scorecardresearch
Monday, 8 September, 2025
घरराजकारणयूपीएससीचे शिक्षणतज्ज्ञ अवध ओझा यांचा 'आप'मध्ये प्रवेश

यूपीएससीचे शिक्षणतज्ज्ञ अवध ओझा यांचा ‘आप’मध्ये प्रवेश

‘आप’ नेतृत्व अवध ओझा यांच्यावर विश्वास ठेवणार असून, त्यांना दिल्लीच्या पटपरगंज मतदारसंघातून उमेदवारी दिली जाऊ शकते, अशी माहिती मिळाली आहे.

नवी दिल्ली: अवध ओझा यांना ‘ओझा सर’ म्हणूनही ओळखले जाते. त्यांनी सोमवारी राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल आणि दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या उपस्थितीत आम आदमी पार्टी (आप) मध्ये प्रवेश केला.

आघाडीच्या यूपीएससी कोचिंग सेंटर्समध्ये काम केल्यावर, ओझा यांनी ‘आप’ ने शिक्षण क्षेत्रात केलेल्या कामाचे स्वागत केले आहे. पक्षात सामील होण्याच्या त्यांच्या निर्णयामागील हेच मुख्य कारण आहे. केजरीवाल आणि सिसोदिया या दोघांनीही ओझा यांच्या ट्रॅक रेकॉर्डचे कौतुक केले आहे.

ओझा यांना आता दिल्लीच्या पटपरगंज मतदारसंघातून उमेदवारी दिली जाऊ शकते, अशी माहिती मिळाली आहे. 2013 पासून सिसोदिया यांनी तीनदा ही जागा जिंकली होती. सिसोदिया वेगळ्या जागेवर निवडणूक लढवू शकतात कारण 2020 मध्ये त्यांचा विजय केवळ 3 हजार 207 मतांनी झाला होता.

https://twitter.com/AamAadmiParty/status/1863485561249677639

‘आप’च्या एका कार्यकर्त्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, पक्षासाठी ‘प्रभावका’ ची भूमिका बजावण्यासाठी पक्ष ओझा यांच्याकडे अपेक्षेने पाहत आहे. ओझा सोशल मीडियावरही बऱ्यापैकी सक्रीय आहेत. 40 वर्षीय ओझा उत्तर प्रदेशातील गोंडा येथील रहिवासी आहेत आणि 2020 मध्ये यूट्यूब चॅनेल लॉन्च करून ‘ऑनलाइन क्लासेस’ मॉडेलवर स्विच करण्यापूर्वी त्यांनी दिल्लीच्या जुन्या राजिंदर नगरमध्ये यूपीएससी करू इच्छिणारया विद्यार्थ्यांना सुमारे 10 वर्षं शिकवले.

द ललनटॉपला दिलेल्या मुलाखतीत ओझा यांनी कबूल केले होते की त्यांनी भारतीय जनता पक्ष (भाजप) तसेच काँग्रेसकडून 2024 ची लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी अनुक्रमे अलाहाबाद आणि अमेठीमधून तिकीट मागितले होते.

गेल्या काही महिन्यांत अवध ओझा यांनी उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांची अनेकदा भेट घेतली, त्यामुळे ते भाजपमध्ये सामील होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ओझा यांनी अलाहाबाद, कैसरगंज किंवा रायबरेली येथून लोकसभेचे तिकीट मागितले होते आणि ते गोंडाचे असल्याने यूपीच्या अवध प्रदेशातील कोणत्याही जागेवरून निवडणूक लढवण्यास इच्छुक होते, असे उत्तर प्रदेश भाजपच्या एका कार्यकर्त्याने सांगितले. ओझा यांच्या उमेदवारीची चर्चा झाली होती परंतु पक्षाचे नेतृत्व त्यांना मैदानात उतरवण्यास अनुकूल नव्हते, अशीही माहिती त्या कार्यकर्त्याने दिली.

भाजपने उमेदवारी नाकारल्यानंतर ओझा यांनी काँग्रेसशी संपर्क साधला. त्यावेळी अमेठीमध्ये तत्कालीन केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या विरोधात पक्ष कोणाला उमेदवारी देईल याबद्दल अद्याप अनिश्चितता होती. पण त्याऐवजी पक्षाने गांधी घराण्याचे निष्ठावंत के.एल. शर्मा यांना उमेदवारी दिली व त्यांनी जागा जिंकली. ओझा यांनी  त्यानंतर मनीष सिसोदिया यांच्याशी संपर्क साधला, व त्यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले.

ओझा यांच्या यूट्यूब चॅनलचे नऊ लाखांहून अधिक सबस्क्राइबर्स आहेत.

त्यांच्या एका ऑनलाइन वर्गादरम्यान, त्यांनी उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांची प्रशंसा केली होती आणि म्हटले होते की राज्याला योगी आदित्यनाथ यांच्यासारख्या कठोर प्रशासकाची गरज आहे. दुसऱ्या एका वर्गादरम्यान, त्यांनी राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचे कौतुक केले आणि त्याला ‘प्रेरणादायक’ असे म्हटले. आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये ओझा यांनी यूपीएससी उत्तीर्ण करण्याचा त्यांचा प्रयत्न अयशस्वी झाल्याचे कबूल केले होते.

दिल्लीतील यूपीएससी कोचिंग सेंटरच्या तळघरात आलेल्या पुरात तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्यामुळे ऑगस्टमध्ये ओझा  प्रसिद्धीच्या झोतात आले होते. त्यावेळी ओझा यांनी पूरस्थितीला कारणीभूत असलेल्यांना कठोर शिक्षा करण्याची मागणी केली होती.

संबंधित लेख

चुकवू नका

Recent Comments