scorecardresearch
Friday, 13 February, 2026
घरराजकारण‘संपूर्ण महाराष्ट्र शोकाकुल, यात राजकारण आणू नका’: शरद पवार

‘संपूर्ण महाराष्ट्र शोकाकुल, यात राजकारण आणू नका’: शरद पवार

बुधवारी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातात झालेल्या आकस्मिक मृत्यूनंतर राजकीय  षड्यंत्राच्या सिद्धांतांची चर्चा सुरू असताना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (एनसीपी) संस्थापक शरद पवार यांनी यात राजकारण न आणण्याचे सार्वजनिक आवाहन केले आहे.

मुंबई: बुधवारी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातात झालेल्या आकस्मिक मृत्यूनंतर राजकीय  षड्यंत्राच्या सिद्धांतांची चर्चा सुरू असताना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (एनसीपी) संस्थापक शरद पवार यांनी यात राजकारण न आणण्याचे सार्वजनिक आवाहन केले आहे. पवार यांनी एका व्हिडिओ निवेदनात म्हटले, “मी आज माध्यमांशी बोलणार नव्हतो, पण काही माध्यमांनी असा दृष्टिकोन मांडला आहे, की या घटनेमागे राजकारण असू शकते. पण, यात कोणतेही राजकारण नाही. हा केवळ एक अपघात आहे. या मृत्यूचे दुःख संपूर्ण महाराष्ट्राला, आम्हा सर्वांना झाले आहे. कृपया यात राजकारण आणू नका. मला एवढेच म्हणायचे आहे,” ते म्हणाले.

बुधवारी सकाळी, अजित पवार यांना घेऊन जाणारे ‘लियरजेट 45’ हे व्यावसायिक विमान बारामतीजवळ कोसळले, ज्यात सर्व पाच प्रवाशांचा मृत्यू झाला. शरद पवार बुधवारी दुपारी बारामतीला पोहोचले. त्यांनी अपघातस्थळी भेट दिली आणि त्यानंतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे गेले, जिथे पाचही प्रवाशांचे पार्थिव ठेवण्यात आले होते. बुधवारी संध्याकाळी दिलेल्या निवेदनात पवार पुढे म्हणाले, “अजित पवार यांचा अकाली मृत्यू हा महाराष्ट्रासाठी एक मोठा धक्का आहे. राज्याने आज एक सक्षम आणि निर्णायक नेता गमावला आहे. या नुकसानाची भरपाई होऊ शकत नाही, पण सर्व काही आपल्या हातात नसते.” शरद पवार आणि त्यांचे पुतणे अजित पवार यांचे राजकीय समीकरण गुंतागुंतीचे होते. वयाची ऐंशी ओलांडलेल्या पवारांचा वारसा कोण सांभाळणार, पुतणे अजित की मुलगी सुप्रिया सुळे, या प्रश्नांदरम्यान अजित यांना नेहमीच अविभाजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुखपदी राहायचे होते. जुलै 2023 मध्ये, अजित पवार यांनी आपल्या काकांविरुद्ध उघड बंड केले आणि सर्वाधिक आमदारांना सोबत घेऊन शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडले. त्यांनी भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेसोबत ‘महायुती’मध्ये प्रवेश केला आणि निवडणूक आयोगातील लढाईत आपलीच राष्ट्रवादी काँग्रेस खरी राष्ट्रवादी असल्याचे सिद्ध केले.

यावर्षी, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी भाजपविरुद्ध पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुका एकत्र लढवल्या, ज्यामुळे दोन्ही गटांच्या संभाव्य कायमस्वरूपी एकत्र येण्याच्या चर्चांना सुरुवात झाली होती. बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे, ज्यांनी नेहमीच दोन्ही गटांमधील मतभेद ‘वैयक्तिक नसल्याचे’ म्हटले होते, त्यांनी बुधवारी तात्काळ कोणतेही विधान करणे टाळले. सुळे यांनी केवळ व्हॉट्सॲपवर एक स्टेटस ठेवले, ज्यात ‘डिव्हास्टेटेड’ असे लिहिले होते.

संबंधित लेख

चुकवू नका

Recent Comments