अमेरिकन नौदलाने इराणी फ्रिगेट आयआरआयएस देना बुडवली, या घटनेवर व्यक्त झालेला संताप एका मथळ्यात समजावता येईल: डोनाल्ड ट्रम्प यांनी केवळ अमेरिकेच्या मित्रदेशांसाठी, भागीदारांसाठी आणि सहकाऱ्यांसाठी अपमानाचे नवे युग सुरू केले आहे. भारतासाठी याचे उत्तर दुसऱ्या एका ‘एच’ शब्दात दडलेले आहे, त्याबद्दल थोड्या वेळाने बोलू.
ही गोष्ट समजून घेण्याचा आणखी एक सोपा मार्ग आहे, तो म्हणजे भारतीय ट्रकचालकांची विनोदी तर्कशैली. महामार्गावर धावणाऱ्या ट्रक्सच्या मागे एक मजेदार ओळ लिहिलेली दिसते: “ऐसा कोई सगा नहीं, जिसको हमने ठगा नही.” याचा थोडक्यात अर्थ म्हणजे,” अशी एकही जवळची व्यक्ती नाही, जिला आम्ही फसवले नाही. आता या वाक्यातील ‘सगा’ऐवजी ‘मित्रदेश किंवा भागीदार’ असा शब्द घेतला, आणि ‘ठगा’ऐवजी ‘अपमानित’ असा शब्द वापरला, तर चित्र स्पष्ट दिसते. ट्रम्प यांची पद्धत म्हणजे, अमेरिकेच्या मित्रदेशांना उघडपणे आणि कठोरपणे दबावाखाली ठेवणे. युरोपचे पारंपरिक अवलंबित्व असो, किंवा भारताबरोबर नव्याने निर्माण झालेले संबंध असोत, ट्रम्प यांना माहिती आहे, की ते थेटपणे संघर्ष करू शकत नाहीत.
त्यांनी अनेकदा या देशांच्या नेत्यांचा सार्वजनिकरीत्या अपमान केला आहे. या आठवड्यात त्यांनी कीर स्टार्मरच्या बाबतीत तेच केले, आणि त्यांनी असेच याआधी स्पेन, डेन्मार्क, नॉर्वे, कॅनडा, युक्रेन, दक्षिण आफ्रिका, फ्रान्स, तटस्थ स्वित्झर्लंड आणि इतर देशांच्या नेत्यांसोबत केले होते. स्पेनने इराणविरुद्धच्या युद्धासाठी आपले लष्करी तळ वापरू दिले नाहीत, तेव्हा ते म्हणाले, की ‘अमेरिका तुम्हाला विचारणारच नाहीये’. डेन्मार्क आणि नॉर्वेसोबत अनुक्रमे ग्रीनलँड आणि नोबेल पुरस्काराच्या चर्चेचा मुद्दा पुढे आला. दक्षिण आफ्रिकेबद्दल त्यांनी एलॉन मस्क यांनी मांडलेल्या ‘गोऱ्यांचा नरसंहार’ या कथनावर विश्वास ठेवला. आणि, व्लादिमिर झेलेन्स्कीविषयीचे त्यांचे प्रेम आपल्याला माहीतच आहे. एवढ्यावरच ते थांबलेले नाहीत. इराणविरुद्धच्या ड्रोन हल्ल्यांसाठी मदतीसाठी ते युक्रेनकडेच पाहत आहेत.
यातून, दोन गोष्टी स्पष्ट दिसतात. पहिली म्हणजे, ट्रम्प व्यवहारवादी असू शकतात. मित्रदेशांचे केले अपमान ते कधीच मनाला लावून घेत नाहीत. वर अशी अपेक्षा करतात, की देशही ते अपमान मनाला लावून घेणार नाहीत. हीच गोष्ट अडचणीची ठरू शकते. युरोप अमेरिकेवर इतका अवलंबून आहे, की तो उघडपणे नाराजी व्यक्त करू शकत नाही. जर एखाद्या देशाला स्वतःचे संरक्षण करता येत नसेल, तर ज्याच्याकडे त्याने आपली सुरक्षा सोपवली आहे,त्याच्याकडून होणारा अपमान शांतपणे सहन करावा लागतो. लोकप्रिय नेते आणि स्वतःचे रक्षण करण्याची क्षमता असलेल्या इतर लोकशाही देशांसाठी ही ‘ट्रम्प नीती’ फारशी उपयोगाची नाही. भारत यापैकी सर्वांत महत्त्वाचा देश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल ट्रम्प यांनी एकदा कॅमेऱ्यासमोर सहज बोलताना म्हटले होते: “मला त्यांची राजकीय कारकीर्द उध्वस्त करायची नाही”.
मात्र हा संदर्भ गोंधळात टाकणारा होता आणि व्यापार, रशियन तेल किंवा अन्य मुद्द्यांशी संबंधित असे याचे अनेक अर्थ काढले जाऊ शकतात. लढाई थांबवण्यासाठी व्यापार थांबवण्याची धमकी दिल्याचा दावा ट्रम्प यांनी अनेकदा केला आहे. आता त्याची मोजणी करणेही आपण बंद केले आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान विमाने पाडली गेली, असाही दावा त्यांनी केला आहे. अर्थात ती कोणाची, हे मात्र ते स्पष्ट करत नाहीत. ट्रम्प हे सूक्ष्मपणे सगळ्याचा विचार करून बोलणारी व्यक्ती नाहीत. आपण प्रकाशझोतात राहावे, हीच त्यांची मुख्य चिंता असते. आपल्यावरील प्रकाशझोत एखाद्या दिवशी जरी हटला, तरी ते थेट एखाद्या कॅबिनेट सदस्यालाच पदावरून दूर करतात. उदाहरणार्थ, त्यांच्या गृहसुरक्षा सचिव क्रिस्टी नोएम यांची त्यांची बडतर्फी. यातून दुसरी एक गोष्टही स्पष्ट होते: ती अशी, की आपल्यावर अवलंबून असलेल्या लोकांवर, म्हणजे अमेरिकेच्या मित्रदेश किंवा सहकारयांवर हल्ला करणे त्यांना सोपे वाटते. परंतु ते शी जिनपिंग, व्लादिमीर पुतिन आणि किम जोंग उन यांच्याशी मात्र नम्रतेने वागतात. ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळात नोएम या पदावरून काढल्या गेलेल्या महत्त्वाच्या व्यक्ती ठरल्या. पहिले होते मायकेल वॉल्टझ. भूतकाळातील अनुभव बघता, पुढेही बरेच काही घडू शकते.
त्यांच्या पहिल्या कार्यकाळात त्यांनी सात कॅबिनेट दर्जाच्या अधिकाऱ्यांना काढून टाकले आणि जवळजवळ तितक्याच जणांना राजीनामा द्यावा लागला. आजही त्यांचे काही माजी सहकाऱ्यांशी संघर्ष सुरू आहेत. उदा., माजी एनएसए जॉन बोल्टन आणि सल्लागार स्टीव्ह बॅनन. ट्रम्प यांनी विविध टप्प्यांवर आपल्या विविध लोकांना उद्देशून असे काही शब्द वापरले आहेत, जे आपल्या संस्कृतींमध्ये अपमानास्पद मानले जातील.
यावरून एक गोष्ट सिद्ध होते: ट्रम्प यांचे ‘खास आपुलकीचे’ शब्द बहुधा त्यांच्या मित्र आणि सहकाऱ्यांसाठीच राखीव असतात. म्हणूनच जेव्हा ते एखाद्याला ‘माझा खूप चांगला मित्र’ असे संबोधतात, तेव्हा खरे तर त्याने सावध व्हायची वेळ आलेली असते. कारण तेव्हाच ते त्यांच्या शस्त्रांना धार लावत असतात. ते शाळेतील एखाद्या ‘दादा’सारखे आहेत, जो आपल्या टोळीतील लोकांना सतत आठवण करून देतो, की खरा प्रमुख तोच आहे, आणि कोणी त्याच्या मार्गात येता कामा नये. भारत आणि मोदी यावर कसा प्रतिसाद देतात? हे युरोप नाही आणि मोदी स्टार्मर, मर्झ किंवा मॅक्रॉनसारखे नाहीत. आतापर्यंत, त्यांनी ट्रम्प यांच्या उचकवण्याकडे दुर्लक्ष करून परिस्थिती संयमाने हाताळली आहे. भारताला ‘दंडात्मक’ शुल्क लादण्याची धमकी मिळालेली असतानाही भारताने शांतता राखली. मला वाटते, की भाजप जर विरोधी पक्षात असता, तर त्यांनी काँग्रेस सरकारला एवढी मुभा दिली नसती. परंतु विरोधी पक्षात असलेले काँग्रेस बहुतेकदा ट्विट लिहिण्यावर समाधान मानते. ‘राष्ट्राचा अपमान’ या मुद्द्यावर दहा हजार लोकांना एकत्र करून आंदोलन उभे करण्याइतकी मेहनतदेखील ते घेत नाहीत. मात्र विरोधकांचा दबाव वाढत गेला, तर मोदी सरकार किती काळ शांत राहू शकेल?
ट्रम्प यांच्या बाबतीत मौनव्रत पाळणे शहाणपणाचे आहे, पण अगदी किरकोळ परराष्ट्र विषयांवर व्यक्त न झाल्याबद्दल हाच पक्ष पूर्वी मनमोहन सिंग यांना ‘मौनी बाबा’ म्हणत होता. उदाहरणार्थ, देवयानी खोब्रागडे प्रकरणातील कथित अपमान. अमेरिकाविरोधी भावना हा भारतीय जनमताचा ‘डिफॉल्ट पर्याय’ आहे आणि दोन्ही बाजूंसाठी काम करतो. दुसरी शहाणपणाची बाब म्हणजे,नवे मित्र शोधणे. मार्क कार्नी यांना दिलेला सकारात्मक प्रतिसाद हे त्याचे उदाहरण आहे. शेवटी, कॅनडा हा अमेरिकेचा सर्वांत जवळचा मित्र राहिला असूनही, ट्रम्प यांनी त्याला ’51 वे राज्य’ असे संबोधून अपमानित केले आहे. त्यामुळे आता मध्यम ताकदीचे अनेक देश एकमेकांचे सहकार्य शोधू लागले आहेत. मोदींनी नेतान्याहू यांना भेटण्यासाठी इस्राईलला अचानक भेट का दिली, याबाबत कोणीच काही स्पष्टपणे सांगितलेले नाही. विशेषतः त्यांनी तेथे जाणे आत्ता अपेक्षितच नव्हते. इराणबरोबरच्या युद्धाची शक्यता असतानाच हे घडले आहे.
मी फक्त एकच सूज्ञ अंदाज लावू शकतो, की ‘ऑपरेशन सिंदूर’ हा लष्करी पोकळी आणि ती भरून काढण्याची तातडीची गरज याबाबत जागरूक करणारा एक इशारा होता. सलग दोन पीएसएलव्ही प्रक्षेपण अपयशी ठरली, मौल्यवान लष्करी-सक्षम उपग्रह गमावले गेले, स्वतःच्या आयएसआर (इंटेलिजन्स, सर्व्हिलन्स, रिकनिसन्स) संसाधनांचा अभाव, तसेच दुसरा टप्पा सुरू झाल्यास स्टँड-ऑफ शस्त्रे, ड्रोन, सेन्सर्स आणि हवाई संरक्षणाची आवश्यकता प्रकर्षाने जाणवली. हेदेखील स्पष्ट आहे की पश्चिम आशियात भारताने एक बाजू निवडली आहे. आणि ती म्हणजे इस्रायल-यूएई अशी एकत्रित आघाडी. त्यामुळे यूएईचे शासक शेख मोहम्मद बिन झायेद यांची अचानक भेटही याला वेगळा आयाम देते. तिसरी शहाणपणाची गोष्ट म्हणजे व्यापारात चीनला जरा मोकळीक देणे. जागतिक अस्थिरतेच्या या काळात भारत किती आघाड्यांवर संघर्ष करू शकतो? चौथी बाब म्हणजे, सरकारने विरोधी पक्षांशी (काँग्रेस) संबंध सुधारावेत. भारताची एक चांगली परंपरा आहे, ती म्हणजे राष्ट्रीय हितासाठी विरोधी पक्षांना विश्वासात घेणे. पण जेव्हा विरोधी पक्षाला किडा-मुंग्यांसारखे वागवले जाते, आणि त्यांच्या नेत्याला विदूषक म्हटले जाते, तेव्हा हे कसे शक्य होणार?
मला समजते, की आजचे राजकारण कठोर व निर्दयी झाले आहे. परंतु ट्रम्प यांचे अपमान इथेच थांबणार नाहीत. नौदल कवायतीसाठी आलेल्या इराणच्या एका जहाजाला गेल्या आठवड्यात बुडवले. उद्या कदाचित आणखी मोठी घटना घडेल. विरोधी पक्षाचा दबाव वाढेल, तसे सरकारची मोकळीक कमी होत जाईल. धोरणात्मक स्वायत्ततेचा एक मार्ग देशांतर्गत राजकारणातूनही जातो. तो मार्ग बंद झाला, तर पर्यायही कमी होतात. थोडक्यात, आपण स्वतःबद्दल फार मोठ्या अपेक्षा बाळगू लागलो होतो. आपण स्वतःला एक उदयोन्मुख आणि अपरिहार्य जागतिक शक्ती समजू लागलो आणि त्यातच रमलो. ट्रम्प यांनी आपल्यावर ‘पोटोमॅक’ नदीचे थंड पाणी टाकून आपल्याला वास्तव दाखवले.
आता एक दीर्घ श्वास घेऊन, स्वस्तुती थांबवून आपली अर्थव्यवस्था, संरक्षणव्यवस्था मजबूत करणे, सामाजिक ऐक्य टिकवणे, देशांतर्गत राजकारणाचे पुनर्मूल्यांकन करणे आणि द्विपक्षीय राष्ट्रीय एकता पुन्हा निर्माण करण्याची वेळ आली आहे. हे कठीण आहे. पण ट्रम्प यांच्या उर्वरित तीन वर्षांचा सामना करण्यासाठी आपल्याला त्या दुसऱ्या ‘एच’ शब्दाची आवश्यकता आहे, जो आपण या गेल्या अकरा वर्षांत जणू गोठवून ठेवला आहे. तो शब्द म्हणजे ‘ह्युमिलिटी’, अर्थात नम्रता. घरच्या पातळीवर नम्रता स्वीकारली, तरच ट्रम्प यांच्या अपमानाच्या या जागतिक युगाला समर्थपणे तोंड देता येईल.
अनुवाद : तेजसी आगाशे

Recent Comments