scorecardresearch
Thursday, 19 February, 2026
घरराजकारणराजस्थान विधानसभेत भाजप आमदाराचे वादग्रस्त विधान

राजस्थान विधानसभेत भाजप आमदाराचे वादग्रस्त विधान

सोमवारी राजस्थान विधानसभेत भाजप आमदार बहादूर सिंह कोळी यांनी केलेल्या विधानामुळे वादाला तोंड फुटले. त्यांनी भजनलाल शर्मा सरकारचा अर्थसंकल्प म्हणजे मुलगा (छोरा) आहे तर त्याधीच्या काँग्रेस सरकारचा अर्थसंकल्प एखाद्या मुलीप्रमाणे (छोरी) होता, अशा अर्थाचे विधान केले.

नवी दिल्ली: सोमवारी राजस्थान विधानसभेत भाजप आमदार बहादूर सिंह कोळी यांनी केलेल्या विधानामुळे वादाला तोंड फुटले. त्यांनी भजनलाल शर्मा सरकारचा अर्थसंकल्प म्हणजे मुलगा (छोरा) आहे तर त्याधीच्या काँग्रेस सरकारचा अर्थसंकल्प एखाद्या मुलीप्रमाणे (छोरी) होता, अशा अर्थाचे विधान केले. ते म्हणाले, की ‘यामुळेच आज काँग्रेस विरोधी पक्षात आहे’. अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान, आमदार कोळी यांनी भाजप सरकारच्या अर्थसंकल्पाचे वर्णन ‘युवावस्थेतील बजेट’ तर मागील काँग्रेस सरकारच्या अर्थसंकल्पाचे वर्णन ‘वृद्धावस्थेतील बजेट’ असे केले. तसेच या दोघांची तुलना अनुक्रमे मुलगा आणि मुलगी यांच्या जन्माशी केली. या टिप्पणीमुळे विधानसभेत काँग्रेस आमदारांनी गदारोळ केला.

अर्थमंत्री दिया कुमारी यांनी 11 फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर केला होता. राज्याच्या अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान बोलताना, भरतपूर जिल्ह्यातील वीर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या कोळी यांनी सांगितले की, ‘माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या कार्यकाळातील काँग्रेसच्या अर्थसंकल्पाच्या तुलनेत भाजपचे बजेट तरुण आणि उत्पादक होते’. “आमच्या सरकारमध्ये माननीय मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी पहिल्या अर्थसंकल्पात मुलगा जन्माला घातला, नंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या अर्थसंकल्पातही पुन्हा मुलगा जन्माला घातला. जो तरुणपणी मुलगा जन्माला घालतो, तो नेहमीच उपयुक्त ठरतो. आणि अशोक गेहलोत मुख्यमंत्री असताना त्यांनी त्यांच्या शेवटच्या अर्थसंकल्पात घोषणा केल्या होत्या, म्हणूनच मुलगा झाला नाही; मुलगी झाली. आणि म्हणूनच तुम्ही आज विरोधी पक्षात बसला आहात,” असे कोळी म्हणाले.

“आमचा अर्थसंकल्प हा केवळ अर्थसंकल्प नाही, तर मोठ्या उद्दिष्टांची घोषणा आहे. नवीन राजस्थानसाठीची स्वप्ने त्यात आहेत. विरोधी पक्ष कोणतेही प्रश्न उपस्थित करत असला, तरी ते लोकांसाठी उपयुक्त बजेट आहे,” असे ते म्हणाले. विधानसभेतील त्यांच्या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. काँग्रेसने कोळी यांच्यावर, तसेच भाजपवर जोरदार टीका केली आणि ‘कोळी यांनी तात्काळ माफी मागावी’ अशी मागणी केली.

“कल्पना करा, की एखादा निवडून आलेला आमदार विधानसभेत अशा गोष्टी बोलत आहे. ही गोष्ट त्यांचे संकुचित मन आणि त्यांची विचारप्रक्रिया दर्शवते. फक्त काँग्रेसवर टीका करण्यासाठी त्यांनी सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. हे वक्तव्य लिंगाबद्दलची त्यांची पक्षपाती मानसिकता दर्शवते. त्यांनी माफी मागावी,” असे राजस्थान काँग्रेसचे प्रवक्ते स्वर्णिम चतुर्वेदी म्हणाले.

संबंधित लेख

चुकवू नका

Recent Comments