नवी दिल्ली: “राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक (प्रमुख) मोहन भागवत यांचा कार्यकाळ हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 100 वर्षांच्या प्रवासातील सर्वात परिवर्तनकारी काळ मानला जाईल”, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, गुरुवारी केले. संघप्रमुखांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधानांनी लिहिलेल्या एका लेखात त्यांनी म्हटले आहे, की भागवत यांच्या नेतृत्वाखाली अनेक महत्त्वपूर्ण बदल झाले. “गणवेशातील बदलापासून ते शिक्षण वर्गांमध्ये (प्रशिक्षण शिबिरांमध्ये) बदल करण्यापर्यंत, त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक महत्त्वपूर्ण बदल झाले,” पंतप्रधान म्हणतात.
भागवत यांनी 2009 मध्ये सरसंघचालकाची जबाबदारी स्वीकारली आणि ते मोठ्या उत्साहाने काम करत आहेत, असे ते म्हणाले. तथापि, सरसंघचालक असणे ही केवळ संघटनात्मक जबाबदारीपेक्षा जास्त आहे, असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले. करोना महासाथीच्या काळात संघाचे काम सुरू ठेवण्यासाठी आणि समाजाच्या बदलत्या गरजा पूर्ण करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वाढता वापर करण्याचे श्रेयही पंतप्रधानांनी भागवत यांना दिले.मोदींनी भागवत यांचे वर्णन “असाधारण” व्यक्ती म्हणून केले ज्यांनी नेहमीच देशाला प्रथम स्थान दिले आहे आणि त्यांच्या कार्यशैलीत सातत्य आणि अनुकूलता अधोरेखित केली आहे.
पंतप्रधान म्हणाले, की “11 सप्टेंबर हा दिवस दोन परस्परविरोधी आठवणींना उजाळा देतो. त्यापैकी पहिला दिवस 1893 चा आहे, जेव्हा स्वामी विवेकानंदांनी त्यांचे प्रतिष्ठित भाषण शिकागो येथे दिले होते. त्यांनी भारताचा कालातीत आध्यात्मिक वारसा आणि वैश्विक बंधुत्वावर असलेला भर जागतिक स्तरावर आणला. दुसरा म्हणजे 9/11 चा भयानक हल्ला.
“आज अशा व्यक्तिमत्त्वाचा वाढदिवस आहे, ज्यांनी ‘वसुधैव कुटुंबकम’ या तत्त्वाने प्रेरित होऊन सामाजिक परिवर्तन आणि सुसंवाद आणि बंधुत्वाची भावना बळकट करण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले आहे. श्री मोहन भागवतजींचा 75 वा वाढदिवस, योगायोगाने, त्याच वर्षी येतो जेव्हा आरएसएसची शताब्दी आहे. मी त्यांना माझ्या शुभेच्छा देऊ इच्छितो आणि त्यांच्या दीर्घ आणि निरोगी आयुष्यासाठी प्रार्थना करू इच्छितो,” असे पंतप्रधान म्हणाले. सरसंघचालकांनी नेहमीच संघाच्या मूळ विचारसरणीशी तडजोड न करता जटिल प्रवाहांमधून संघाचे नेतृत्व केले आहे आणि सातत्य व अनुकूलन हे दोन गुण त्यांनी अंगी बाणवले आहेत व त्यांच्या कार्यशैलीत आत्मसात केले आहेत, असे मोदी म्हणाले.
“भागवत नेहमीच अधिकाधिक तरुणांना संघ परिवारात सामील करण्यावर लक्ष केंद्रित करतात. ते अनेकदा सार्वजनिक चर्चा आणि लोकांशी संवाद साधताना दिसतात, जे आजच्या गतिमान आणि डिजिटल जगात खूप फायदेशीर ठरले आहे.” असेही मत त्यांनी व्यक्त केले. “मला विशेषतः मोहनजींनी कोविडकाळात केलेल्या प्रयत्नांची आठवण येते, जेव्हा मानवजातीने आयुष्यात एकदाच येणाऱ्या साथीच्या आजाराशी झुंज दिली. त्या काळात, पारंपारिक आरएसएस उपक्रम चालू ठेवणे आव्हानात्मक बनले होते. मोहनजींनी तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्याचा सल्ला दिला. जागतिक आव्हानांच्या संदर्भात, ते संस्थात्मक चौकटी विकसित करताना जागतिक दृष्टिकोनांशी जोडलेले राहिले,” अशी आठवण पंतप्रधानांनी सांगितली.
‘स्वच्छ भारत मिशन’ आणि ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ यासारख्या सरकारने सुरू केलेल्या जनआंदोलनांना जोम देण्यासाठी आरएसएस कुटुंबाला प्रोत्साहित केल्याबद्दल पंतप्रधानांनी भागवत यांचे कौतुक केले. सरसंघचालक असणे ही केवळ संघटनात्मक जबाबदारीपेक्षा जास्त आहे, असे ते म्हणाले. पंतप्रधानांनी असेही नमूद केले, की ‘भागवतांचा आणखी एक प्रशंसनीय गुण म्हणजे त्यांचा मृदुभाषी स्वभाव’. पंतप्रधानांनी भागवतांशी असलेल्या त्यांच्या सहवासाचे स्मरण केले आणि महाराष्ट्राच्या ग्रामीण आणि मागासलेल्या भागात, विशेषतः विदर्भात प्रचारक म्हणून केलेल्या कामाचे कौतुक केले. मोदी म्हणाले की, गेल्या काही वर्षांत भागवत यांनी संघात विविध पदांवर काम केले आणि त्यातील प्रत्येक कर्तव्य त्यांनी अत्यंत कौशल्याने पार पाडले. “मोहनजींच्या कुटुंबाशी माझे नाते खूप खोल आहे. मोहनजींचे वडील दिवंगत मधुकरराव भागवतजी यांच्यासोबत जवळून काम करण्याचे भाग्य मला लाभले आहे. मी त्यांच्याबद्दल माझ्या ‘ज्योतिपुंज’ या पुस्तकात विस्तृतपणे लिहिले आहे. कायदेशीर जगताशी असलेल्या त्यांच्या संबंधाबरोबरच त्यांनी राष्ट्र उभारणीसाठी स्वतःला समर्पित केले. गुजरातमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला बळकटी देण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली,” असे त्यांनी स्पष्ट केले.
यावर्षी विजया दशमी, गांधी जयंती, लाल बहादूर शास्त्री जयंती आणि संघाचे शताब्दी समारंभ एकाच दिवशी येत आहेत हा एक सुखद योगायोग असल्याचे सांगून मोदी म्हणाले की, “2 ऑक्टोबर हा दिवस भारत आणि जगातील संघाशी संबंधित लाखो लोकांसाठी एक ऐतिहासिक टप्पा ठरेल. भागवत हे ‘एक भारत श्रेष्ठ भारत’चे कट्टर समर्थक आणि विविध संस्कृती आणि परंपरा साजरे करणाऱ्या भारताच्या विविधतेवर दृढ विश्वास ठेवणारे होते याबद्दल पंतप्रधानांनी त्यांचे कौतुक केले.
“त्यांच्या व्यग्र वेळापत्रकाच्या पलीकडे, मोहनजी नेहमीच संगीत आणि गायन यासारख्या आवडी जोपासण्यासाठी वेळ काढत असतात. फार कमी लोकांना माहिती आहे की ते विविध भारतीय वाद्यांमध्ये पारंगत आहेत. वाचनाची त्यांची आवड त्यांच्या अनेक भाषणांमध्ये आणि संवादांमध्ये दिसून येते,” असेही पंतप्रधानांनी सांगितले.

Recent Comments