नवी दिल्ली: भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) तीन भागांच्या जाहीरनाम्याच्या दुसऱ्या टप्प्यात आम आदमी पक्षाच्या (आप) मतपेढीच्या मोठ्या भागावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. यामध्ये दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रीय राजधानीतील ऑटो रिक्षा चालक, टॅक्सी चालक आणि घरकाम करणाऱ्यांसाठी अनेक योजनांवर प्रकाश टाकण्यात आला आहे.
जाहीरनाम्याच्या दुसऱ्या भागात, भाजपने सरकारी संस्थांमध्ये गरजू विद्यार्थ्यांना “केजी ते पीजी पर्यंत” म्हणजे बालवाडी ते पदव्युत्तर शिक्षण मोफत आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना 15 हजार रुपयांची एक वेळची आर्थिक मदत देण्याचे आश्वासन दिले आहे.
“अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना डॉ. बी.आर.आंबेडकर स्टायपेंड योजनेअंतर्गत मासिक 1 हजार रुपये स्टायपेंड मिळेल,” असे भाजप खासदार अनुराग ठाकूर यांनी पक्षाच्या ‘संकल्प पत्रा’चे अनावरण करताना सांगितले. पंतप्रधान स्वानिधी योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या दुप्पट केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. 1998 पासून भाजप दिल्लीत सत्तेबाहेर आहे आणि या निवडणुकीकडे पुन्हा सत्तेत येण्याची संधी म्हणून पाहत आहे. पक्षाने अद्याप मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार अजून जाहीर केलेला नाही आणि तो नरेंद्र मोदी या ब्रँडवर अवलंबून आहे. तथापि, यावेळी मोफत गोष्टींची आश्वासने भरपूर आहेत. भाजप प्रामुख्याने ऑटो रिक्षा चालकांना आकर्षित करत आहे – ज्यांना ‘आप’साठी एक प्रमुख मतपेढी म्हणून पाहिले जाते.
पक्षाने त्यांच्यासाठी आणि शहरातील टॅक्सी चालकांसाठी देखील एक कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याचे आश्वासन दिले आहे. यामध्ये 10 लाख रुपयांचा जीवनविमा, 5 लाख रुपयांचा वाहन विमा आणि त्यांच्या मुलांसाठी शिष्यवृत्ती दिली जाईल. अनुराग ठाकूर म्हणाले की, आर्थिक मदतीव्यतिरिक्त, पक्ष सर्व गरजू मुलांच्या प्रवेश परीक्षेसाठी दोन वेळा प्रवास आणि अर्ज शुल्काची परतफेड देखील करेल. असंघटित क्षेत्रातील घरगुती कामगारांसाठी, पक्षाने आणखी एक कल्याणकारी मंडळ आणि 10 लाख रुपयांचा जीवन विमा, 5 लाख रुपयांचा अपघात विमा आणि त्यांच्या मुलांसाठी शिष्यवृत्तीची घोषणा केली. त्यांना 6 महिन्यांची पगारी प्रसूती रजा देखील मिळेल.
गेल्या शुक्रवारी पक्षप्रमुख जे.पी. नड्डा यांनी सादर केलेल्या जाहीरनाम्याच्या पहिल्या भागात, भाजपने महिलांना दरमहा 2 हजार 500 रुपये आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लोकांना 500 रुपयांना एलपीजी सिलिंडर देण्याचे आश्वासन दिले होते. ‘आप’ने महिलांना थेट रोख हस्तांतरणात 2 हजार 100 रुपये देण्याची घोषणा केली आहे.
मंगळवारी, ठाकूर म्हणाले की, ‘आप’ सरकारच्या गैरकारभार आणि भ्रष्टाचाराविरुद्ध पावले उचलण्यासाठी पक्ष एक विशेष तपास पथक स्थापन करेल.
Recent Comments