नवी दिल्ली: भारतीय जनता पक्षाने (भाजप) शुक्रवारी दिल्ली निवडणुकीसाठीच्या त्यांच्या तीन भागांच्या जाहीरनाम्याचा पहिला भाग प्रसिद्ध केला, ज्यामध्ये पात्र महिलांना दरमहा 2 हजार 500 रुपये, गर्भवती महिलांना 21 हजार रुपयांची एक वेळची आर्थिक मदत आणि वृद्धापकाळातील वाढीव मदत अशा अनेक मोफत देणग्यांची घोषणा केली. त्यांनी दिल्लीत आयुष्मान भारत योजना लागू करण्याचे आश्वासनही दिले. भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी जाहीरनाम्याचे अनावरण करताना दिल्लीतील सर्व विद्यमान कल्याणकारी योजना “भाजप सरकार स्थापन केल्यानंतरही” लागू केल्या जातील यावर भर दिला.
गर्भवती महिलांना 21 हजार रुपयांव्यतिरिक्त, पक्षाने त्यांना सहा पोषण किटस देण्याचे आश्वासनदेखील दिले आहे. ‘द प्रिंट’ने पहिल्यांदा नोव्हेंबर 2024 मध्ये वृत्त दिले होते की दिल्ली भाजप महिलांसाठी आर्थिक मदत योजना सुरू करण्याची योजना आखत आहे. या मोफत देणग्यांव्यतिरिक्त, भाजपने अटल कॅन्टीन योजना सुरू करण्याचे वचनदेखील दिले आहे ज्याअंतर्गत झोपडपट्टीत राहणाऱ्यांना 5 रुपयांत जेवण मिळेल.
1998 पासून भाजप दिल्लीत सत्तेबाहेर आहे आणि या निवडणुकीकडे राष्ट्रीय राजधानीत पुन्हा सत्ता मिळवण्याची संधी म्हणून पाहते. पक्षाने मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर केलेला नाही आणि सत्तेत येण्यासाठी ब्रँड मोदींवर अवलंबून आहे. आप सरकारकडून दिल्या जाणाऱ्या ‘मोफत’ आश्वासनांना प्रत्युत्तर म्हणून भाजपने आपल्या जाहीरनाम्याच्या पहिल्या भागात महिला मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. “या योजना अधिक प्रभावीपणे राबवल्या जातील आणि लोकांना फायदा व्हावा यासाठी त्या अधिक मजबूत केल्या जातील. याव्यतिरिक्त, आम्ही भ्रष्टाचाराचे प्रत्येक मार्ग नष्ट करण्यासाठी वचनबद्ध आहोत, जे आपच्या नेतृत्वाखालील प्रशासनाचे वैशिष्ट्य आहे,” असे ते म्हणाले.
नड्डा म्हणाले की पक्षाने केलेल्या सर्व घोषणा नवी दिल्ली महानगरपालिका परिषद (एनडीएमसी) आणि दिल्ली छावणी हद्दीतदेखील लागू केल्या जातील. ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या वृद्धापकाळातील मदतीत 500 रुपयांची वाढ जाहीर करताना नड्डा म्हणाले की, 60-70 वयोगटातील लोकांना दरमहा 2 हजार 500 रुपये मिळतील, तर 70 वर्षे आणि त्यावरील वयाच्या लोकांना – तसेच विधवा आणि निराधारांना 3 हजार रुपयांची मासिक मदत मिळेल.
महिला सन्मान निधी व्यतिरिक्त, ज्याअंतर्गत दिल्लीतील पात्र महिलांना दरमहा 2 हजार 500 रुपये मदत दिली जाईल त्याव्यतिरिक्तही भाजपने पात्र महिलांसाठी एलपीजी सिलिंडरवर 500 रुपयांची सबसिडी जाहीर केली आहे. होळी आणि दिवाळीला आर्थिकदृष्ट्या मागास कुटुंबांना एक सिलिंडर मोफत देण्याचे येणार असल्याचे भाजपने सांगितले आहे.दिल्लीत भाजप सत्तेत आल्यास पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत महिला सन्मान निधीबद्दल निर्णय घेतला जाईल, असे नड्डा म्हणाले. भाजपचे ध्येय दिल्लीला भ्रष्टाचारमुक्त करणे आहे, असे ते म्हणाले.
“आमचे ‘संकल्प पत्र’ हे विकसित दिल्लीचा पाया आहे. “2014 मध्ये आम्ही 500 आश्वासने दिली होती, त्यापैकी 499 आम्ही पूर्ण केली. 2019 मध्ये आम्ही 235 आश्वासने दिली तर 225 पूर्ण केली. उर्वरितही अंमलबजावणीच्या टप्प्यात होती. 2014 पूर्वी जाहीरनाम्यात दिलेली आश्वासने सर्वजण विसरत असत. हा वचनपूर्तीचा एक वचनबद्ध दस्तऐवज आहे. राजकीय संस्कृतीत बदल पंतप्रधान मोदींच्या दृष्टिकोनामुळे झाला आहे,” ते पुढे म्हणाले.
डिसेंबरमध्ये, दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत ‘आप’ सत्तेत परत आल्यास दिल्लीतील पात्र महिलांना 2 हजार 100 रुपये मासिक आर्थिक मदत देण्याची घोषणा केली. ‘आप’ने या योजनेला ‘गेम-चेंजर’ म्हणून घोषित केले. मुख्यमंत्री महिला सन्मान योजना ही योजना सर्वप्रथम अर्थमंत्री असताना मुख्यमंत्री आतिशी यांच्या 2024-25 च्या वार्षिक अर्थसंकल्पीय भाषणात जाहीर करण्यात आली. नंतर दिल्लीतील ‘आप’ सरकारने या योजनेसाठी 2 हजार कोटी रुपये वाटप केले ज्यामुळे पात्र महिलांना दरमहा 1 हजार रुपये आर्थिक मदत मिळू शकेल.
2024 आणि 2023 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशातही अशाच योजना सुरू करण्यात आल्या होत्या.
Recent Comments