scorecardresearch
Saturday, 14 February, 2026
घरराजकारणभाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे आता नितीन नबीन यांच्याकडे

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे आता नितीन नबीन यांच्याकडे

'जेव्हा पक्षाचा विषय येतो, तेव्हा नितीन नबीन हेच ​​'बॉस' आहेत', असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. 45 वर्षीय नितीन नबीन यांनी जे.पी. नड्डा यांच्याकडून भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली.

नवी दिल्ली: ‘जेव्हा पक्षाचा विषय येतो, तेव्हा नितीन नबीन हेच ​​’बॉस’ आहेत’, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. 45 वर्षीय नितीन नबीन यांनी जे.पी. नड्डा यांच्याकडून भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. भाजप अध्यक्ष म्हणून आपल्या पहिल्याच भाषणात नबीन यांनी पंतप्रधान मोदींच्या सार्वजनिक सेवेचा विक्रम आपल्यासाठी आणि पक्ष कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे म्हटले. “आमच्या सर्वोच्च नेतृत्वाने, ज्यांनी भाजपच्या विस्तारात योगदान दिले आहे, त्यांनी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला पक्षात सर्वोच्च पदावर पोहोचण्याची संधी दिली आहे, आणि यासाठी मी तुम्हा सर्वांसमोर नतमस्तक होतो,” असे ते म्हणाले.

भाजप मुख्यालयात पक्ष नेते आणि कार्यकर्त्यांना संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, ‘भाजप हा असा पक्ष आहे, जिथे मुख्यमंत्री व पंतप्रधान पदापर्यंत काम करूनही व्यक्ती पक्ष कार्यकर्ताच राहतो आणि नितीन नबीन हे त्यांचे ‘बॉस’ आहेत. माजी पक्ष अध्यक्षांच्या कामगिरीची आठवण करून देताना पंतप्रधान आपल्या भाषणात म्हणाले की, “नितीन नबीनजी हे आपल्या सर्वांचे अध्यक्ष आहेत. त्यांची जबाबदारी केवळ भाजपचे व्यवस्थापन करणे नाही, तर एनडीएशी समन्वय साधणे हीदेखील आहे. नबीन, त्यांच्या साधेपणा आणि नम्रतेसाठी ओळखले जातात. नबीन अशा पिढीचे आहेत, ज्यांनी भारतात मोठे बदल पाहिले आहेत. त्यांनी लहानपणी रेडिओवर बातम्या ऐकल्या आणि आज ते एआय वापरण्यात पारंगत आहेत.” “ही एक संस्कृती आहे, एक कुटुंब आहे. येथे केवळ सदस्यत्वापेक्षा नात्यांना अधिक महत्त्व आहे. भाजप एका सु-परिभाषित प्रक्रियेद्वारे कार्य करतो. पद धारण करणे ही एक प्रणाली आहे, परंतु कामाची जबाबदारी ही आयुष्यभराची वचनबद्धता आहे.” असेही पंतप्रधान म्हणाले.

“आमचे अध्यक्ष बदलतात, पण आमची आदर्श तत्त्वे स्थिर राहतात. नेतृत्व बदलते, पण दिशा तीच राहते. भाजपचे स्वरूप राष्ट्रीय आहे, त्याची भावना राष्ट्रीय आहे, कारण आमचे नाते स्थानिक आहे. आमची मुळे जमिनीमध्ये खोलवर रुजलेली आहेत. भाजप हा असा पक्ष आहे, जिथे लोकांना वाटेल की नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आहेत, ते तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले आहेत, ते वयाच्या 50 व्या वर्षी मुख्यमंत्री झाले आणि ते सलग 25 वर्षे सरकारचे प्रमुख राहिले आहेत—हे सर्व खरे आहे. पण माझ्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की मी एक भाजप कार्यकर्ता आहे. आमचे नेतृत्व परंपरेने मार्गदर्शन केलेले, अनुभवाने समृद्ध आहे आणि ते लोकसेवा व राष्ट्रसेवेच्या भावनेने संघटनेला पुढे घेऊन जाते. घुसखोर हे देशासाठी सर्वात मोठा धोका आहेत आणि त्यांना परत पाठवले पाहिजे” असे पंतप्रधान म्हणाले. “या जगात कोणीही आपल्या देशात घुसखोरांना स्वीकारत नाही. भारत घुसखोरांना आपल्या लोकांची आणि गरिबांसाठी असलेल्या सेवांची लूट करण्याची परवानगी कधीही देणार नाही. घुसखोर हे देशासाठी सर्वात मोठा धोका आहेत आणि त्यांना परत पाठवले पाहिजे. घुसखोरांचे संरक्षण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या राजकीय पक्षांना उघड केले पाहिजे,” असे प्रतिपादन त्यांनी केले.

दरम्यान, नबीन यांनी आगामी निवडणुकांसाठी पक्षाच्या प्रचाराची दिशा ठरवताना विरोधी पक्षांवर जोरदार हल्ला चढवला. त्यांनी तामिळनाडूतील अलीकडील घटनांचा संदर्भ दिला, जिथे पवित्र कार्तिक दीपम उत्सव थांबवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. ‘जेव्हा जेव्हा सोमनाथ, रामसेतू किंवा भारताच्या सांस्कृतिक वारशाच्या इतर प्रतीकांचा उल्लेख होतो, तेव्हा विरोधी नेते अस्वस्थ होतात’, असे ते म्हणाले. “जे राम सेतूचे अस्तित्व नाकारतात, त्यांना भारतीय राजकारणात स्थान नसावे; हे सुनिश्चित करण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत,” असे ते म्हणाले. “पुढील काही महिन्यांत तामिळनाडू, आसाम, केरळ, पुद्दुचेरी आणि पश्चिम बंगालमध्ये निवडणुका होणार आहेत. लोकसंख्येच्या रचनेवर (डेमोग्राफी) खूप चर्चा होत आहे. बदललेल्या लोकसंख्येच्या रचनेत गोष्टी कशा बदलल्या जात आहेत आणि ते आमच्यासाठी एक आव्हान आहे. पण आम्हाला पूर्ण विश्वास आहे की भाजप कार्यकर्ते आपल्या कठोर परिश्रम आणि निश्चयाने या पाचही राज्यांमध्ये पक्षाचे यश सुनिश्चित करतील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केले. भाजप आसाममध्ये सत्तेवर आहे आणि पुद्दुचेरीमध्ये ऑल इंडिया एनआर काँग्रेससोबत सत्ताधारी आघाडीचा भाग आहे.

“ही काही एकमेव घटना नाही; विरोधकांनी इतर गोष्टी थांबवण्यासाठीही कट रचला आहे. नुकतेच आपण पाहिले की, एका न्यायाधीशांवर महाभियोग चालवण्याचा प्रयत्न कसा करण्यात आला. आज जेव्हा आपण सोमनाथबद्दल बोलतो आणि या अभिमानाच्या उत्सवाचे आयोजन करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा विरोधी पक्षांमधील लोकांना अस्वस्थ वाटते. अशा परंपरा थांबवण्याचा प्रयत्न करणाऱ्या शक्तींना तोंड देणे आवश्यक आहे, असे आमचे मत आहे. राम सेतूचे अस्तित्व नाकारणाऱ्या आणि कार्तिक दीपम उत्सवाला विरोध करणाऱ्यांना भारतीय राजकारणात स्थान मिळणार नाही, याची आपण खात्री केली पाहिजे”, ते म्हणाले.

राजकारण हा काही शॉर्टकट नाही. राजकारण ही 100 मीटरची शर्यत नसून मॅरेथॉन आहे, जिथे तुमच्या वेगाची नाही, तर तुमच्या सहनशक्तीची परीक्षा घेतली जाते,” असे म्हणत त्यांनी तरुणांना राजकारणात सामील होण्याचे आवाहन केले.

संबंधित लेख

चुकवू नका

Recent Comments