scorecardresearch
Monday, 8 September, 2025
घरराष्ट्रहिताच्या दृष्टीतून'आयएसआयकडून 45 वर्षांपासून हिंदूंच्या हत्या, अंतर्गत युद्धांनी पोखरलेला देश हे उद्दिष्ट!’

‘आयएसआयकडून 45 वर्षांपासून हिंदूंच्या हत्या, अंतर्गत युद्धांनी पोखरलेला देश हे उद्दिष्ट!’

पाकिस्तानचा हिशोब असा आहे की, कधीतरी हिंदू त्यांच्याच अल्पसंख्याकांवर सूड उगवतील. आयएसआय भारतात हे संकट निर्माण करत आहे. स्वतःशीच सुरू असलेल्या अंतर्गत युद्धाने पोळून निघालेला भारत बघण्याची त्यांची इच्छा आहे.

पाकिस्तानचा हिशोब असा आहे की, कधीतरी हिंदू त्यांच्याच अल्पसंख्याकांवर सूड उगवतील. आयएसआय भारतात हे संकट निर्माण करत आहे. स्वतःशीच सुरू असलेल्या अंतर्गत युद्धाने पोळून निघालेला भारत बघण्याची त्यांची इच्छा आहे. पाकिस्तान आणि त्याच्या आयएसआयवर आरोप करून काहीच होणार नाही, कारण ती अप्रत्याशित गोष्ट आहे. गेल्या 45 वर्षांपासून त्यांनी भारताविरुद्ध दहशतवादाचा शस्त्र म्हणून वापर सुरू केला आहे, त्यामुळे घडते आहे ते अपेक्षितच होते.

प्रथम, या रणनीतीचे स्पष्टीकरण बघू. त्यासाठी सध्या अनेक शब्द वापरले जातात: प्रॉक्सी युद्ध, हिंसक जिहाद आणि बरेच काही. तथापि, आयएसआयच्या पद्धतीमध्ये एक धागा विशेषत्वाने दिसून येतो- भारतातील हिंदूंना विशेषतः लक्ष्य करण्यासाठी पाकिस्तानी जिहादी लष्कर किंवा भारतीय अल्पसंख्याकांमधील दहशतवादी प्रॉक्सींचा वापर. त्यांचा हिशोब असा आहे की, कधीतरी हिंदू त्यांच्याच अल्पसंख्याकांवर सूड उगवतील. ते भारतात हेतुतः निर्माण करत असलेले हे संकट आहे. स्वतःशीच युद्धात होरपळून निघालेले एक राष्ट्र. एका पातळीवर, ते एक प्रकारचे उलटे ‘शॅडेनफ्र्यूड’ असेल – जसे आपण स्वतःशी युद्धात आहोत तसेच तुम्ही स्वतःशीही युद्धात आहात. दुसऱ्या पातळीवर, ते भारताला सामरिक, लष्करी, राजकीय आणि नैतिकदृष्ट्या कमकुवत आणि विचलित करेल. तिसरा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. भारतातील बहुसंख्य हिंदू रागाने आणि निराशेने त्यांच्याच अल्पसंख्याकांवर हल्ला करत असल्याने, ते द्विराष्ट्र सिद्धांताला समर्थन देईल.

याला सर्वात महत्वाचे का म्हणायचे? 16 एप्रिल रोजी जनरल असीम मुनीर यांनी परदेशातील पाकिस्तानींना संबोधित करून दिलेले भाषण पहा आणि वाचा. जर तुम्ही त्यांच्या देशात संपत चाललेल्या विश्वासार्हतेचा तसेच कुराणातील भाषणांचा विचार केला, तर तुम्हाला वेदना कुठून येतात हे कळेल. हे पाकिस्तानच्या विचारसरणीवर आहे, 1971 मध्ये उद्ध्वस्त झालेल्या द्विराष्ट्र सिद्धांतावर. पाकिस्तानच्या पश्चिम प्रांतातील वांशिक अल्पसंख्याकांकडून त्या विचारसरणीला पुन्हा आव्हान दिले जात आहे. ते सर्व मुस्लिम आहेत. त्यापैकी बरेच जण बाहेर पडण्याची इतकी इच्छा बाळगतात. ते त्यासाठी मारण्यास आणि मरण्यास तयार आहेत. तर तुम्ही अजूनही पाकिस्तानच्या द्विराष्ट्र सिद्धांताचा आणि विचारसरणीचा मुद्दा कसा मांडता? अल्पसंख्याकांचा, विशेषतः मुस्लिमांचा भारतात छळ होत आहे हे सिद्ध करून. म्हणून कायद-ए-आझम यांचे आभार, जरी त्यांनी पाकिस्तानची स्थापना इस्लामिक कलमाच्या आधारे झाली या जनरलच्या सूचनेवर टीका केली असती. किंवा कदाचित इतक्या अचूक इंग्रजी भाषेत बोलणारे जिना यांना त्यांच्या वाईट इंग्रजीमुळे पाकिस्तानच्या विचारसरणीचे हे स्वयंघोषित रक्षक काय म्हणत आहेत, हे समजण्यास त्रास झाला असता.

आपण सुमारे 45 वर्षांपूर्वीपासून सुरुवात करण्याचे कारण म्हणजे अफगाणिस्तानवरील सोव्हिएत आक्रमणानंतर, अमेरिका आणि त्याच्या पश्चिम आणि मध्य पूर्वेकडील (विशेषतः सौदी) मित्रांनी पाकिस्तानला त्यांचा कट्टर मित्र म्हणून सामील केले आणि ‘काफिर’ सोव्हिएत विरुद्ध रणनीती म्हणून इस्लामिक जिहादचा वापर केला. जर मुस्लिम कम्युनिस्टांना ते ‘काफिर’ घोषित करू शकत होते, तर तसेच हिंदूंनाही. हे 1980-81 मध्ये पंजाबमध्ये भिंद्रनवालेच्या उदयाने सुरू झाले. सुरुवातीला त्यांनी पोलिस आणि निरंकारी पंथाच्या सदस्यांना लक्ष्य केले, परंतु लवकरच हिंदू त्याच्या माणसांच्या रडारवर आले. हिंदूंच्या स्पष्टपणे लक्ष्यित आणि विभक्त हत्याकांडाची पहिली घटना 5 ऑक्टोबर 1983 रोजी घडली. पंजाबमधील ढिलवान या छोट्या शहरातून कपूरथळाला जात असलेल्या एका बसला अडवण्यात आले, सहा हिंदूंना बाहेर काढले आणि गोळ्या घालण्यात आल्या. आधुनिक इतिहासातील हिंदूंचे हे पहिले लक्ष्यित आणि निवडक दहशतवादी हत्याकांड होते. हा धक्का इतका मोठा होता, की त्यामुळे भारत संतप्त झाला. इंदिरा गांधींनी पंजाबमधील त्यांचे स्वतःचे ‘दरबारा सिंग सरकार’ बरखास्त केले आणि राष्ट्रपती राजवट लागू केली.

त्यानंतरच्या काही महिन्यांत, हिंदूंच्या निवडक हत्याकांडात वाढ झाली, जोपर्यंत तो डीफॉल्ट दहशतवादी हल्ल्याचा नमुना बनला नाही. त्यानंतर 1989 पासून काश्मिरी दहशतवादी गटांनी पंडितांच्या हत्या, छळ आणि विस्थापन सुरू केले आणि आयएसआय समर्थित गट किंवा एलईटी सदस्यांनी मंदिरे, विवाहसोहळे, होळी आणि दिवाळी उत्सव, रामलीला, हिंदू धार्मिक मिरवणुका इत्यादींना लक्ष्य केले तेव्हा हे लोण संपूर्ण भारतात पसरले. एक भारतीय दहशतवादी गटही उदयास आला. तथाकथित इंडियन मुजाहिदीनने संपूर्ण भारतात मालिका बॉम्बस्फोट घडवून कहर केला, ज्यामध्ये दिल्ली, 2005 (62 ठार), जयपूर, 2008 (63 ठार) आणि दिल्ली, 2008 (20 ठार) यांचा समावेश आहे. या 45 वर्षांत, हिंदूंना लक्ष्य करून जवळजवळ शंभर हल्ले झाले आहेत. 1994 पर्यंत हल्लेखोरांमध्ये पंजाबमधील दहशतवादीदेखील होते. निश्चित तपशीलांसाठी तुम्ही दक्षिण आशिया दहशतवाद पोर्टल (SATP) तपासू शकता. दिल्ली आणि जयपूर बॉम्बस्फोटांव्यतिरिक्त मी फक्त काहींचा उल्लेख करतो.

प्रत्येक प्रकरणात, मृतांची संख्या – सर्व हिंदू, (जोपर्यंत एखादा विशिष्ट दहशतवादीही मरण पावला नाही) – कंसात आहे. ढिलवान बस हल्ला (1983, 6 मृत); फतेहाबाद बस हल्ला (1987,34); लालरू बस हल्ला (1987, 38); रुद्रपूर रामलीला बॉम्बस्फोट (1991, 41); लुधियाना ट्रेन हत्याकांड (1991, 125). आणि हो, हा 125 आकडा म्हणजे टायपो नाही. चेन्नई आरएसएस कार्यालयात बॉम्बस्फोट (1993, 11); नवी दिल्लीतील लाजपत नगर स्फोट (1996,13); दौसा स्फोट, राजस्थान (1996,14); कोइम्बतूर बॉम्बस्फोट (1998,58); अमरनाथ यात्रेकरूंवर हल्ला (ऑगस्ट 2000, 21); दोडा हल्ला (ऑगस्ट 2000,19); रघुनाथ मंदिर हल्ला, जम्मू (मार्च आणि नोव्हेंबर, 2002, 12 आणि 14 अनुक्रमे); अक्षरधाम मंदिर हल्ला (2002, 33); नदीमार्ग काश्मिरी पंडितांचा नरसंहार (2003, 24); अफझल गुरुच्या सुटकेची मागणी करणारे दिल्ली उच्च न्यायालयातील बॉम्बस्फोट (2011,15) इत्यादी.

ही शंभराहून अधिक हल्ल्यांपैकी फक्त एक सूचक यादी आहे. त्यात मुंबई रेल्वे नेटवर्कवरील मालिका बॉम्बस्फोट आणि अर्थातच 26/11 चा समावेश नाही. मला वाटते, की तथ्यांचा हा दुःखद साठा आपला मध्यवर्ती मुद्दा स्पष्ट करण्यासाठी पुरेसा आहे: आयएसआयची रणनीती भारतातील हिंदूंना लक्ष्य करण्यासाठी त्यांच्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष प्रॉक्सींचा वापर करणे आहे. त्यांना भारताच्या स्वतःच्या अल्पसंख्याकांवर संताप आणि प्रति-लक्ष्यीकरण हवे आहे.

मी तुम्हाला 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटांची आठवण करून देतो. बॉम्बस्फोटाच्या आदल्या दिवशी, अभिनेता संजय दत्तच्या घरासह काही निवडक ठिकाणी एके-47 आणि ग्रेनेडचे ढिगारे ठेवण्यात आले होते. कल्पना अशी होती की, अयोध्यानंतर झालेल्या दंगलींप्रमाणेच, शिवसैनिक मुस्लिमबहुल भागात हल्ला करतील आणि तेथे या शस्त्रांचा वापर करून शेकडो नाही तर हजारो लोक आणि पोलिसांची कत्तल केली जाईल. त्यावेळी संपूर्ण भारतात लागलेली आग कोण विझवू शकेल? मुंबईचे तत्कालीन उच्च पोलीस अधिकारी एम.एन. सिंग आपल्याला आठवण करून देतात, की तोपर्यंत महाराष्ट्र पोलिसांकडे एके-47 देखील नव्हती. शरद पवारांनी ‘वॉक द टॉक’मध्ये माझ्याशी बोलताना एक गोष्ट उघड केली होती, व त्यावरून अजूनही त्यांच्यावर टीका होते. ते जाणूनबुजून खोटे बोलले होते, की एक बॉम्बस्फोट मशिदीत झाला होता. त्यांना वेळ मिळवायचा होता आणि कोणत्याही जातीय दंगली होण्यापूर्वी संवेदनशील ठिकाणी पोलिस तैनात करायचे होते. एका अनुभवी नेत्याने केलेली ही एक हुशार आणि धाडसी चाल होती. बॉम्बस्फोटानंतर कोणताही दंगल झाली नाही. मुंबईने आयएसआयचा पराभव केला.

तुम्ही आता याला पाकिस्तानी प्लेबुक सबव्हर्जन 101 म्हणू शकता. भारतातील हिंदूंना इतके क्रूरपणे आणि इतके दिवस वेदना द्या, की ते शेवटी त्यांच्याच अल्पसंख्याकांवर हल्ला करतील. हाच त्यांचा हेतू आहे. म्हणूनच कॅनडामध्येही पाकिस्तानी लोकांशी जुळवून घेणारे शीख कट्टरपंथी हिंदू मंदिरांवर हल्ला करतात आणि त्यांची विटंबना करतात. आता हे कोणाला चांगले समजते ते पाहूया. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आरएसएस आणि असदुद्दीन ओवैसी यांच्यासारख्या वैचारिकदृष्ट्या बरोबर एकमेकांच्या विरुद्ध आणि टोकाच्या विचारसरणी असलेल्या लोकांचे आपण उदाहरण घेऊ. मोदींनी बिहारमधील भाषणात हिंदू, कलमा किंवा सांप्रदायिक पैलू दर्शविणारा कोणताही शब्द वापरला नाही. ही एक अत्यंत मुत्सद्दी चाल होती. ती केवळ एक चूक होती का? मी सकारात्मक असेन आणि ते आरएसएसमधील दुसऱ्या क्रमांकाचे कथित दत्तात्रेय होसाबळे यांच्या विधानासोबत मी वाचेन, ज्यांनी पहलगाम हल्ल्याचे ‘पर्यटकांचा’ नरसंहार म्हणून वर्णन केले. त्यांना माहित आहे, की या महत्त्वाच्या टप्प्यावर भारतासाठी अंतर्गत स्थिरता आणि शांतता किती महत्त्वाची आहे. म्हणूनच ओवैसी दहशतवाद्यांविरुद्ध अशी भाषा वापरत आहेत जी आपल्या राजकारणात कुठेही वापरली जात नाही,अगदी भाजपच्या एकदम उजव्या बाजूलाही नाही: कुत्ते, कमिने, हरामजादे. त्यांना माहिती आहे, की पाकिस्तानी लोकांनी हिंदूंना मुद्दाम लक्ष्य केले आहे. त्यांना हिंदूंना सांगायचे आहे, की भारतीय मुस्लिम त्यांच्यासोबत उभे आहेत. ते सहनागरिक आहेत, या हल्ल्याने खुश झालेले शत्रू नाहीत.

पाकिस्तानी आणि त्यांच्या आयएसआयने पुन्हा एकदा भारतीय बहुसंख्य लोकांच्या संयमाला अविश्वसनीय दबावाखाली आणले आहे. 45 वर्षांहून अधिक काळ अपयशी ठरलेल्या नाटकातील हा आणखी एक, सर्वात क्रूर अध्याय आहे. तो पुन्हा अपयशी ठरवणे आपल्या हिंदूंचे काम आहे. शेवटी, आपला स्वतःचा देश म्हणवण्यासाठी आपल्याकडे फक्त एकच देश आहे. आणि आपण 5 हजार वर्षांहून अधिक काळ अस्तित्वात आहोत, काही फुटीर विचारसरणीच्या आधारे अचानक दुसऱ्या दिवशी निर्माण झालेला देश म्हणजे आपण नाही.

 

(अनुवाद : तेजसी आगाशे)

संबंधित लेख

चुकवू नका

Recent Comments