.  ट्रम्प त्यांच्या उदयाचे श्रेय डेमोक्रॅटिक डाव्यांच्या चार महिला नेत्यांच्या ‘चौकडी’स देतात. त्यांना ते न्यू यॉर्कमधील अमेरिकन काँग्रेसच्या सदस्या अलेक्झांड्रिया ओकासिओ-कॉर्टेझ (एओसी) यांच्या नेतृत्वाखालील ‘पथक’ असे संबोधतात.

अमेरिकन राष्ट्राध्यक्षांची ही शब्दांची निवड निःसंशयपणे ‘ट्रम्पियन’ आहे. ट्रम्प यांच्या विश्वात, त्यांना न आवडणाऱ्या व्यक्तींसाठी ते कायमच ‘कम्युनिस्ट’ किंवा ‘माथेफिरू’ अशी विशेषणे वापरतात. उदाहरणार्थ, टिनटिन कॉमिक्सचा कॅप्टन हॅडॉक एखाद्याला साथीचा रोग निर्माण करणारा प्राणी किंवा अगदी ‘शाकाहारी’ म्हणतो आणि त्यांना नाकारतो. तसे, न्यू यॉर्कमधील कोणालाही अध्यक्ष ट्रम्प यांच्याकडून अपमानित झाल्याबद्दल वाईट वाटत नाही. आता राहिला प्रश्न,’माझा ममदानींच्या उदयाबद्दल काही आक्षेप,समस्या किंवा मत आहे का? उत्तरे अशी आहेत: समस्या? काहीही नाही; आणि मत? पाश्चात्य लोकशाही भारतीयांच्या उदयाचा अभिमान बाळगते. आम्हाला ऋषी सुनक, भारतीय उजव्या विचारसरणीचे काश पटेल, जय भट्टाचार्य आणि हिंदू अमेरिकन तुलसी गॅबार्ड यांचा अभिमान आहे, हे ‘भारतीय’ सीईओ सीनमधील स्टार आहेत. ममदानी त्यापैकी एक असतील. मला माहीत आहे, की मी जे बोलतोय ते आमच्या अनेक वाचकांना खटकू शकते.

भारतातील बरेच लोक ममदानींच्या उदयाला त्यांच्या श्रद्धा, त्यांची विचारसरणी, गाझासाठी त्यांचा पाठिंबा, नरेंद्र मोदी किंवा बेंजामिन नेतान्याहू यांच्याबद्दलची त्यांची नापसंती इत्यादींमुळे आणखी एक ‘भारतीय विजय’ म्हणून साजरा करू शकत नाहीत. या लोकांसाठी, हा चुकीच्या माणसाचा  विजय आहे. न्यू यॉर्कमधील भारतीय परिघामध्ये हे ध्रुवीकरण आधीच झाले आहे. मी फार प्रभावित झालो नाही. दुसरे काही नसल्यास, मी अभिमानाने सांगू शकतो, की मी माझ्या ‘वॉक द टॉक’ शोमध्ये जगातील सर्वात मोठ्या शहराच्या नवीन महापौरांच्या आईची (जर ते जिंकले तर) दोनदा मुलाखत घेतली आहे. तर, मी कशाबद्दल उत्साहित आहे? ते समजून घेण्यासाठी, त्यांच्या काही प्रमुख निवडणूक आश्वासनांवर चर्चा करू. ते बस भाडे रद्द करणार आहेत (दिल्ली, कर्नाटक, तेलंगणा आणि इतर शहरांचा विचार करा); 20 लाख अनुदानित घरांचे भाडे गोठवणार आहेत (आमचा भाडे नियंत्रण कायदा लक्षात ठेवा); आणि सार्वजनिक गृहनिर्माण विकास संस्थांद्वारे तीन वर्षांत आणखी 2 लाख घरे बांधणार आहेत  (भारतातील प्रत्येक शहरात डीडीए, म्हाडा, बीडीए इत्यादी आहेत); सहा आठवड्यांपासून ते पाच वर्षांच्या मुलांसाठी व्यापक बाल संरक्षण सेवा (अंगणवाडी?) प्रदान करणार; आणि कमी किमतीत वस्तू विकणारी सरकारी किराणा दुकाने उघडणार. तुम्हाला तुमची रेशन दुकाने, सेंट्रल स्टोअर्स आणि सहकारी सुपरमार्केट आठवत आहेत का?

हे असे उपक्रम आहेत, जे समाजवादी राजकारणाचे मोठे अपयश म्हणून भारतीयांच्या दोन पिढ्यांच्या लक्षात आहेत. जर तुम्ही वयाच्या 10 व्या वर्षी तुमच्या आईसोबत रेशन दुकानात रांगेत उभे राहून किराणा सामान खरेदी केले असेल, तर तुम्हाला कळेल, की मला काय म्हणायचे आहे. या सरकारी दुकानांनी साखर (1967 मध्ये, प्रति व्यक्ती, प्रति आठवडा 200 ग्रॅम) पासून गहू आणि कपड्यांपर्यंत सर्व काही पुरवले. जरी तुम्ही या दुकानांचा अनुभव घेतला नसेल, तरी तुमच्या शहरांमध्ये तुम्ही कामगार वर्गासाठी सरकारी निवासस्थाने पाहिली असतील, ज्यांना काँक्रीट झोपडपट्ट्या म्हणतात. नवी दिल्लीत, मी त्यांना दिल्ली विनाश (अरे, विकास) प्राधिकरणाने बांधलेल्या झोपडपट्ट्या म्हणतो. तुम्हाला प्रत्येक शहरात अशा झोपडपट्ट्या आढळतील. राज्य सरकारांच्या आर्थिक अडचणींमुळे आमच्या मोफत बस सेवा अपयशी ठरत आहेत. त्यांच्या मूळ देशात अयशस्वी झालेल्या या सर्व योजना ममदानी आपल्या कार्यक्षेत्रात राबवू इच्छितात. ममदानी इतके तरुण आहेत, की त्यांनी या कल्पना भारतातून घेतल्या असण्याची शक्यता नाही आणि त्याच्या पालकांनी स्वतःही त्यापैकी बरेच काही अनुभवले असण्याची शक्यता नाही. परंतु आधुनिक जगाला भांडवलशाहीचे स्वप्न देणाऱ्या आणि जलद यशाचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या शहरात समाजवादाची ओढ खूपच मनोरंजक आहे. त्याहूनही अधिक मनोरंजक म्हणजे न्यू यॉर्कमधील तरुणांमध्ये त्याबद्दलचे आकर्षण.

अमेरिकेतील जवळजवळ सर्व प्रमुख शहरांमध्ये, ज्या सर्व शहरांवर डेमोक्रॅट्सचे नियंत्रण आहे, तिथे हेच घडते. आणि ममदानी देखील त्या ‘टीम’च्या डाव्या बाजूला उभे आहेत. भांडवलशाही यशाचे ते ‘ब्रँड अ‍ॅम्बेसेडर’ असायला हवे होते.

किंवा असे आहे का, की या प्रकारचे यश अखेर समाजवादासाठी आधार तयार करते? तुम्ही समाजवाद करण्यास परवानगी देण्याइतके समृद्ध आहात? युरोप खूप श्रीमंत झाल्यावर डाव्या विचारसरणीकडे वळला आणि आता तो मार्ग बदलत आहे. श्रीमंत समाजांमधील समाजवाद स्थलांतरितांना आकर्षित करतो आणि त्याच्यासोबत वांशिक, धार्मिक विविधता आणि स्पष्टपणे सांगायचे तर, दूरच्या देशांमधून आदिवासी अंतर्गत संघर्ष आणतो. त्याविरुद्ध प्रतिक्रिया येते आणि उजवे परत येतात. सर्वोत्तम समाजवादाचे स्थान मानले जाणाऱ्या स्कॅन्डिनेव्हियामध्येही हे घडले आहे. भारताची समस्या अशी आहे, की वाईट विचारांनी कधीही ते सोडले नाही. फक्त चांगले लोक आणि सर्वोत्तम विचारांनी ते सोडले आहे. सर्वात हुशार, सर्वात महत्त्वाकांक्षी, उद्योजक भारतीयांनी अमेरिकेला त्यांचे घर बनवले. ते बनावट समाजवादापासून पळून जात होते.  मोदी सरकार वितरणात्मक कल्याणावर किती खर्च करत आहे आणि उजव्या विचारसरणीच्या भाजपने भारतीय समाजवाद्यांच्या ‘रेवडी’ संस्कृतीचा किती स्वीकार केला आहे ते पहा.

जानेवारी 1990 मध्ये सोव्हिएत युनियनच्या पतनाची बातमी ऐकताना, मी प्रागमधील एका टॅक्सी ड्रायव्हरकडून एक धडा घेतला. अभियांत्रिकीत पदव्युत्तर पदवी असलेला हा टॅक्सी ड्रायव्हर व्हॅक्लाव हॅवेलच्या देशाच्या अर्थव्यवस्थेला पूर्णपणे मुक्त करण्याची वाट पाहत होता. तो म्हणाला, “तुम्ही भारतीयांनी आणीबाणीच्या काळात तुमच्या राजकीय स्वातंत्र्यासाठी लढलात, पण आर्थिक स्वातंत्र्यासाठी कधीही लढला नाहीत?” त्याच्याकडे या प्रश्नाचे उत्तरदेखील होते: कारण तुम्ही लोकांनी कधीही आर्थिक स्वातंत्र्य अनुभवले नाही. तुम्हाला कधीच माहित नव्हते, की तुम्हाला हे स्वातंत्र्य नाकारले गेले आहे. हे संभाषण प्रागमधील वेन्सेस्लास स्क्वेअरवर होत होते, जिथे एका इमारतीवर एक झेंडा फडकत होता आणि त्यावर लिहिले होते: ‘मिस्टर टाटा, तुमच्या घरी स्वागत आहे’. ड्रायव्हर म्हणाला, साम्यवादाने टाटा यांना येथून हद्दपार केले होते. त्यांनी  कॅनडामध्ये खूप पैसे कमवले, आता तुम्ही भारतीय त्यांनी बनवलेले बूट घालता.

मीरा नायरसोबतच्या माझ्या ‘वॉक द टॉक’ कार्यक्रमासाठी, आम्ही जानेवारी 2005 मध्ये एका सकाळी जामा मशिदीत बोलण्याचे ठरवले होते. आम्ही संभाषण सुरू केले होते तेव्हाच शाही इमाम आले. ते खूप रागावले, “ताबडतोब थांबा!”. जेव्हा त्यांनी मला ओळखले तेव्हा ते म्हणाले, “मला तुमच्याबद्दल आदर आहे, तुम्ही जेव्हा हवे तेव्हा येथे रेकॉर्ड करू शकता. पण यांच्यासाठी नाही.” मी याचे कारण विचारले, आणि त्यांना सांगितले की जगभरात यांच्याबद्दल किती आदर आहे आणि त्या किती महान चित्रपट निर्मात्या आहेत. पण शाही इमाम याने अजिबात प्रभावित झाले नाहीत आणि त्यांनी त्यांच्यासाठी अशी विशेषणे वापरण्यास सुरुवात केली जी मी इथे सांगूही शकत नाही. मौलाना साहेबांनी त्यांचा ‘कामसूत्र’ चित्रपट पाहिला आहे की नाही किंवा त्याबद्दल ऐकले आहे की नाही याची अर्थात मला काही कल्पना नाही.

पण मग अखेर आम्ही तिथून निघून गेलो, बाहेर रस्त्यावर रेकॉर्ड केले आणि नान व निहारी असा नाश्ता करता करता आमचे संभाषण पूर्ण केले!

(अनुवाद : तेजसी आगाशे)

संबंधित लेख

चुकवू नका

Recent Comments