नवी दिल्ली: ‘लवकरच केल्या जाणाऱ्या जनगणनेत, प्रत्येकाने आपला धर्म हिंदू असा लिहावा’, असे आवाहन विश्व हिंदू परिषदेने केले आहे. विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष आलोक कुमार यांनी ‘द प्रिंट’ला सांगितले, “या आवाहनामागे एक विशिष्ट संदर्भ आहे, की प्रत्येकाने आपल्याला हिंदू म्हणून ओळखावे. हिंदू समाजातील काही वर्गांमध्ये, विशेषतः कर्नाटकातील लिंगायत, सरना आणि जाट आणि सर्वसाधारणपणे अनुसूचित जाती आणि जमातींमध्ये एक मोहीम सुरू आहे की ते हिंदू समाजाचा भाग नाहीत, आणि येणाऱ्या जनगणनेत त्यांनी स्वतःला हिंदू म्हणून प्रस्थापित करू नये. आम्ही त्यांना सांगू इच्छितो, की हा समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न आहे आणि आम्ही हिंदू आहोत आणि या ओळखीबद्दल आम्हाला अभिमान आहे, असे आपण सांगायला हवे” असे ते म्हणाले.
2027 ची जनगणना दोन टप्प्यात केली जाईल – पहिला टप्पा म्हणजे, म्हणजे, एप्रिल ते सप्टेंबर 2026 दरम्यान घरांची यादी आणि घरांची गणना; आणि दुसरा, लोकसंख्या गणना, फेब्रुवारी 2027 मध्ये. पहिला टप्पा, एप्रिल ते सप्टेंबर 2026, हा राज्य सरकारांच्या सोयीनुसार 30 दिवसांच्या कालावधीत आयोजित केला जाईल. जनगणनेत ‘हिंदू’ म्हणून ओळखले जाण्याच्या मुद्द्यावर 9 डिसेंबर रोजी दिल्ली येथे झालेल्या विश्व हिंदू परिषदेच्या केंद्रीय मार्गदर्शिक मंडळाच्या बैठकीत चर्चा झाली. 2011 च्या जनगणनेत, 82 धर्मांनी भारतातील ‘इतर धर्म आणि अनुयायी’ (ओआरपी) या शीर्षकाखाली स्वतःची ओळख पटवली. हे भारतातील सहा धर्म म्हणजे हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध आणि जैन या धर्मांपेक्षा वेगळे आहेत.
‘द प्रिंट’ने वृत्त दिले आहे, की नोव्हेंबर 2020 मध्ये झारखंड विधानसभेने सरनाला – निसर्गपूजेचा एक प्रकार, ज्यामध्ये अनुयायी ‘जल, जंगल, जमीन’ या त्रिसूत्रीवर विश्वास ठेवतात आणि झाडे व टेकड्यांना प्रार्थना करतात – हे 2021 च्या जनगणनेत एक वेगळा धर्म म्हणून समाविष्ट करण्याचा ठराव मंजूर केला होता. बैठकीच्या अजेंड्यावर सविस्तरपणे बोलताना कुमार म्हणाले, की बैठक 10 डिसेंबर रोजी सुरू राहील आणि हिंदू समाजाशी संबंधित इतर अनेक मुद्द्यांवर चर्चा केली जाईल. तसेच जागतिक शांततेसाठी ‘जिहादी मानसिकते’विरुद्ध लढण्याची गरज आहे आणि बैठकीत या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली. “जिहाद केवळ गरिबी किंवा अज्ञानातून उद्भवत नाही तर धार्मिक कट्टरतेतून उद्भवतो. लाल किल्ल्यावरील हल्ल्याच्या तपासातून हे सिद्ध होते, की जिहादी सुशिक्षित, चांगले उत्पन्न असलेल्या आणि समाजात आदरणीय पदांवर असलेल्या लोकांमधून उदयास येत आहेत,” असे ते म्हणाले. याव्यतिरिक्त, कुमार यांनी असे निदर्शनास आणून दिले, की धार्मिक अल्पसंख्यांक निश्चित करण्याच्या निकषांचा आढावा घेण्याची आवश्यकता आहे, आणि केवळ लोकसंख्येच्या आधारावर ते ठरवता येणार नाही यावर भर दिला. “कोणत्याही धर्माच्या अनुयायांना काही मागासलेपणा किंवा छळ सहन करावा लागला आहे का, ज्यामुळे त्यांना काही विशेषाधिकार दिले जावेत याची तपासणी केली पाहिजे,” असे ते म्हणाले.
तसेच बैठकीत ‘धार्मिक स्वातंत्र्य कायदा’ संपूर्ण देशभरात लागू करावा यावरही चर्चा झाली. देशभरातील अनेक संत उपस्थित असलेल्या या बैठकीत, विहिंपच्या प्रवक्त्याने ‘हिंदू समाजासमोरील सध्याच्या आव्हानांबद्दल’ भाष्य केले आणि संतांकडून मार्गदर्शन मागितले, असे कुमार म्हणाले.

Recent Comments