scorecardresearch
Monday, 8 September, 2025
घरराष्ट्रहिताच्या दृष्टीतूनभारताच्या ‘द्विआघाडी’ युद्धातील मुख्य प्यादे : ऑपरेशन सिंदूर

भारताच्या ‘द्विआघाडी’ युद्धातील मुख्य प्यादे : ऑपरेशन सिंदूर

आत्ता आपण जे पाहत आहोत, ती दोन आघाड्यांवरच्या युद्धाची सुरुवातीची चाल आहे. तुम्ही त्याला 'ट्रेलर' म्हणू शकता. या चातुर्य, संयम आणि लष्करी सामर्थ्याच्या आधारे लढलेल्या दीर्घ युद्धाच्या पहिल्या चाली आहेत.

इतिहास प्रत्येक लढाईला एक नाव देतो. अधिकृतपणे, संघर्ष संपला पण लढाई 87 तास चालली. भावी पिढीसाठी, याला 87 तासांची लढाई म्हणता येईल का? काहीही असो, मी हॅशटॅग-योग्य शीर्षकाऐवजी संपूर्ण वर्णनच इथे करतो. आत्ता आपण जे पाहत आहोत, ती दोन आघाड्यांवरच्या युद्धाची सुरुवातीची चाल आहे. तुम्ही त्याला ‘ट्रेलर’ म्हणू शकता. या चातुर्य, संयम आणि लष्करी सामर्थ्याच्या आधारे लढलेल्या दीर्घ युद्धाच्या पहिल्या चाली आहेत. मी ते अधिक संक्षिप्तपणे कसे स्पष्ट करू शकतो?

मी पुन्हा क्रिकेटची भाषा वापरण्याचा आणि या बुद्धिबळात उडी घेण्याचा मोह टाळेन. पाकिस्तानने ते सुरू केल्यापासून आणि पहलगाम येथे चिनी उपकरणे, तंत्रज्ञान आणि दिशानिर्देशांसह लढल्यापासून, मी म्हणेन की ते पांढऱ्या सोंगट्यांनी खेळत होते आणि पांढऱ्या सोंगट्या ज्याच्याकडे आहेत तो खेळाडू बुद्धिबळात पहिली चाल करत असल्याने, या चालीला पूर्वी बुद्धिबळाच्या भाषेत पीके4 आणि आता ई4 असे म्हटले जाऊ शकते. याचा अर्थ असा, की प्यादे राजासमोर दोन चौरस बघून ठेवले जातात आणि प्रतिस्पर्ध्याला या चालीला प्रतिसाद देण्यासाठी आमंत्रित केले जाते. या हालचालीला प्रतिसाद म्हणून, परदेशी नावे असलेल्या अनेक रणनीती स्वीकारल्या जाऊ शकतात, उदाहरणार्थ: इटालियन गेम, स्कॉच गेम किंवा रुई लोपेझ. मला अधिक योग्य वाटणारे नाव ‘किंग्ज गॅम्बिट’ आहे कारण ही रणनीती अधिक आक्रमक आहे आणि त्यात अनेक प्रकारच्या चाली करता येतात. पाकिस्तान आणि चीन एकत्र हा खेळ खेळत आहेत आणि त्यांनी एक प्यादे पुढे नेले आहे. राजा आणि राणीच्या सामर्थ्याने, प्यादे पाकिस्तानच्या अगदी समोर उभे आहे, राजाचा शूरवीर सल्लागार म्हणजेच चीन पार्श्वभूमीवर आहे. ते आता भारताच्या खेळीची वाट पाहत आहेत. आत्मसंतुष्टता ही रणनीती असू शकत नाही. वेळ वाया जात आहे. विविध अहवाल (मी येथे कोणत्याही टीव्ही चॅनेलचा संदर्भ देणार नाही) सांगत आहेत, की सैन्याने ‘रेड टीम’देखील तयार केली आहे, ज्यामध्ये कुशाग्र अधिकाऱ्यांच्या गटाला शत्रूसारखा विचार करण्याचे आणि प्रत्युत्तर देण्याचे काम सोपवले आहे. म्हणून ‘रेड टीम’च्या दृष्टीने विचार करा, की पुढची चाल काय असू शकते?

आपल्या विचारसरणीचा मूळ आधार असा आहे, की आपण दोन आघाड्यांवर लढण्याच्या द्विधेबद्दल विचार करत आहोत, परंतु कधीही असा विचार केला नव्हता, की आपल्याला एकाच वेळी दोन आघाड्यांवर लढावे लागेल. पाकिस्तान 1962 मध्ये दूर राहिला, परंतु अटींशिवाय नाही. त्यांनी काश्मीरवर चर्चेची मागणी केली, जी औपचारिकपणे अमेरिका आणि ब्रिटनच्या दबावाखाली सुरू झाली. चीन बहुतेकदा 1965 आणि 1971 मध्ये आणि कारगिलनंतर दूर राहिला होता, परंतु आता ज्या प्रकारे प्याद्याला राजापासून दोन घरे दूर आणले गेले आहे, त्यावरून हे स्पष्ट होते, की आता परिस्थिती बदलली आहे. लढाई दोन आघाड्यांवर सुरू आहे, फक्त चीनला थेट युद्ध लढण्याची गरज वाटत नाही. पाचव्या जनरेशनच्या लढाऊ विमानांसारख्या काही क्षेत्रांमध्ये, जर भारताला मागे टाकले नाही तर, एका वर्षाच्या आत, तो भारताला मागे टाकण्यासाठी आधुनिक उपकरणे विकत राहील. त्याचे उपग्रह आणि इतर आयएसआर संसाधने त्याच्या आश्रयस्थानांना उपलब्ध असतील आणि सल्ला त्वरित उपलब्ध होईल. म्हणूनच मी दोन आठवड्यांपूर्वी म्हटले होते, की पाकिस्तानकडून पुढील चिथावणीखोर कारवाई नेहमीप्रमाणे पाच किंवा सहा वर्षे चालणार नाही. ती त्याआधीच होईल, फील्ड मार्शल त्यांचे राजकीय भांडवल गमावण्यापूर्वीच.

तार्किकदृष्ट्या, रेड टीम असा निष्कर्ष काढू शकते की चीनला आता थेट भारताशी लढण्याची गरज नाही. त्याला फक्त पाकिस्तानला त्याच्या वतीने लढत राहण्यासाठी पुरेसे भांडवल देणे आवश्यक आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’वरील कोणताही अहवाल वाचा आणि तुम्हाला एक महत्त्वाचा धोरणात्मक संकेत दिसेल. या संपूर्ण संघर्षात कोणत्याही अमेरिकन शस्त्राच्या वापराबद्दल तुम्हाला वाचायला मिळणार नाही, अगदी एफ-16 विमानांच्या वापराबद्दलही नाही. पूर्व चेतावणी आणि नियंत्रण प्रणालींनी सुसज्ज स्वीडनचे SAAB Erieye AEW&C विमान चिनी इलेक्ट्रॉनिक्सने बनलेले आहे. म्हणून, तुम्ही हा चीन विरुद्ध भारत संघर्ष या दृष्टीने त्याकडे पाहू शकता, ज्यामध्ये पाकिस्तानी सैन्य आघाडीवर तैनात होते. अनेक दशकांपासून चीन आपल्याला दडपण्यासाठी पाकिस्तानचा वापर करत आहे. ही रणनीती आता दोन पावले पुढे गेली आहे. पहिले पाऊल म्हणजे चीन पूर्व लडाखमध्ये आला आणि आपण पाकिस्तानसाठी ठेवलेल्या सैन्याचा एक मोठा भाग तिथे तैनात केला. दुसरे पाऊल पाकिस्तानने थेट लष्करी आव्हानाच्या स्वरूपात उचलले. जेव्हा भारताने या ‘पीके4’ किंवा ‘ई4’ या बुद्धिबळाच्या चालीला आक्रमकपणे उत्तर दिले, तेव्हा दोन्ही भागीदार मागे हटले. पुण्यातील एका व्याख्यानात सीडीएस जनरल अनिल चौहान यांनी म्हटल्याप्रमाणे, दोघांनाही वाटले असेल की 9/10 मे च्या रात्री त्यांनी केलेले रॉकेट/क्षेपणास्त्र हल्ले भारताला गुडघे टेकून शरण यायला भाग पाडतील.

जेव्हा ही युक्ती अयशस्वी झाली, तेव्हा त्यांची सर्व रॉकेट/क्षेपणास्त्रे पाडण्यात आली आणि भारताने केलेल्या विनाशकारी प्रत्युत्तराने पीएएफला उडवून दिले आणि त्यांचे तळ उद्ध्वस्त केले, तेव्हा युद्धबंदी पुकारण्यातच शहाणपण होते. त्यांची ‘रेड टीम’ आता विचार करत असेल, की त्यांची चूक कुठे झाली आणि पुढील चकमकीसाठी कशी तयारी करावी? त्यांना आता काळजी असेल: भारताचे बहुस्तरीय हवाई संरक्षण, ज्याचे नेतृत्व एस-400 आणि ब्रह्मोस क्षेपणास्त्रांनी केले आहे जे पीएएफ क्षेपणास्त्रांच्या आवाक्याबाहेर आहे; चीनच्या एचक्यू-9सारख्या त्यांच्या स्वतःच्या हवाई संरक्षण यंत्रणेचा कमकुवतपणा आणि रेडिएशनविरोधी ड्रोन वापरून त्यांची क्षेपणास्त्रे निष्क्रिय करण्याची किंवा नष्ट करण्याची भारताची क्षमता, याचीही त्यांना कल्पना आहे. खात्री बाळगा, की चीन आणि पाकिस्तान या कमतरतांवर मात करण्यासाठी एकत्र काम करत आहेत. त्यांच्याकडेही एस-400 आहे आणि ते त्यातील त्रुटी शोधण्याचा प्रयत्न करू शकतात. ब्राह्मोसचा प्रतिकार करण्यासाठी ते रशियासोबतच्या काही कर्ज करारांचा फायदा घेऊ शकतात. पुढील जनरेशनचे लढाऊ विमान एफसी-31 लवकरच येत आहे, जे लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांनी सुसज्ज आहे.असे गृहीत धरणे योग्य ठरेल, की चीन आता पाकिस्तानला त्याचे वेस्टर्न थिएटर कमांड म्हणून पाहतो, जे भारताविरुद्ध केंद्रित असेल. मी असेही म्हणेन, की चिनी आर्मी पीएलए पाकिस्तानला त्याचे नवीन, सहावे थिएटर कमांड म्हणून पाहते. जर त्यांनी भारताला गुंतवून ठेवले, तर त्यांच्या स्वतःच्या वेस्टर्न थिएटर कमांडला चांगला वेळ मिळू शकेल. पाकिस्तान-चीन संबंधांवर अनेक पुस्तके आणि संशोधन पत्रे लिहिली गेली आहेत. आपल्या मर्यादित हेतूसाठी, आपण फक्त भूतकाळातील काही महत्त्वाच्या तारखा पाहू. 1960 मध्ये चाऊ एन लाई यांच्या भेटीनंतर भारत-चीन सीमेवरील परिस्थिती बिघडू लागली. 28 मार्च 1961 रोजी पाकिस्तानने चीनला आपल्या सीमेचे सीमांकन करण्याची मागणी करणारी एक चिठ्ठी पाठवली. पाकिस्तान आणि चीनची सीमा जोडली जाते, कारण चीनने काश्मीरचा एक भाग बेकायदेशीरपणे ताब्यात घेतला आहे.

फेब्रुवारी 1962 मध्ये, भारतासोबतचा संघर्ष वाढत असताना, संयुक्त राष्ट्रांमध्ये पाकिस्तानच्या वतीने बोलताना सर मुहम्मद जफरउल्लाह यांनी कबूल केले, की पाकिस्तान पीओकेमधील चीनच्या सीमेवरून आपले सैन्य मागे घेण्यास वचनबद्ध आहे. दोन महिन्यांनंतर, 3 मे रोजी, दोन्ही देशांनी चर्चा सुरू करण्यासाठी संयुक्त निवेदन जारी केले. भारताचा निषेध सुरूच आहे. 12 ऑक्टोबर रोजी, सीमा निश्चित करण्यासाठी पाकिस्तान आणि चीनमध्ये थेट चर्चा होतात. आठ दिवसांनंतर, चिनी पीएलएने हल्ला सुरू केला. हे संथ गतीने सुरू आहे. भारत-चीन युद्ध संपल्यानंतर फक्त चार महिन्यांनी, पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री झुल्फिकार अली भुट्टो नाट्यमयपणे बीजिंगमध्ये येतात आणि एक मोठा करार होतो ज्याअंतर्गत काही कुरणांच्या बदल्यात पीओकेचा 5 हजार 180 चौरस किमी (शक्सगाम खोरे आणि आजूबाजूचा परिसर) चीनला देण्यात येतो. अर्थात, भारत ते नाकारतो. फक्त दीडशे शब्दांचा हा अतिशय संक्षिप्त इतिहास चीन-पाकिस्तान मैत्री एकाच खांबावर कशी उभी आहे, हे स्पष्ट करतो. एक बाजू कम्युनिस्टविरोधी आणि अधिकृतपणे अमेरिकेचे समर्थन करणारी असूनही आणि दुसरी अजूनही सोव्हिएत युनियनची ‘बंधू’ असूनही ही मैत्री घडली.

या सहा दशकांत ही मैत्री आणखी मजबूत झाली आहे. फरक एवढाच आहे, की चीन हा जगातील दुसरी महासत्ता आहे आणि भारतही आता पूर्वीपेक्षा खूपच शक्तिशाली झाला आहे. म्हणून, चीन आणि पाकिस्तानला 1960 च्या दशकापेक्षा जास्त, आज एकमेकांची गरज आहे आणि जर चीन पाकिस्तानला भारताविरुद्ध लढायला लावू शकला तर तो ‘पैशाचा’ प्रश्न असेल. आपण या खेळाच्या सुरुवातीच्या चाली नुकत्याच पाहिल्या आहेत!

 

(अनुवाद : तेजसी आगाशे

संबंधित लेख

चुकवू नका

Recent Comments