नवी दिल्ली: भारतीय जनता पक्षाच्या निलंबित राष्ट्रीय प्रवक्त्या नुपूर शर्मा पुन्हा एकदा सार्वजनिक जीवनात सक्रिय झाल्या आहेत. त्या चर्चासत्रांना हजेरी लावत आहेत, निषेध आणि धार्मिक कार्यक्रमांमध्ये भाग घेत आहेत आणि सोशल मीडियावरही सक्रिय झाल्या आहेत. परंतु, त्यांच्या निलंबनाला दोन वर्षांहून अधिक काळ उलटूनही त्यांची प्रकरणे पक्षाच्या शिस्तपालन समितीसमोर प्रलंबित आहेत.
शर्मा यांना जून 2022 मध्ये प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल अपमानास्पद टिप्पण्या केल्याबद्दल भाजपमधून निलंबित करण्यात आले होते, त्या वर्षी मे महिन्यात टीव्हीवरील चर्चेदरम्यान, पक्षातील त्यांचे वाढते ‘स्टारडम’ कमी करण्यात आले होते. त्या वेळी, भाजपने एका निवेदनात म्हटले होते की, “पक्ष कोणत्याही धार्मिक व्यक्तिमत्त्वाच्या अपमानाचा तीव्र निषेध करतो, आणि अशा लोकांना किंवा तत्त्वज्ञानाला प्रोत्साहन देत नाही”. शर्मा यांनी नंतर एक्सवरील (पूर्वीचे ट्विटर) पोस्टमध्ये त्यांची टिप्पणी मागे घेतली. त्यांचे निलंबन झाल्यापासून, त्यांनी केवळ काही निवडक ठिकाणीच सार्वजनिक हजेरी लावली, उदाहरणार्थ, या वर्षी जानेवारीत अयोध्येतील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठेपूर्वी काढलेल्या मिरवणुकीत त्या सहभागी झाल्या.
शर्मा यांना चौकशी पूर्ण होईपर्यंत पक्षातून निलंबित करण्यात आले होते, तर दिल्ली भाजपचे माजी माध्यमप्रमुख नवीन कुमार जिंदाल, ज्यांनी सोशल मीडियावर अल्पसंख्याक समुदायाविरुद्ध वादग्रस्त वक्तव्य केले होते, त्यांना त्या वेळी पक्षातून काढून टाकण्यात आले.
शर्मा यांच्यावरील अहवालाच्या स्थितीबद्दल विचारले असता, भाजपच्या केंद्रीय शिस्तपालन समितीचे सदस्य सचिव ओम पाठक यांनी द प्रिंटला सांगितले की, “हे प्रकरण अद्याप विचाराधीन आहे.”
आपण अद्याप संबंधितांच्या संपर्कात असल्याचेही त्यांनी सांगितले. “या मुद्द्यांवर निर्णय घ्यायला वेळ लागतो. त्यावर शिस्तपालन समिती अजूनही विचार करत आहे.’ असे ते म्हणाले.
‘स्टेजवर परत’
शर्मांची X वरील शेवटची पोस्ट 5 जून 2022 ची होती. त्यावेळी त्यांनी त्यांची “बिनशर्त” टिप्पणी मागे घेतली आणि दावा केला की ‘कोणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा’ त्यांचा हेतू नव्हता. मात्र, त्यांनी या वर्षी जूनमध्ये ब्रेक घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लोकसभा विजयाबद्दल अभिनंदन करत पहिली पोस्ट केली होती.
तेव्हापासून, त्यांनी रियासी दहशतवादी हल्ल्याबद्दल शोक व्यक्त करणारी पोस्ट शेअर करण्यापासून ते अमरनाथ यात्रेच्या आढावा बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे विधान पुन्हा शेअर करण्यापर्यंत अनेक पोस्ट्स केल्या आहेत. त्यांच्या टाइमलाइनवरून दिसून येते, की त्या सतत मोदी आणि शहा यांच्या पोस्टस नियमित शेअर करतात.
गेल्या महिनाभरात, त्यांनी मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि हरियाणा निवडणुकीत भाजपच्या नेत्रदीपक विजयाबद्दल त्यांचे जिलेबी खातानाचे छायाचित्र पोस्ट करून पक्षाचे अभिनंदन केले.
त्यांनी सार्वजनिक जीवनही सुरू केले आहे. 30 जून रोजी, त्यांनी हरियाणातील सोनीपत येथील राष्ट्रम स्कूल ऑफ पब्लिक लीडरशिप प्रोग्राममध्ये एका मेळाव्याला संबोधित केले, व भारतीय सार्वजनिक धोरणे आणि त्यांच्या प्रभावी अंमलबजावणीबद्दल त्या बोलल्या.
जुलैमध्ये, शर्मा यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर संसदेत त्यांच्या “हिंसक हिंदू” टिप्पण्यांबद्दल टीका केली होती ज्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता.
गांधींचे नाव न घेता त्या म्हणाल्या की, ‘लोकांनी हिंदूंवर टीका करण्याआधी हे समजून घेतले पाहिजे की हिंदूंना देशातून नष्ट करण्याचा डाव आहे’. गाझियाबादमधील एका कार्यक्रमात त्या म्हणाल्या, “जेव्हा उच्च पदांवर असलेले लोक हिंदू हिंसक असल्याचा दावा करतात किंवा जेव्हा इतर म्हणतात की ‘सनातनी’ नष्ट व्हायला हवे, तेव्हा हे षड्यंत्र समजून घेतले पाहिजे.
त्यानंतर १५ ऑगस्टला त्यांनी ‘तिरंगा यात्रे’ला हिरवा झेंडा दाखवला.
शेख हसीनांच्या सरकारच्या हकालपट्टीनंतर बांगलादेशात हिंदूंवर झालेल्या कथित अत्याचाराविरोधात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) समर्थित संघटना नारी शक्ती मंचच्या बॅनरखाली आयोजित केलेल्या निषेधात शर्मा यांनी भाग घेतला. या आंदोलनात भाजप खासदार बन्सुरी स्वराज आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे (जेएनयू) कुलगुरू संतश्री डी. पंडित यांचाही सहभाग होता.
आणि या महिन्याच्या सुरुवातीला, त्यांनी दिल्लीचे माजी महापौर जय प्रकाश आणि भाजपचे ज्येष्ठ नेते आणि आसामचे माजी राज्यपाल जगदीश मुखी यांच्यासोबत स्टेज शेअर करत रामलीला कार्यक्रमाला हजेरी लावली.
‘नुपूर शर्मा ‘चांगल्या उमेदवार असू शकतात ‘
पक्षाच्या सूत्रांच्या म्हणण्यानुसार, भाजपच्या माजी राष्ट्रीय प्रवक्त्यांचे नाव उत्तर प्रदेशातील हाय-प्रोफाइल रायबरेली मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या तिकीटासाठी विचाराधीन होते.
पण पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी नाव न छापण्याची विनंती करत द प्रिंटला सांगितले की, शर्मा यांच्याबाबत कोणताही निर्णय सर्वोच्च पातळीवर घेतला जाईल. “हे काही राज्यपातळीवर ठरवले जाऊ शकत नाही. ते वरच्या स्तरावरून यावे लागेल. त्यांना त्यांच्या विधानांबद्दल पश्चात्ताप झाला होता आणि निलंबित करण्यात आले असले तरी त्या अजूनही भाजपचा भाग आहेत,” असे भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले.
भाजपचे नेतृत्व या मुद्द्यावर मौन बाळगून आहे, तर पक्षाने शर्मा यांना दुसरी संधी द्यावी आणि त्यांचे निलंबन मागे घ्यावे, असे अनेक कार्यकर्त्यांचे मत आहे.
“हरियाणा निवडणुकीचा निकाल या वस्तुस्थितीची साक्ष देतो की हिंदू ऐक्यच आपल्याला वेगळे करते. असे भाजपच्या दुसऱ्या ज्येष्ठ नेत्याने सांगितले. कंगनानेही हरियाणा विधानसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांच्या आंदोलनावर केलेल्या टिप्पणीने संताप आणि वादाला निमंत्रण दिले, ज्यामुळे पक्ष तिच्यापासून दूर गेला.
एका तृतीयपंथी कार्यकर्त्याने सांगितले की दोन वर्षे खूप मोठा कालावधी आहे आणि शर्मा यांनी “हिंदू कारणा” बद्दल आवाज उठवल्यामुळे त्यांना पुन्हा कामावर घेतले पाहिजे.
त्यात भर टाकून, दिल्ली भाजपच्या एका नेत्याने नाव न सांगण्याची इच्छा व्यक्त केली की शर्मा यांचे विधान माफ केले जाऊ शकत नाही, परंतु तरीही त्यांना झालेली शिक्षा खूप कठोर होती. “अरविंद केजरीवाल आणि शीला दीक्षित यांच्या विरोधात निवडणूक लढवणारा ‘स्टार नेता’ असल्याने त्यांना त्यांच्यावर हल्ला होण्याच्या भीतीने दबून राहावे लागले. त्यांना पुरेसा त्रास सहन करावा लागला आहे आणि दिल्लीच्या निवडणुका अगदी जवळ आल्याने त्या चांगल्या उमेदवार होऊ शकतात.”
सुरुवातीला दिल्ली भाजपच्या मीडिया टीमचा भाग असलेल्या शर्मा 2020 मध्ये पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या बनल्या. त्याआधी 2015 मध्ये त्यांनी आम आदमी पार्टी (आप) चे अरविंद केजरीवाल यांच्याविरुद्ध नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून अयशस्वी निवडणूक लढवली होती. 25,000 पेक्षा जास्त मतांनी, पण केजरीवाल यांच्याकडून 31,000 मतांच्या फरकाने त्या पराभूत झाल्या.
शर्मा या दिल्लीच्या आहेत व त्यांनी दिल्ली विद्यापीठाच्या हिंदू कॉलेजमध्ये अर्थशास्त्र आणि विद्यापीठाच्या विधी विद्याशाखेत कायद्याचा अभ्यास केला. यूकेमधील लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये पुढील शिक्षणही घेतले. त्यांचे आजोबा मदन गोपाल महर्षी डेहराडूनमध्ये जिल्हा दंडाधिकारी होते, तर वडील विनय शर्मा दिल्लीस्थित व्यापारी आहेत.
Recent Comments