मुंबई: रविवारी मुंबईत झालेल्या एका सभेत जेव्हा ठाकरे बंधू एकत्र आले, तेव्हा एक प्रमुख मित्र पक्ष या कार्यक्रमात स्पष्टपणे अनुपस्थित होता- तो म्हणजे काँग्रेस. तेव्हा विचारण्यात आलेला प्रश्न असा होता, की आमंत्रण असूनही काँग्रेसने कार्यक्रमात येण्याचे का टाळले? महाराष्ट्र काँग्रेसमधील वरिष्ठ नेत्यांच्या मते, पक्ष सावधगिरीने पावले उचलत आहे. बिहार निवडणुका जवळ येत असल्याने आणि राज ठाकरे यांच्या स्थलांतरविरोधी भूमिकेमुळे, काँग्रेसला हिंदी पार्श्वभूमीच्या मतदारांना वेगळे करण्याचा धोका पत्करायचा नव्हता. “आम्ही एक राष्ट्रीय पक्ष आहोत. बिहार विधानसभा निवडणुका जवळ आल्या असल्याने, आमच्या पक्षाच्या हाय कमांडला आम्ही कोणताही धोका पत्करायचा नव्हता,” असे राज्यातील एका वरिष्ठ पक्षनेत्याने ‘द प्रिंट’ला सांगितले.
काही पक्ष नेते औपचारिक आमंत्रण न मिळाल्याने नाराज असल्याने ते दूर राहिले. तथापि, शिवसेना (उबाठा) खासदार संजय राऊत यांनी ‘द प्रिंट’ला सांगितले, की त्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. “आम्ही काँग्रेसला निमंत्रण दिले होते. मी स्वतः नेत्यांशी बोललो होतो. पण त्यांचे काही नेते दिल्लीत येणार होते, म्हणून त्यांनी सांगितले की ते येऊ शकत नाहीत. तसेच, काँग्रेसचे असे अनेक कार्यक्रम आहेत ज्यात आम्ही सहभागी होत नाही. त्यामुळे ही फार मोठी गोष्ट नाही,” राऊत म्हणाले. “आमची युती अबाधित आहे. महाविकास आघाडीला कोणताही धोका नाही. आम्ही लोकसभा आणि विधानसभेत एकत्र आहोत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची स्वतःची समीकरणे आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीबद्दल काळजी करण्याची गरज नाही.” असेही ते म्हणाले. काँग्रेस पक्षही ‘वेट अँड वॉच’ मोडमध्ये आहे. “आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी निर्णय घेण्याचे काम आमच्या स्थानिक घटकांना दिले आहे. शिवाय, आम्हाला हे पहायचे आहे की ठाकरे राजकीयदृष्ट्या पुन्हा एकत्र येत आहेत की फक्त एकाच विषयासाठी ते एकत्र आले आहेत?” ज्येष्ठ काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी ‘द प्रिंट’ला सांगितले. “याशिवाय, बीएमसी निवडणुका अद्याप जाहीर झालेल्या नाहीत. आम्ही तिथे पोहोचल्यावर युतीचे काय करायचे ते पाहू. अजूनही वेळ आहे,” असे ते पुढे म्हणाले. महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस (सपा) खासदार आणि शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जितेंद्र आव्हाड यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली.
“पवार साहेबांनी आधीच कार्यक्रम नियोजित केले होते आणि त्यामुळे ते उपस्थित राहिले नाहीत. पण त्यांनी त्यांचे प्रतिनिधी सुप्रिया ताई आणि जितेंद्र आव्हाड यांना पाठवले होते. शिवाय, पवार साहेबांनी हिंदी लादण्याबाबतची त्यांची भूमिका आधीच स्पष्ट केली होती. त्यामुळे त्यांनी रॅलीला पाठिंबा न देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही,” असे राष्ट्रवादी काँग्रेस (सपा) नेत्याने सांगितले.
काँग्रेसची कोंडी
राष्ट्रीय पक्ष असल्याने, काँग्रेस कोंडीत अडकली होती. मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) ‘मराठी माणूस’ हा मुद्दा काम करू शकतो असे त्यांना वाटत असले तरी, त्यांना हेदेखील माहीत होते, की हा मुद्दा बाहेरील मतदारांना आवडणार नाही. शिवाय, उद्धव ठाकरेंना विरोध करू इच्छित नसले तरी, राज ठाकरेंच्या स्थलांतरविरोधी आणि मुस्लिमविरोधी भूमिकेमुळे काँग्रेस सावध झाली. राज ठाकरे हे मशिदींबाहेरील लाऊडस्पीकरबद्दल आवाज उठवत आहेत आणि ते हटवण्याची मागणी करत आहेत. मराठी न जाणणाऱ्या गरीब स्थलांतरितांना आणि कामगारांना मनसे कार्यकर्त्यांनी अनेकदा मारहाण केली आहे. “आम्ही संपूर्ण भारतभर पसरलेला असा पक्ष आहोत. उद्धव ठाकरे सध्या मुंबई आणि बीएमसी निवडणुकांकडे पाहत असताना, आपल्याला हिंदीच्या पलीकडे जाऊन हिंदी प्रदेशाचा विचार करावा लागेल. राज ठाकरे यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून उभे असल्याचे आपल्याला पाहता येणार नाही, जे त्यांच्या हिंदीविरोधी भूमिकेसाठी तसेच मुस्लिमविरोधी भूमिकेसाठी ओळखले जातात,” असे आणखी एक काँग्रेस नेता म्हणाला. अनेक काँग्रेस नेत्यांना वाटते, की जर उद्धव महानगरपालिका निवडणुकीत राज यांच्यासोबत एकत्र आले तर त्यांनी वेगळे लढावे. “मुंबईत आमचा पाया आहे. जर आम्ही शिवसेना उबाठाशी युती केली, तर आमची व्होट बँक म्हणजे अल्पसंख्यांक मतदार यांचा फायदा उबाठाला होईल, परंतु त्यांची हिंदुत्व व्होट बँक आमच्याकडे येत नाही,” असे नेते म्हणाले. अलिकडच्या काळात बीएमसी निवडणुकीत काँग्रेसचे स्थान घसरत चालले आहे, 2007 मध्ये 76 जागांवरून 2017 मध्ये 227 जागांपैकी काँग्रेसची संख्या फक्त 31 वर आली आहे. त्याआधी 2012 मध्ये त्यांच्या जागा 52 वर आल्या होत्या.
“तथापि, वरच्या पातळीवरून याबाबत फारसा स्पष्ट संदेश नव्हता. आमच्या मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा ताईंनी ट्विटद्वारे दोन्ही ठाकरेंचे जाहीर अभिनंदन केले. पण त्यानंतर आमचे कोणतेही नेते उपस्थित राहिले नाहीत. हे गोंधळात टाकणारे होते,” असे या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या काँग्रेसच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले.
Recent Comments