scorecardresearch
Monday, 8 September, 2025
घरराजकारणखासदार अशोक सिद्धार्थ जाहीर माफीनंतर पुन्हा ‘बसप’मध्ये सामील

खासदार अशोक सिद्धार्थ जाहीर माफीनंतर पुन्हा ‘बसप’मध्ये सामील

बहुजन समाज पक्षाच्या (बसपा) प्रमुख मायावती यांनी माजी खासदार आणि त्यांचे पुतणे आकाश आनंद यांचे सासरे अशोक सिद्धार्थ यांना पक्षात पुन्हा सामील केले आहे. त्यांनी जाहीर माफी मागितल्यानंतर काही तासांतच हे घडले.

लखनऊ: बहुजन समाज पक्षाच्या (बसपा) प्रमुख मायावती यांनी माजी खासदार आणि त्यांचे पुतणे आकाश आनंद यांचे सासरे अशोक सिद्धार्थ यांना पक्षात पुन्हा सामील केले आहे. त्यांनी जाहीर माफी मागितल्यानंतर काही तासांतच हे घडले. पुढील महिन्यात लखनऊमध्ये होणाऱ्या बहुजन समाज पक्षाच्या प्रस्तावित रॅलीपूर्वी हे पाऊल उचलण्यात आले आहे. सिद्धार्थ यांना या वर्षी फेब्रुवारीमध्ये गटबाजीला प्रोत्साहन देणे आणि पक्षविरोधी कारवायांमध्ये सहभागी असल्याच्या आरोपावरून बसपामधून काढून टाकण्यात आले होते.

शनिवारी हिंदीमध्ये एक्स वर एका पोस्टमध्ये, उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती म्हणाल्या, की “अशोक सिद्धार्थ यांनी त्यांच्या चुकीसाठी जाहीरपणे माफी मागितली आहे आणि बहुजन समाज आणि बसपा नेतृत्वाला त्यांच्या पूर्ण निष्ठेचे आश्वासन दिले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील स्वाभिमान आणि प्रतिष्ठेची चळवळ पुढे नेण्यासाठी त्यांनी स्वतःला समर्पित करण्याचे वचनदेखील दिले आहे, असेही त्या म्हणाल्या. त्यांच्या पुनर्नियुक्तीची घोषणा करताना मायावती यांनी लिहिले: “त्यांना बसपामधून काढून टाकण्याचा निर्णय तात्काळ रद्द करण्यात येत आहे. अशी अपेक्षा आहे की, इतर सर्व पक्ष कार्यकर्त्यांप्रमाणे, ते पक्ष आणि चळवळ मजबूत करण्यासाठी मनापासून योगदान देतील.”

शनिवारी सिद्धार्थ यांनी ‘एक्स’वर पोस्ट केले होते, की “मी पक्षाच्या शिस्तीचे उल्लंघन करणार नाही किंवा माझ्या कौटुंबिक संबंधांचा गैरवापर करणार नाही असे वचन देतो. मी भविष्यात कधीही अशी चूक पुन्हा करणार नाही.” माजी राज्यसभा खासदार सिद्धार्थ हे एकेकाळी बसपाच्या प्रमुख नेत्यांपैकी एक मानले जात होते, परंतु फेब्रुवारीमध्ये मायावतींनी त्यांना पक्षातून काढून टाकले. पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या मते, त्यांची पुनर्नियुक्ती दर्शवते, की मायावतींनी आकाश आनंद यांच्यावर विश्वास ठेवण्यास सुरुवात केली आहे. सिद्धार्थ यांना पुन्हा पक्षात आणावे अशी आकाश यांची इच्छा होती. फक्त एका आठवड्यापूर्वीच मायावतींनी आकाश यांना बसपाचे मुख्य राष्ट्रीय समन्वयक म्हणून नियुक्त केले, जे पक्षातील दुसरे सर्वात शक्तिशाली पद मानले जाते.

‘द प्रिंट’शी बोलताना बसपाच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले की, “सप्टेंबरमध्ये, बहेनजी यांनी लखनऊमध्ये सर्व प्रमुख नेत्यांची बैठक बोलावली आहे, जिथे त्या अशोक सिद्धार्थ यांच्यावर नवीन जबाबदाऱ्या सोपवतील आणि काही मोठे संघटनात्मक बदलदेखील त्या जाहीर करू शकतात. त्यांनी आधीच कार्यकर्त्यांना संदेश दिला आहे, की आकाश पक्षात दुसऱ्या क्रमांकावर आहेत आणि त्यांची शक्ती आणखी वाढणार आहे.” एप्रिलमध्ये, मायावतींनी आकाश आनंद यांना पुन्हा पक्षात घेतले होते, ज्यांना सिद्धार्थविरुद्धच्या कारवाईनंतर मार्चमध्ये बसपमधून काढून टाकण्यात आले होते. आकाश यांनी सोशल मीडियावर माफी मागितल्यानंतर काही तासांतच त्यांचीही पुनर्नियुक्ती करण्यात आली.

बसपमधील मोठे संघटनात्मक बदल मायावतींच्या लखनऊमधील प्रस्तावित रॅलीला भव्य शो बनवण्याच्या उद्देशाने आहेत. त्या 9 ऑक्टोबर रोजी बसपाचे संस्थापक कांशीराम यांच्या पुण्यतिथीला रॅलीला संबोधित करण्याची शक्यता आहे. जर रॅली झाली, तर 2021 नंतर उत्तर प्रदेशच्या राजधानीत मायावतींचा हा पहिलाच सार्वजनिक मेळावा असेल. सूत्रांनुसार, बसप कार्यकर्त्यांना रॅलीसाठी पक्षाचा प्रतीकात्मक निळा रुमाल घालण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 2027 च्या राज्य निवडणुकीपूर्वी संघटनेला ऊर्जा देण्याचा हा प्रयत्न म्हणून या हालचालीकडे पाहिले जात आहे.

संबंधित लेख

चुकवू नका

Recent Comments