scorecardresearch
Friday, 10 April, 2026
घरराजकारणभाजपकडून मल्लिकार्जुन खर्गे यांच्याविरोधात आसाम पोलिसांकडे तक्रार दाखल

भाजपकडून मल्लिकार्जुन खर्गे यांच्याविरोधात आसाम पोलिसांकडे तक्रार दाखल

आसाममधील एका निवडणूक सभेत कथित द्वेषपूर्ण भाषण केल्याप्रकरणी भारतीय जनता पक्षाने काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. ही तक्रार भाजपचे आसाम प्रदेश प्रवक्ते आणि सोशल मीडिया प्रभारी, रंजीब कुमार शर्मा यांनी गुवाहाटी येथील वशिष्ठ पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.

नवी दिल्ली: आसाममधील एका निवडणूक सभेत कथित द्वेषपूर्ण भाषण केल्याप्रकरणी भारतीय जनता पक्षाने काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. ही तक्रार भाजपचे आसाम प्रदेश प्रवक्ते आणि सोशल मीडिया प्रभारी, रंजीब कुमार शर्मा यांनी गुवाहाटी येथील वशिष्ठ पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. या तक्रारीत, खर्गे यांनी श्रीभूमी जिल्ह्यात केलेल्या भाषणादरम्यान चिथावणीखोर आणि अपमानजनक विधाने केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

त्यानंतर, भाजपने आपण निवडणूक आयोगाकडेही या संदर्भात तक्रार दाखल केल्याचे जाहीर केले. “हे केवळ राजकीय शाब्दिक युद्ध नाही, तर एक सुनियोजित आणि बेपर्वा आवाहन आहे; जे द्वेष भडकवण्यास, सार्वजनिक शांतता भंग करण्यास आणि संभाव्यतः विविध समुदायांमध्ये हिंसाचार घडवून आणण्यास सक्षम आहे,” असे भाजपने आपल्या तक्रारीत नमूद केले आहे. खर्गे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) आणि भाजप यांची तुलना एका विषारी सापाशी केल्याचे वृत्त आहे. “जर एखादा विषारी साप तुमच्या जवळून जात असेल, तर (अशा परिस्थितीत) त्या विषारी सापाला मारण्यासाठी नमाजमध्ये व्यत्यय आणण्याची परवानगी खुद्द कुराणदेखील देते,” असे विधान त्यांनी केले होते.

आसाममध्ये 9 एप्रिल रोजी निवडणुका नियोजित आहेत, तर मतमोजणी 4 मे रोजी होणार आहे. भाजपला सलग तिसऱ्यांदा सत्ता राखण्याची आशा आहे. या निवडणुकीत मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या विरोधात काँग्रेस नेते गौरव गोगोई यांचे आव्हान उभे आहे. “मल्लिकार्जुन खर्गे यांनी आसाममधील श्रीभूमी जिल्ह्यांतर्गत येणाऱ्या निलांबजार येथे एका राजकीय भाषणादरम्यान अपमानजनक विधाने केली आहेत. त्यांनी भाजप आणि आरएसएस यांची विचारसरणी समाजासाठी ‘विषारी’ असल्याचे संबोधले, या संघटनांना ‘विषारी साप’ असे हिणवले आणि भाजपला संपवून टाकण्याचे आवाहन केले. हे विधान भाजपच्या सर्व सदस्यांच्या भावना दुखावणारे आहे,” असे भाजपच्या आसाम प्रदेश प्रवक्त्याने दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. तसेच, खर्गे यांनी विविध गटांमध्ये शत्रुत्व वाढवण्याचा प्रयत्न केल्याचा आणि राज्यात सार्वजनिक शांतता व जातीय सलोखा बिघडवण्याची शक्यता निर्माण केल्याचा आरोपही त्यांच्यावर करण्यात आला आहे.

शर्मा यांनी पोलिसांकडे विनंती केली आहे की, “हे विधान करणाऱ्या व्यक्तीवर, म्हणजेच श्री. खर्गे यांच्यावर, लवकरात लवकर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.” भाजप खासदार रविशंकर प्रसाद यांनीही खर्गे यांच्यावर असा आरोप केला की, त्यांनी ‘मुस्लीम समाजाच्या विकृत धार्मिक भावनांना खतपाणी घालून, अत्यंत उघडपणे आणि निर्लज्जपणे जातीय द्वेषाचा वणवा भडकवण्याचा प्रयत्न केला आहे.’

संघाशी संलग्न असलेल्या ‘विश्व हिंदू परिषदे’चे प्रमुख आलोक कुमार यांनी खर्गे यांच्या कथित विधानांवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. ” हे उघडपणे हिंसाचाराला चिथावणी देणे आणि हिंदू व मुस्लिमांमध्ये शत्रुत्व निर्माण करणे आहे.” असे विहिंप प्रमुखांनी म्हटले आहे.

संबंधित लेख

चुकवू नका

Recent Comments