scorecardresearch
Saturday, 14 February, 2026
घरराजकारण‘उत्तर भारतीय महिलांना चूल- मूल यातच बांधून ठेवले जाते’ या विधानामुळे ‘डीएमके’चे...

‘उत्तर भारतीय महिलांना चूल- मूल यातच बांधून ठेवले जाते’ या विधानामुळे ‘डीएमके’चे मारन वादाच्या भोवऱ्यात

द्रविड मुन्नेत्र कळघम (डीएमके) चे खासदार दयानिधी मारन यांनी असा दावा केला आहे, की 'उत्तर भारतीय महिलांना स्वयंपाकघरात काम करण्यास आणि मुलांना जन्म देण्यास सांगितले जाते, व त्यांना काम करू दिले जात नाही. तर तामिळनाडूतील महिलांना शैक्षणिक क्षेत्रात प्रगती करण्यास प्रोत्साहन दिले जाते'.

चेन्नई: द्रविड मुन्नेत्र कळघम (डीएमके) चे खासदार दयानिधी मारन यांनी असा दावा केला आहे, की ‘उत्तर भारतीय महिलांना स्वयंपाकघरात काम करण्यास आणि मुलांना जन्म देण्यास सांगितले जाते, व त्यांना काम करू दिले जात नाही. तर तामिळनाडूतील महिलांना शैक्षणिक क्षेत्रात प्रगती करण्यास प्रोत्साहन दिले जाते’. मारन यांनी मंगळवारी चेन्नईतील कायद-ए-मिल्लत शासकीय महिला महाविद्यालयातील विद्यार्थिनींना संबोधित करताना ही टिप्पणी केली. या कार्यक्रमात एम.के. स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखालील सरकार एका नवीन राज्य योजनेअंतर्गत लॅपटॉपचे वाटप करत होते.

“मुलाखतींना जाताना किंवा उच्च शिक्षण घेताना आमच्या मुलींनी सरकारच्या लॅपटॉपमुळे आत्मविश्वास आणि अभिमान बाळगावा. कारण, तामिळनाडू हे असे राज्य आहे, जिथे आम्ही मुलींना शिकत राहण्यास सांगतो. पण, उत्तरेत ते मुलींना काय म्हणतात? कामावर जाऊ नका, घरी रहा, स्वयंपाकघरात रहा, मुलांना जन्म द्या, आणि तेच तुमचे काम आहे,” असे ते उपस्थितांना म्हणाले. “कलाइग्नार, अण्णा आणि एम.के. स्टॅलिन यांची भूमी असलेला तामिळनाडू वेगळा आहे. तामिळनाडूमध्ये, तुमची प्रगती ही तामिळनाडूची प्रगती आहे आणि म्हणूनच सर्व आंतरराष्ट्रीय कंपन्या चेन्नईमध्ये येत आहेत, कारण येथील प्रत्येकजण केवळ तमिळमध्येच नाही, तर इंग्रजीमध्येही सुशिक्षित आहे. महिलांच्या प्रगतीमध्ये राज्य सरकार महत्त्वाची भूमिका बजावते,” असेही मारन म्हणाले. यावेळी उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिनही उपस्थित होते.

या टिप्पणीमुळे भारतीय जनता पक्षाकडून तीव्र टीका झाली, भाजपचे प्रवक्ते नारायण तिरुपती यांनी आरोप केला की, ‘डीएमकेकडून उत्तर भारतीयांचा अपमान करणे ही एक नियमित बाब झाली आहे’. “मला वाटत नाही की दयानिधी मारन यांच्यात काही सामान्य ज्ञान आहे. त्यामुळे हीच समस्या आहे. मी दयानिधी मारन यांचा तीव्र निषेध करतो. त्यांनी भारतातील लोकांची, विशेषतः हिंदी भाषिक लोकांची माफी मागितली पाहिजे, ज्यांना ते अशिक्षित आणि असंस्कृत म्हणतात,” असे तिरुपती यांनी बुधवारी माध्यमांना सांगितले.

डीएमकेचे प्रवक्ते टी.के.एस. एलंगोवन यांनी या टिप्पणीचे समर्थन करत म्हटले की,  हे विधान सर्व उत्तर भारतीय राज्यांबद्दल नव्हते. “हे कोणत्या पक्षाचे राज्यात सरकार आहे, यावर अवलंबून असते. आता, काँग्रेस महिलांना सक्षम करत आहे. यात काही शंका नाही की, जिथे जिथे काँग्रेसचे सरकार आहे, तिथे ते महिलांच्या शिक्षणासाठी चांगले काम करत आहेत. येथे तामिळनाडूमध्ये आम्ही महिलांसाठी संघर्ष केला आणि त्यांना सक्षम केले. आम्ही त्यांना शिक्षण दिले. आम्ही त्यांना रोजगार दिला. उत्तरेकडे महिलांसाठी लढणारे कोणीही नाही. बस इतकेच,” असे ते म्हणाले.

संबंधित लेख

चुकवू नका

Recent Comments