scorecardresearch
Wednesday, 24 December, 2025
घरराजकारणमुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मित्रपक्षांची रस्सीखेच, शरद पवार पेचात

मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मित्रपक्षांची रस्सीखेच, शरद पवार पेचात

2019 मध्ये, शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि काँग्रेस या दोन कट्टर प्रतिस्पर्ध्यांना एकत्र आणून एक अशक्य भासणारी युती शक्य केली. सहा वर्षांनंतर, महाविकास आघाडीचे शिल्पकार पवार हे मित्रपक्षांच्या चढाओढीमध्ये अडकले आहेत.

मुंबई: 2019 मध्ये, शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि काँग्रेस या दोन कट्टर प्रतिस्पर्ध्यांना एकत्र आणून एक अशक्य भासणारी युती शक्य केली. सहा वर्षांनंतर, महाविकास आघाडीचे शिल्पकार पवार हे मित्रपक्षांच्या चढाओढीमध्ये अडकले आहेत. काँग्रेस एकटे लढू इच्छित असताना, ठाकरे राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) सोबत युती करण्याचा विचार करत आहेत. आणि दोन्ही पक्षांना पुढील वर्षी होणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) निवडणुकीत पवारांनी त्यांच्या पाठीशी आपले वजन टाकावे अशी अपेक्षा आहे.

मुंबईत, पवारांकडे खरोखर युतीशिवाय पर्याय नाही. कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची (शरदचंद्र पवार) मुंबईत मर्यादित व्याप्ती आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार 2017 मध्ये अविभाजित शिवसेनेला 28 टक्के, भारतीय जनता पक्षाला (भाजप) 27 टक्के आणि काँग्रेसला 16 टक्के मते मिळाली. अविभाजित राष्ट्रवादीला फक्त 5 टक्के मते मिळाली, जी मनसेच्या 8 टक्के मतांपेक्षा कमीच होती. मुंबईत राष्ट्रवादीचा एकमेव आधार नवाब मलिक यांच्यासारख्या नेत्यांमुळे होता. अन्यथा, बीएमसी निवडणुकीत पक्ष नेहमीच दुर्लक्षित राहिला आहे. पण आता पक्षात फूट पडली आहे आणि नवाब मलिक आणि त्यांचे भाऊ, माजी नगरसेवक कप्तान मलिक, ज्यांनी अनुशक्ती नगर आणि कुर्लासारख्या मुंबईतील काही भागांवर नियंत्रण ठेवले होते, ते आता पवारांसोबत नाहीत. राष्ट्रवादीच्या (शप) सूत्रांनी सांगितल्यानुसार, पवारांचा असा विश्वास आहे, की भाजपला पराभूत करण्यासाठी सर्व समान विचारसरणीच्या लोकांनी पुढे यावे आणि जर मनसे सहमत असेल तर राज यांच्या पक्षाला सामील करून घेण्यात काहीच गैर नाही.

“पवार साहेबांचे विचार अगदी स्पष्ट आहेत. त्यांना एमव्हीए/इंडिया गट एकत्र राहावा असे वाटते आणि मनसे सध्या शिवसेना उबाठाशी जुळवून घेत आहे. त्यामुळे ही समस्या नसावी. शेवटी, ते एमव्हीएचे शिल्पकार होते. ते योग्य निर्णय घेतील,” असे राष्ट्रवादी (शप) च्या एका नेत्याने ‘द प्रिंट’ला सांगितले.

एक मोठा प्रयोग

पवारांचा विरोधी आघाडी एकत्र करण्याचा भव्य प्रयोग होता, जो त्यांनी 2019 आणि 2024 मध्ये केंद्रातही करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्याला फारसे यश मिळाले नाही. भारतीय राष्ट्रीय विकासात्मक समावेशक आघाडी (इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लूसिव्ह अलायन्स) गट राष्ट्रीय स्तरावर कमकुवत दिसत आहे, कारण तो एकामागून एक राज्य निवडणुका गमावत आहे. तथापि, आघाडी महाराष्ट्रात यशस्वी झाली, या आघाडीने करोना महासाथीच्या वर्षांसह अडीच वर्षे सत्ता उपभोगली, परंतु शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे ती फुटली. 2023 मध्ये झालेल्या विभाजनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात संख्येच्या बाबतीत त्यांचा पक्ष अधिकच दुर्लक्षित होत चालला आहे, अशा वेळी पवारांना शक्य तितके यश मिळवायचे आहे. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत पवारांच्या पक्षाला 288 पैकी फक्त 10 जागा मिळाल्या.

राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसचा जुना मित्रपक्ष असला तरी, पवारांनीच उद्धव ठाकरेंना जोरदार पाठिंबा दिला होता. 2017 मध्ये, जेव्हा उद्धव युतीचा प्रस्ताव घेऊन पवारांना भेटले तेव्हा त्यांनी सेना नेते आणि त्यांच्या पक्षाला “समविचारी” असेही म्हटले. “उद्धव, संजय राऊत यांच्यासह, 10 दिवसांपूर्वी माझ्या मुंबईतील निवासस्थानी मला भेटले. आम्ही देशातील सर्व समविचारी पक्षांच्या युतीची गरज यावरही चर्चा केली”, असे कर्जतमधील दोन दिवसांच्या राष्ट्रवादीच्या कार्यशाळेनंतर पवार म्हणाले. महाविकास आघाडीतही, उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री बनवणे पवारांच्या आग्रहावरूनच होते. त्यामुळे त्यांच्यासाठी हा निर्णय आणखी गुंतागुंतीचा होतो. सोशल मीडियावर व्यक्त होताना शिवसेना (उबाठा) खासदार संजय राऊत म्हणाले, “मनसेला सोबत घेण्यासाठी काँग्रेसला हायकमांडची परवानगी घ्यावी लागू शकते. पण आमच्या बाबतीत तसे नाही. शिवसेना आणि मनसे एकत्र आहेत आणि ही जनतेची इच्छा आहे. आणि शरद पवार आणि डावे पक्षही आमच्यासोबत आहेत.” गेल्या आठवड्यात, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसच्या शिष्टमंडळाने मुंबईत पवार यांची भेट घेऊन हातमिळवणी करण्याचा प्रस्ताव मांडला. चर्चा पुढे नेण्यासाठी पवार पक्षाच्या मुंबई युनिटसोबत बैठक घेण्याची अपेक्षा आहे. “विभाजनकारी राजकारण करणाऱ्या सांप्रदायिक शक्तींना दूर ठेवणे हे आमचे प्राथमिक ध्येय आहे. यामुळे देशाचे किंवा शहराचे काहीही भले होणार नाही. परंतु अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. आम्ही अजूनही आमच्या ‘कार्यकर्त्यां’शी (कामगारांशी) बोलण्याच्या प्रक्रियेत आहोत,” असे राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ‘द प्रिंट’ला सांगितले.

पवारांसमोरचा पेच  

1999 मध्ये काँग्रेसपासून फुटल्यापासून, जेव्हा पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली, तेव्हापासून ते नेहमीच काँग्रेसशी युती करत आले आहेत. काँग्रेसलाही वाटते, की राष्ट्रवादी हा त्यांचा नैसर्गिक मित्र आहे. 2014 च्या महाराष्ट्र निवडणुका वगळता, त्यांनी सर्व लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र लढवल्या आहेत. 2024 च्या विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर, काँग्रेसमधील एका गटाला वाटते, की शिवसेनेशी युती करण्याचा काही फायदा नाही. मुंबई काँग्रेससाठी, मनसेने सहभाग घेतला नाही, तरी उद्धव यांच्यासोबत जाण्याचा त्यांना काही फायदा होणार नाही. काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे, की अल्पसंख्याकांमध्ये उद्धव यांची लोकप्रियता वाढत आहे, ज्यामुळे मुस्लिम त्यांच्या पक्षाला मतदान करण्यास प्रवृत्त होत आहेत, ज्यामुळे मतपेढी शिवसेनेकडे वळत आहे. पवार महाविकास आघाडीला एकत्र ठेवण्यासाठी शक्य तितके प्रयत्न करतील, परंतु यावेळी त्यांच्या घटक पक्षांच्या सक्तीमुळे ते अवघड दिसते.

राष्ट्रवादी काँग्रेस (शप) च्या सूत्रांनी ‘द प्रिंट’ला सांगितले की, पवारांना वाटते की जर मनसे ‘सत्याचा मोर्चा’ (1 नोव्हेंबर रोजी मुंबईत होणाऱ्या निवडणूक आयोगाविरुद्धच्या रॅली) मध्ये सहभागी होऊ शकले तर त्यांना सहभागी करून घेण्यात काही गैर नाही. “शरद पवार साहेबांसाठी ही निश्चितच कठीण परिस्थिती असेल, पण ते साहेब आहेत. त्यांच्या मनात काय चालले आहे याचा अंदाज कोणीही घेऊ शकत नाही आणि ते योग्य वेळी योग्य निर्णय घेतील,” असे वर उल्लेख केलेल्या नेत्याने सांगितले. शनिवारी राष्ट्रवादी (शप) नेत्यांनी एक बैठक घेतली, आणि बैठकीनंतर आव्हाड यांनी पत्रकारांना सांगितले की सर्व नैसर्गिक मित्रपक्ष एकत्र राहणे महत्वाचे आहे. “कार्यकर्ते आणि नेत्यांनी असे सांगितले आहे, की ही निवडणूक महाविकास आघाडी म्हणून आणि भाजपविरुद्ध आमच्या इतर सर्व मित्रपक्षांसह लढली पाहिजे. ‘दिल्लीपासून गल्लीपर्यंत’ आमची भूमिका एकच आहे, म्हणजेच जातीय शक्तींना पराभूत करणे. यासाठी कार्यकर्त्यांना वाटते की निवडणूक एकजुटीने लढली पाहिजे. आम्ही ते पवार साहेबांना कळवले आहे,” असे ते म्हणाले.

संबंधित लेख

चुकवू नका

Recent Comments